व्हायचं तर नायक व्हा

 थोडं मनातलं 

व्हायचं तर नायक व्हा 

आपण मोठ्या आवडीने चित्रपट पाहत असतो. कधी मोठया पडद्यावर तर कधी घरातील छोट्या पडद्यावर. बहुतेक साऱ्या चित्रपटांच्या कथा नायक आणि खलनायक यांच्या संघर्षावर आधारित असतात. या संघर्षात शेवटी नायकाचा विजय होऊन खलनायकाचा पराजय किंवा अंत झालेला आपल्याला बघायला मिळतो. असं झाल्यावर आपल्यालाही आनंद होतो कारण आपल्यालाही वाटत असते की दुष्ट, खलप्रवृत्ती असलेल्या नायकाचा पराभव व्हावा आणि सद्गुणी असलेल्या नायकाचा विजय व्हावा. एका अर्थाने सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तींचा हा संघर्ष असतो. चांगल्या आणि वाईटातील हा संघर्ष पुरातन काळापासून चालत आला आहे. बऱ्याच वेळा समाजात चांगले हरताना दिसते आणि वाईटाचा विजय होताना दिसतो. पण ही स्थिती कायम राहत नाही. एक दिवस असा येतो की वाईट गोष्टींची, वाईट व्यक्तींची सद्दी संपते आणि चांगल्याचा विजय होतोच. The truth always prevails. 

नायकाचा विजय पडद्यावर पाहताना आपल्याला आनंद होतो खरा पण हा विजय मिळवण्यासाठी नायकाला किती परिश्रम करावे लागतात याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. म्हणून कधीही नायक समजून घ्यायचा असेल तर आधी खलनायक समजून घ्यावा लागतो. एकदा खलनायक समजला की आपल्याला कळते की त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी नायकाला किती जबरदस्त ताकद लावावी लागली आहे ! अगदी चाळीस पन्नास वर्षांपूर्वी आलेला शोले चित्रपट पहा. त्यावेळी केवढा गाजला होता ! तो गाजला कारण त्यात जो खलनायक होता तो जबरदस्त, क्रूर आणि पाशवी शक्ती असलेला. त्याच्याविरुद्ध लढणे सोपे नव्हते. किंबहुना कोणी तसा विचार देखील मनात आणण्याची हिंमत करत नव्हता. त्याची दहशत प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यातले संवाद बघा. तो गब्बर ( अमजदखान ) स्वतःच सांगतो. ' जब गांव में बच्चा रोता हैं तो माँ कहती हैं बेटा सो जा नही तो गब्बर आ जायेगा ' किंवा ' सरकारने पुरे पचास हजार का इनाम रख्खा हैं हमपर ' किंवा ' गब्बर से तुम्ही एकही आदमी बचा सकता हैं और वो हैं खुद्द गब्बर. ' या सारख्या त्याच्या संवादांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला होता. दहशत निर्माण केली होती. पण ठाकूर साहेबांच्या ( संजीव कुमार ) मदतीने दोन सामान्य चोरांनी ( अर्थात हिरोच ते ! जय आणि वीरू. अमिताभ आणि धर्मेंद्र ) आपल्या असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर या जुलमी खलनायकाचा अंत केला. तीच गोष्ट ' डॉन 'ची. ' डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन हैं वगैरे संवाद आपल्याला माहिती आहेत. पण शेवटी सत्याचा विजय होतोच ! बाहुबली समजून घ्यायचा असेल तर भल्लाल देव आणि कटप्पाला समजून घ्यावे लागेल. 

पण ही झाली सगळी रुपेरी पडद्यावरची उदाहरणे. प्रत्यक्ष जीवनात देखील जी महान मंडळी यशस्वी झाली आहेत, त्यांनाही अशीच झुंज आपल्या शत्रूशी द्यावी लागली आहे. प्रत्येक शत्रूच्या रूपात खलनायकच असेल असे नाही. काही वेळा विपरीत परिस्थिती देखील शत्रूच्या भूमिकेत असते. त्या परिस्थितीला मानसिक धैर्य खचू न देता तोंड देण्याची तयारी असावी लागते. 

दसऱ्याच्या दिवशी आपण रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून उत्सव साजरा करतो. रामायणात राम नायक आणि रावण हा खलनायक. रावणावर विजय मिळवण्यासाठी रामाला केवढी प्रचंड ताकद लावावी लागली असेल ! रावण हा महायोद्धा, शूरवीर. देवांनाही त्याने पराजित केले होते. शिवाय त्याचे सात पुत्र, भाऊ हे सगळे प्रचंड शूरवीर होते. कित्येक कोटीचे सैन्य त्याच्याकडे होते. शिवाय अहिरावण महिरावण यांच्यासारखे मायावी राक्षस होते. रावण स्वतः दशमुखी असून त्याच्या नाभीत अमृत होते. त्याची लंका चारही बाजुंनी सुरक्षित होती. सामान्य मनुष्य तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत मानव अवतारात असलेल्या श्रीरामांनी केवळ आपला शूर बंधू लक्ष्मण आणि सुग्रीव, अंगद, नल निल, जांबुवंत, हनुमान आणि वानरसेना यांच्या मदतीने रावणाचा पराभव केला. रावण आणि त्याची सेना रथातून लढत होती तर श्रीरामांना जमिनीवर उभे राहून त्याच्याशी लढावे लागले. हे सगळे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रावणाशी लढणे, त्याच्यावर विजय मिळवणे हे सोपे नव्हते. पण रावण हा अहंकारी होता, स्त्रीलंपट होता. त्याच्या या दुर्गुणांनीच त्याचा घात केला. 

दुसरे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. त्यांना ज्या शत्रूंविरुद्ध लढावे लागले ते औरंगजेब, अफजलखान हे केवढे प्रचंड होते. केवढी प्रचंड सेने, संपत्ती, शस्त्रे त्यांच्याकडे होती. त्यातुलनेत शिवाजी महाराजांकडे ना पुरेसे सैन्य होते, ना पुरेसा पैसा, ना शस्त्रास्त्रे. पण तरी देखील प्रचंड जिद्द त्यांच्या मनात होती. ध्येय ठरले होते. स्वराज्य स्थापनेचे. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी त्यांची तयारी होती. म्हणून नायक व्हायचं असेल तर पहिलं तत्व हे की तुम्हाला अत्यंत विपरीत परिस्थितीशी लढण्याची तयारी ठेवावी लागेल. 

त्यासाठी अंगी सद्गुण प्रयत्नपूर्वक जोपासावे लागतील. युद्धकला, प्रसंगावधान, चातुर्य आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचे गुण आत्मसात करावे लागतील. विशुद्ध चारित्र्याची जोपासना करावी लागेल. हे सगळं शिवाजी महाराजांनी केलं. प्रसंगी दोन पावलं मागे येण्याची देखील तयारी ठेवली. तहामध्ये काहीवेळा मोठ्या कष्टाने कमावलेला मुलुख गमावण्याची वेळ आली पण नैराश्य त्यांच्या मनाला शिवले नाही. त्याही परिस्थितीचा त्यांनी सामना केला. त्यांचं राज्य हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी होतं. ' मुद्रा भद्राय राजते. ' सर्व समाज आणि जातीपातीच्या लोकांना ते बरोबर घेऊन चालले. मग अशा या राजाला विजय मिळाला नसता तरच नवल ! 

विविध क्षेत्रातील यशस्वी झालेल्या कोणत्याही महान व्यक्तींचे उदाहरण घ्या. त्यांना अत्यंत विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागला आहे. रिलायन्सचे साम्राज्य उभारणारे धीरूभाई अंबानी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम या सारख्या कोणत्याही व्यक्तींची चरित्रे वाचली तरी त्यांना किती संघर्ष करावा लागला हे आपल्याला कळेल. आपल्याला त्यांनी मिळवलेले यश दिसते पण त्यामागील संघर्ष जर जाणून  घेतला तरच आपल्याला त्यांना यश मिळवण्यासाठी किती परिश्रम करावे लागले हे लक्षात येईल. 

एवढया तेवढ्या गोष्टीने निराश होणाऱ्यांनी ही सगळी उदाहरणे डोळ्याखालून घालावी. कोणतेही यश सुखासुखी मिळत नाही. त्यासाठी कष्ट करायची, संघर्ष करायची तयारी ठेवावी लागते. स्वप्नं बघावी लागतात आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द पण बाळगावी लागते. या सगळ्या कसोटीवर आपण खरं ठरलो तर यश आपलंच आहे. आपल्याला विपरीत परिस्थितीत देखील निराश न होता, मनोधैर्य टिकवून ठेवून संघर्ष करता आला पाहिजे. त्यासाठी गंभीर होण्याची आवश्यकता नाही. खंबीर आणि हसतमुख राहता आले पाहिजे. तेव्हा व्हायचंच तर नायक होऊ या ! या नवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२६/०९/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 






Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..