थोडं मनातलं - आनंदनिधान
थोडं मनातलं आनंदनिधान जॉन किट्स नावाचा एक कवी असं म्हणतो की, A thing of beauty is joy forever . याचा अर्थ असा की एखादी खरोखरची सुंदर गोष्ट असते ती कायमस्वरूपी आनंद देणारी असते. त्या गोष्टीजवळ कधीही गेलं तर ती आनंदाचीच बरसात करणार. तिच्याजवळ असणारा तो आनंदाचा ठेवा कधीही कमी होत नाही. परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला लताबाईंची ( म्हणजे आपल्या लतादीदी हो ! ) पहिली जयंती साजरी झाली. त्या आता असत्या तर ९३ वर्षांच्या झाल्या असत्या. म्हणजे ही ९३ वी जयंती. लतादीदी म्हणजे आनंदनिधान होत्या. त्या होत्या तेव्हाही त्यांच्यावर भरपूर लिहिलं गेलं, बोललं गेलं. आता त्या नाहीत तरी त्यांच्यावर भरपूर लिहिलं जातंय, किंबहुना पहिल्यापेक्षा अधिकच लिहिलं जाईल. २८ तारखेला त्यांच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल सांगणारे खूप लेख आहे. वर्तमानपत्रांच्या शनिवार रविवारच्या पुरवण्या त्यांच्या लेखांनी रंगल्या. एकंदरीत २८ संप्टेंबरचा दिवस ' लतामय ' झाला होता. लतादीदींवर कोणी लिहिलं नाही ? ज्याला ज्याला वाटलं तो तो लिहिता झाला. अगदी आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांच्यापासून त...