थोडं मनातलं अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन
थोडं मनातलं अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन ( भाग एक ) औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिद्ध अशी अजिंठ्याची लेणी आहेत. अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालेच्या आकाराची ही लेणी पाहिली की मला कधी कधी मुंबईच्या नरिमन पॉईंटची आठवण येते. नरिमन पॉईंटच्या भोवती सिमेंटचे जंगल आहे. पण ही अजिंठ्याची लेणी अत्यंत निसर्गरम्य वातावरणात वसलेली आहेत. गोलाकार अशा हिरव्याकंच टेकडीवर ही लेणी आहेत. खाली वाघुरा नदीचे खळाळते पात्र आहे. आजूबाजूला प्रचंड मोठे डोंगर आहेत. निसर्गाच्या कुशीत अलगद वसलेली ही मानवी प्रतिभेतून निर्माण झालेली प्रतिसृष्टी. ज्याच्या कोणाच्या डोक्यातून या ठिकाणी अशी अप्रतिम काळावर अमीट ठसा उमटवणारी ही कलाकृती निर्माण करण्याची कल्पना जन्म पावली, त्याच्या सौंदर्य दृष्टीचे कौतुक करायला शब्द कमी आहेत. अजिंठा, वेरूळची लेणी हा आपला अत्यंत अभिमानास्पद असा जागतिक सांस्कृतिक वारसा आहे. संपूर्ण जगातून येथे पर्यटक येतात. पण आपल्याकडील या अनमोल ठेव्याचे महत्व आपल्याकडील लोकांना तेवढे वाटत नाही. अजिंठ्याला आता काय राहिले आहे, वेरूळची लेणी तर बरीचशी भग्न झालेली आहेत असे म्हण...