थोडं मनातलं अजिंठ्याच्या लेण्यातून घडणारे बुद्ध दर्शन - भाग २

थोडं मनातलं 

अजिंठ्याच्या लेण्यातून घडणारे बुद्ध दर्शन - भाग २ 

अजिंठ्याच्या लेण्यांतून जी भित्तिचित्रे आणि गौतम बुद्धांची विविध रूपे असलेली शिल्पे आपल्याला दृष्टीस पडतात, त्या प्रत्येकाच्या मागे काही इतिहास किंवा काही कथा दडलेली आहे. या चित्रांचे किंवा शिल्पांचे अर्थ गौतम बुद्धांचे जीवन, बुद्ध वांड्मयातील जातक कथा इ. समजून घेतल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. आज या लेण्यातील चित्रे आणि शिल्पे काळानुसार त्यांचे मूळ रूप आणि सौंदर्य काही प्रमाणात गमावून बसली असली तरी एकेकाळच्या संस्कृतीच्या वैभवाच्या हा काळावर उमटवलेला अमीट असा ठसा आहे. गौतम बुद्ध, त्यांचे अजरामर असे तत्वज्ञान हा आपला वैभवशाली वारसा तर आहेच पण ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे. 

आपण  बुद्धांचे जीवन आणि ही अजिंठ्याची लेणी अशा दोन गोष्टी एकत्र लक्षात घेत गेलो, तर या लेण्यातील चित्रे आणि शिल्पे यावर प्रकाश पडतो. त्यानिमित्ताने जेव्हा बुद्धांच्या चरित्रातील घटना आपण पाहू लागतो, तेव्हा मनोरम असे बुद्ध दर्शन घडते. हे घडणारे बुद्ध दर्शन लेण्यातील शिल्प आणि चित्र यांच्यापलीकडचेही असते. म्हणूनच लेण्यात न दिसणारे  पण त्यांच्या चरित्राचा अविभाज्य भाग असणारे काही प्रसंग या ठिकाणी मी विस्ताराने सांगतो आहे. 

पहिल्या भागात आपण पाहिले की बुद्ध होण्यापूर्वी बुद्धांचे अनेक जन्म झाले. या पूर्वजन्मांमध्यें त्यांना ' बोधिसत्व ' म्हणजे भावी काळात संबोधी प्राप्त करून घेणारा असे म्हणत असत. बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचे सत्व किंवा क्षमता ज्यामध्ये आहे अशी व्यक्ती. बोधिसत्वांनी आपल्या आधीच्या जन्मांमध्ये दान, प्रज्ञा, शील, धैर्य, करुणा यासारख्या दहा गुणांमध्ये पारमिता म्हणजे परिपूर्णता प्राप्त केली. त्याचा फायदा त्यांना पुढील जन्मात झाला. 

बुद्ध जन्मामध्ये सुरुवातीला अंगात मर्दुमकी नसलेला, युद्धाची इच्छा नसलेला तरुण गौतम हा सर्वांच्याच चिंतेचा विषय होता. आईचे सौख्य तर त्याला लाभलेच नाही. त्याचे वडील असलेल्या शुद्धोधन राजाला आपल्या या जगावेगळ्या असलेल्या मुलाच्या भविष्याची चिंता पोखरत होती. लहानपणापासूनच काहीशा विरक्त असलेल्या या गौतमाच्या अंगात मात्र अनेक मानवी सद्गुणांचा वास होता. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे, दुसऱ्यांच्या आनंदाने आनंदी होणे, समोरची व्यक्तीच काय परंतु प्राण्यांच्या देखील भावना आणि वेदना समजून घेणे, त्यांना आपल्या परीने साहाय्य करणे या गुणांनी त्याचे व्यक्तिमत्व मंडित झाले होते. त्याच्या अंगात शौर्य, मर्दुमकी यांचा अभाव होता असे नाही पण त्या गुणांचे प्रदर्शन करण्याची कधी त्याला इच्छा झाली नाही. प्राणिमात्रांबद्दल प्रेम आणि त्यांच्या वेदना  समजून घेण्याची उपजत प्रवृत्ती अंगात असल्याने त्याने इतर राजे किंवा राजपुत्रांसारखी शिकार वा मृगया करण्यात धन्यता मानली नाही. यशोधरेशी विवाह होण्याच्या पूर्वी झालेल्या स्वयंवरात मात्र आपल्या अंगातील शौर्य, युद्धकला आदींचे दर्शन त्याने उपस्थितांना घडवले  होते. तेही केवळ आपल्या वडिलांच्या समाधानासाठी. 

वडिलांच्या इच्छेनुसार विवाह तर पार पडला, पण हा राजबिंडा तरुण संसार सुखात रमणारा नव्हताच. सगळी सुखे हात जोडून उभी होती. सुंदर आणि भव्य असा राजप्रासाद, अत्यंत सुस्वरूप आणि सुस्वभावी अशी पत्नी, आज्ञाधारक  नोकरचाकर हे सगळे असूनही मनाला एक वेगळी ओढ लागली होती. ही ओढ होती मानवजातीला सौख्य प्रदान करण्याची, दुःखमुक्त करण्याची. गौतमाला जी विरक्ती आली होती, ती आतून आलेली होती. त्याच्या पूर्वजन्मीच्या तपस्येचे ते फलित होते. संसारातील दैन्य, दुःख, अडचणी यांचा वीट येऊन विरक्ती येणे वेगळे आणि सर्व सुखे हात जोडून उभी असताना विरक्ती प्राप्त होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणूनच गौतमाने केलेला सर्व सुखांचा त्याग आगळावेगळा ठरतो. 

बुद्धांच्या चरित्रात आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो की त्यांनी कपिलवस्तू नगरीत फिरताना एक वृद्ध व्यक्ती, एक अत्यंत दुर्धर रोगाने पीडित असलेली व्यक्ती, एका मरण पावलेल्या व्यक्तीची अंत्ययात्रा आणि एक जीवनातील दुःखांना कंटाळून संन्यास स्वीकारलेली अशी एक व्यक्ती असे चार दुःखद प्रसंग पाहिले. आणि जीवनातील दुःखाची त्यांना कल्पना आली. बऱ्याच ठिकाणी हे चार प्रसंग एकत्र दाखवले आहेत पण या सगळ्या दुःखद गोष्टी त्यांना एकत्रच आणि एकाच वेळी दिसल्या असतील असे म्हणता येत नाही. पण काही असले आणि त्या गोष्टी कोणत्याही क्रमाने दिसल्या असल्या तरी त्यातून त्यांची मुळातच विरक्त असलेली वृत्ती आणि मानवी जीवनातील सुख दुःखाचा शोध घेण्याची भावना अधिक तीव्र झाली असावी हे नक्की. छन्न नावाचा त्यांचा सारथी होता. पण ज्याच्याशी मोकळेपणाने बोलता येईल असा मित्रही तो होता. त्याच्याबरोबर नगरात फिरताना विविध विषयांवर त्यांची चर्चा होत असे. छन्न याचे गौतमावर विशेष प्रेम होते. त्यामुळे त्याच्या विरक्तीच्या गोष्टी ऐकून तो प्रसंगी दुःखीही होई. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या मित्राची साथ द्यायची असेच त्याने ठरवले होते. 

सिद्धार्थ उर्फ गौतमाला अशा प्रकारे एका बाजूला विरक्ती आली असताना नियती त्याला सांसारिक बंधनात अडकवून जणू त्याची परीक्षा घेत होती. याच सुमारास यशोधरेने एका गोड आणि सुकुमार मुलाला जन्म दिला. शुद्धोधन राजाला आनंद झाला. आता तरी गौतमाची विरक्ती जाऊन त्याला संसाराची आसक्ती निर्माण होईल असे त्याला वाटले. सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी सांगितलेली भविष्यवाणी त्याच्या कानात वारंवार निनादत होती. ' हा मुलगा सर्व सुखांचा त्याग करून एक तर बुद्ध तरी होईल किंवा तसे न झाल्यास तो चक्रवर्ती सम्राट तरी होईल ' अशी ती भविष्यवाणी होती. शुद्धोधन राजाच्या मनात दुसऱ्या शक्यतेची आशा पालवली होती. 

पण आता गौतमाचा निर्णय झाला होता. संसार हा असार आहे. मानवी जीवनातील चिरंतन सत्याचा शोध घ्यायलाच हवा आणि तो इथे राहून शक्य नाही याची त्याला खात्री झाली होती. हा निश्चय दृढ झाला आणि त्याने आपली पत्नी, मुलगा, राजप्रासाद, नगर सगळं काही सोडण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी आपल्या सारथ्याला आपला घोडा तयार करण्याची आज्ञा त्याने दिली. खरं तर आपल्या परवानगीशिवाय गौतमाला कुठेही जाऊ देऊ नये ही शुद्धोधन राजाची आज्ञा होती. पण या वेळी छन्नाने आपल्या मित्राचे ऐकण्याचे ठरवले. त्याने गौतमाचा घोडा तयार ठेवला. कंथक नावाचा हा अश्व गौतमाचा अतिप्रिय होता. जाण्यापूर्वी एकदा तरी आपल्या पत्नी आणि मुलाला पाहून घ्यावे म्हणून तो यशोधरेच्या महालात आला. आपल्या गोड मुलाला एकदा जवळ घ्यावे असे त्याला वाटले पण यशोधरेचा हात त्याच्या अंगावर होता. तो बाजूला केला तर यशोधरा जागी होईल असे त्याला वाटले. अशा वेळी त्याच्या मनात कोणत्या भावना दाटून आल्या असतील ? अश्रूंनी त्याच्या डोळ्यात गर्दी केली असेल. पण त्याने पुन्हा आपल्या भावनांना आवर घातला. पुढे गौतमाला त्याच्या निश्चयापासून परावृत्त करण्यासाठी ' मार ' नावाचा राक्षस येतो. तो गौतमाला निरनिराळी प्रलोभने दाखवून त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच ' बुद्ध प्रलोभन ' असे म्हटले जाते. मला वाटते गौतमाचे हे प्रलोभन किंवा एक प्रकारची परीक्षा आपल्या पत्नी आणि मुलाचा निरोप घेण्यापासूनच सुरु होते. 

मला या प्रसंगी श्रीकृष्ण जन्माच्या वेळेची आठवण येते. कंसाने बंदिवासात ठेवलेल्या वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म होतो. वसुदेव त्याला गोकुळात पोहोचवण्यासाठी निघतात तेव्हा तुरुंगातील सगळ्या पहारेकऱ्यांना गाढ झोप लागलेली असते. वसुदेवाच्या शृंखला आपोआप गळून पडतात, दरवाजे उघडले जातात. या प्रसंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे गौतम राजवाड्यातून बाहेर पडताना दास दासी आणि पहारेकऱ्यांना झोप लागलेली असते. त्याच्या घोड्यांच्या टापांचा सुद्धा आवाज होत नाही. प्रसादातील दरवाजे, नगराच्या वेशीवरील प्रवेशद्वाराचा दरवाजा आपोआप उघडला जातो आणि कोणालाही कळण्याच्या आत गौतम नगरापासून लांब निघून गेलेला असतो. 

गौतम जेव्हा नगराचे प्रवेशद्वार उघडून बाहेर पडतो, तेव्हा प्रथमच ' मार ' त्याला सामोरा येतो. तो गौतमाला म्हणतो, ' अरे लवकरच तू या नगरीचा सम्राट आणि चक्रवर्ती राजा होणार आहेस. पुन्हा एकदा विचार कर आणि माघारी फिर. ' पण सिद्धार्थाचा निर्णय एकदा झाला होता, अशा प्रलोभनाला तो बळी पडणार नव्हता. त्याने माराच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढील वाटचाल सुरु केली. गौतमाच्या या वागण्याने तो मार निराश झाला. त्याचा गौतमाला विचलित करण्याचा हेतू साध्य झाला नव्हता. तो जाताना गौतमाला म्हणाला, ' मी आता जातो आहे पण लक्षात ठेव. तुझ्या मनात काम, क्रोध, वासना आदींचा थोडा जरी उगम झाला तर मी पुन्हा येईन. मग तुला माघारी यावेच लागेल. '  या कथेत जो ' मार ' नावाचा राक्षस आहे, त्यालाच यक्ष किंवा नमुची असेही बौद्ध वाङ्मयात म्हटले आहे. बुद्धाला प्रलोभन दाखणारा आणि त्याला त्याच्या हिताच्या निर्णयापासून परावृत्त करणारा हा मार म्हणजे मानवी मनातील द्वंद्वाचेच एक प्रतीक आहे असे मला वाटते. संसारातील आसक्ती, वासना यांचे प्रतीक म्हणजे मार. 

आपल्या मनात नेहमी श्रेयस आणि प्रेयस यांच्यात द्वंद्व सुरु असते. आपण सामान्य माणसे श्रेयस आणि प्रेयस यातील प्रेयसची निवड सामान्यपणे करतो. श्रेयस म्हणजे जे अंतिमतः हितकर आहे ते आणि प्रेयस म्हणजे जे आपल्याला प्रिय आहे ते. प्रेयस आपले हित करीलच असे सांगता येत नाही. गौतमाने श्रेयसची निवड केली. श्रेयसचा मार्ग खडतर, काटेरी असतो. तो त्यावर वाटचाल करण्यासाठी धैर्य, निर्धार यांची आवश्यकता असते. सहनशीलतेची आणि कष्टांची परीक्षा असते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याला यशाचा, समाधानाचा आणि साफल्याचा अमृतकुंभ हाती गवसतो. 

गौतमाचा सारथी आणि सखा छन्न मात्र त्याच्या घोड्यामागोमाग ऊर फुटेस्तोवर धावत होता. कोणतीही अपेक्षा न ठेवता खरा मित्र शेवटपर्यंत साथ देतो. प्रसंगी प्राणांचीही पर्वा करीत नाही. छन्नाने तेच केले. गौतमाने अनेक वेळा सांगूनही तो परत फिरला नाही. सिद्धार्थ अनोमा नदीच्या काठावर येऊन पोहोचला. ज्या कंथक नावाच्या अश्वावर स्वार होऊन सिद्धार्थ इथपर्यंत पोहोचला होता, ते मुके पण इमानी जनावर आता थकले होते. सिद्धार्थाने प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्या मुक्या जनावरालाही जणू आपल्या प्राणप्रिय धन्याचा होणार वियोग समजला होता. सिद्धार्थाने छन्नाची कशीबशी समजूत घातली. ' मित्रा, माझे ऐक. तू कपिलवस्तू नगरीला परत जा. महाराज शुद्धोधन आणि यशोधरेची समजूत घाल. मी त्यांच्यावर नाराज होऊन बाहेर पडलो नाही असं त्यांना सांग. ' छन्नाजवळ आपले दागिने आणि राजमुकुट सिद्धार्थाने दिले. मोठ्या नाराजीने आणि खिन्न मनाने छन्न परत निघाला. 

पुढील भागात गौतमाने केलेले तप, त्याला माराने दाखवलेले प्रलोभन किंवा मार सेनेशी त्याचा झाला सामना याचे जे चित्रीकरण अजिंठा लेण्यात आढळते, त्याबद्दल माहिती घेऊ या. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०५/०३/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 












Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..