माणसं वाचताना...

 थोडं मनातलं 

माणसं वाचताना... 

काही दिवसांपूर्वी मी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी म्हणून गेलो होतो. तिथे रवींद्र धस या नावाचे माझे मित्रही होते. त्यांनी विविध लोकांशी माझी ओळख करून दिली. त्यातीलच एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ थोरात. भाऊ थोरात हे साईबाबा मंदिर परिसरात असलेल्या तीन हॉटेल्सचे मालक आहेत. सुरुवातीला ते विड्याच्या पानांची विक्री करत असत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी तीन हॉटेल्सचे मालक होण्यापर्यंत मजल मारली. आज अत्यंत उत्तम सांपत्तिक स्थिती असली तरी ज्या विड्याच्या पानांची विक्री करून आपण इथपर्यंत आलो, त्या विड्याच्या पानांना ते विसरले नाहीत. त्याची आठवण म्हणून आजही ते थोड्या प्रमाणात का होईना पण विड्याच्या पानांची विक्री करतात. त्यांनी एक दोन पुस्तकेही लिहिली आहेत. काही ठिकाणी ते वक्ते म्हणूनही जातात. 

अशा या अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाशी परिचय झाल्यावर काही काळ आम्ही विविध विषयांवर बोललो. खरं म्हणजे ते बोलत होते आणि मी ऐकत होतो. त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांनी त्यांच्या सुनेचा परिचय आमच्याशी करून दिला. ते म्हणाले, ' लोक मला विचारतात की तुमची सून कशी आहे ? मी त्यांना सांगतो की मुलापेक्षा चांगली ! मला तीन मुली आहेत आणि माझी सून ही माझी चौथी मुलगी. माझ्या मुली तरी एकवेळ माझं ऐकणार नाहीत पण ही माझी मानलेली मुलगी माझ्यावर जीवापाड प्रेम करते. ' ते हे सगळं सांगत असताना त्यांची सून समोरच बसलेली होती. मी मोठया कौतुकाने  तिला म्हटलं, ' यापेक्षा तुझ्या वागण्याचं आणखी मोठं सर्टिफिकेट कोणतं असू शकेल ! ' 

सुनेला लेकीप्रमाणे वागवणारा हा सासरा पाहून मला मनोमन त्यांचं कौतुक वाटत होतं. ते तिच्याबद्दल सांगताना पुढं म्हणाले, '  तिचे वडील आम्हाला सांगतात की ती आमचं ऐकत नाही. तुमचं ऐकेल. तिला जरा चार दिवस माहेरी पाठवा. आम्ही सांगतो तेव्हा ती माहेरी जाते. तेथून निघताना देखील ती आमच्या आधी गाडीत जाऊन बसते. तिच्या माहेरची परिस्थिती पण सधन आहे. एकदा तिला तिच्या वडिलांनी एक महागडा दागिना हौसेखातर केला. पण जेव्हा त्यांनी माझे विचार ऐकले तेव्हा तो दागिना देण्याची हिंमत केली नाही. तिच्या माहेरी भरपूर शेती आहे. त्यांनी सात एकर शेतीचे उत्पन्न तिच्या नावावर केले होते. मी त्यांना सांगितले की तिला याची अजिबात आवश्यकता नाही. ही तुमची शेती आणि तिचे उत्पन्न तुमच्याच नावावर असू द्या. ' 

त्यांचे विचार ऐकून मी चाट झालो. निरपेक्ष वृत्ती आणि स्वाभिमान असावा तर असा ! येणारा पैसा नाकारण्यासाठी हिंमत लागते आणि तुमचं नैतिक मूल्यांचं अधिष्ठान बळकट असावं लागतं. समाजात अशी माणसं अभावानं बघायला मिळतात. लग्नात हुंडा घेणारे, विविध वस्तूंची मागणी करणारे आणि या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरही मुलाच्या व्यवसायासाठी माहेरहून एवढी रकम आण अशी मागणी करणारे महाभाग समाजात आपल्याला आढळतात. मुलींच्या आणि तिच्या आईवडिलांच्या सुद्धा मुलाकडून खूप अपेक्षा आढळतात. खरं तर मुलगा किंवा मुलगी किती गुणी, कर्तबगार आहे, ती किंवा तो स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात का या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. त्यांच्या स्वतंत्र कर्तृत्वाला त्यांच्या आईवडिलांनी वाव द्यायला हवा. भाऊ थोरातांसारखी माणसं समाजापुढे असा आदर्श उभा करतात. 

मला विविध व्यक्तींचे विचार ऐकायला आवडतात. त्यातून त्यांचे विचार, व्यक्तिमत्व कळत जाते. आपण जशी पुस्तके वाचतो तशी माणसं पण वाचता आली पाहिजेत. माणसं वाचण्यासाठी त्यांच्या सहवासात राहणं, त्यांचं वागणं बोलणं यांचं निरीक्षण करणं, विविध विषयांवर त्यांची मतं जाणून घेणं आणि घाईघाईने कुठल्याही निष्कर्षाप्रत न येता काही काळ तरी त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करणं या गोष्टी महत्वाच्या असतात. अर्थात प्रत्येक वेळी एवढा वेळ आपल्याला मिळेलच असे नाही. पण एकदा ही माणसं वाचण्याची सवय लागली की अल्प काळातही त्या माणसाबद्दल आपल्याला अनुकूल किंवा प्रतिकूल मत बनवता येऊ शकते पण अर्थातच हा नियम नाही. पु लं देशपांडे, व पु काळे यांच्यासारखे महान लेखक हे जसे उत्तम साहित्याचे वाचक होते, तसेच ते माणसांचे उत्तम वाचक देखील होते. त्यातूनच त्यांच्या विविध व्यक्तिरेखा आणि कथा जन्माला आल्या. 

अंतू बर्वा, चितळे मास्तर, नारायण, सखाराम गटणे यासारख्या पुलंच्या व्यक्तिरेखा अजरामर झाल्या आहेत त्या त्यांच्या निरीक्षण आणि माणसे वाचण्याच्या सवयीमुळे. पुलंच्या ' म्हैस ' या कथेत विविध माणसांच्या ज्या लकबी त्यांनी दाखवल्या आहेत, त्या केवळ अफलातून ! लक्ष्मण देशपांडे यांच्या ' वऱ्हाड निघालं लंडनला ' या एकपात्री प्रयोगाबद्दलही असंच म्हणता येईल. त्यात त्यांनी विविध माणसांच्या वागण्या बोलण्याच्या ज्या तऱ्हा दाखवल्या आहेत, त्या त्यांच्या निरीक्षणातूनच आल्या आहेत. त्या व्यक्तिरेखा जेव्हा आपल्याशी संवाद साधतात, तेव्हा आपणही कुठेतरी त्या माणसांची तुलना आपल्याला आजवर भेटलेल्या माणसांशी करतो. आपल्या लक्षात येतं की खरंच अशी माणसं आहेत आपल्या अवतीभवती. म्हणूनच त्या व्यक्तिरेखा आपल्याला जिवंत वाटतात. 

कधी कधी लेखक या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून आपल्याशी मार्मिक भाष्य करीत असतो. कधी मिश्किल टिप्पणी असते तर कधी खेद व्यक्त केलेला असतो. या सगळ्या गोष्टी लेखक त्या व्यक्तिरेखांद्वारे अलगदपणे आपल्या मनापर्यंत पोहोचवत असतो. पुलं ' नारायण ' या कथेत म्हणतात, ' सुमारे आठनऊ निरनिराळ्या वयाच्या (आणि आकाराच्या) बायकांसह नारायण खरेदीला निघतो. सातआठ पिशव्या त्याच्याच हातात असतात. एका बाई बरोबर कापड खरेदी करणें म्हणजे मन:शांतीची कसोटी असते; पण नारायण आठ बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्याची चढउतर अत्यंत उत्साहाने करू शकतो. ' आणखी एका ठिकाणी कापड दुकानात कापड दाखवणाऱ्या सेल्समनबद्दल ते मार्मिक भाष्य करतात. बायका साडी घेताना किती वेळ लावतात. ही नको, ती दाखवा. हिचे काठ बरोबर नाहीत, रंग असा हवा वगैरे. बिचारा सेल्समन नवनवीन साड्या दाखवतच असतो. पसंत न पडलेल्या साड्यांचा ढीगही तेवढ्याच निर्विकारपणे उचलून ठेवतो. या परिस्थितीवर पुलंमधला लेखक मार्मिक भाष्य करतो. ते म्हणतात, ' माणसाला कोणत्याही परिस्थितीत निरपेक्ष, निर्विकार कसे राहावे हे शिकायचे असेल तर काही काळ त्याने कापड दुकानात सेल्समन म्हणून काम केले पाहिजे. ' 

' वाचन ' मग ते पुस्तकांचे असो की माणसांचे ते डोळसपणे करता यायला हवे. त्यांना काय सांगायचे आहे हे लक्षात यायला लागते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होत जातो. कोणतेही पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचताना त्यात जे काही लिहिलेले असते, त्यापलीकडेही ते काही सांगू पाहतात. हा मजकूर अदृश्य असतो. त्यालाच ' बिटवीन द लाईन्स ' असे म्हटले जाते. ' बिटवीन द लाईन्स ' आपल्याला कळायला लागले की आपल्या जाणिवा प्रगल्भ होत जातात. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

९/७/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






Comments