थोडं मनातलं - रामका गुणगान करिये
थोडं मनातलं रामका गुणगान करिये पं भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नानांनी गायिलेले ' गुणगान करिये रामका ' हे अतिशय सुंदर गीत. हे गीत ऐकताना जणू समाधी लागते. तशी रामाची कुठलीही गाणी गोडच ! मग ते गीतरामायण असो वा अन्य कुठलीही गाणी. मुळात रामायणच गोड ! पेढ्याचा कुठलाही भाग खाल्ला तरी तो गोडच लागणार ना ! तशीच अवीट गोडीची ही रामकथा. या रामकथेने हजारो वर्षांपासून अनेकांना प्रेरणा दिली. शेकडो लेखक आणि हजारो कवी लिहिते झाले. पण रामकथेची थोरवी संपली का ? वर्णन करून झाली का ? ती कधीच संपणार नाही. रामकथा म्हणजे विविध डोळे दिपविणाऱ्या रत्नांनी भरलेला एक सागर आहे. जेवढी खोल बुडी माराल तेवढी रत्ने हाताला लागतील. समुद्राला आपण रत्नाकर म्हणतो. रामकथा सुद्धा या अर्थाने एक रत्नाकरच ! मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या गीताचे सुरुवातीचे शब्द आहेत ' रामका गुणगान करिये.' रामाचं गुणगान कशाकरता करायचं ? आणि गुणगान केलं तरी कोणाचं जातं ? ज्याच्यात काही अलौकिक असे गुण आहेत, अशाच व्यक्तीचं आपण गुणगान करतो ना ! आपण रामाचं गुणगान करतो, कृष्णाचं गुणगान करतो, शिवाजी महाराजांचं गुणगान करत...