Posts

Showing posts from August, 2022

श्री गणेशाला दुर्वा प्रिय का ?

Image
थोडं मनातलं ‘ श्री गणेशाला  दुर्वा  प्रिय का...?’      नुकताच श्रावण महिना संपला आहे. पाऊस जरा कमीजास्त झाला असला तरी डोळ्यांना सुखावणारी हिरवळ सर्वत्र आहे. ऊन सावलीचा आणि पावसाचा खेळ सुरु आहे. तशातच मंगलमुर्ती श्री गणेशाचे आगमन झाले आहे. श्रावण आणि भाद्रपदात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. एरवी वर्षभर सहज उपलब्ध नसणारी विविध प्रकारची फुले, पाने, पत्री आपल्याला मुबलकपणे उपलब्ध होतात. हरतालिकेची पूजा करताना स्त्रिया विविध प्रकारची पत्री पूजेसाठी वापरतात. आणि गणेश चतुर्थीला आपण श्री गणेशाला एकवीस प्रकारची पत्री वाहतो. या प्रत्येक पानाफुलांमध्ये औषधी गुणधर्म दडलेले आहेत. आधुनिक जीवनशैलीत आपण निसर्गापासून थोडे दूर गेलो आहोत. त्यामुळे आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नसते. पण या सणांच्या निमित्ताने ती होते. आपल्या पूर्वजांनी किती कल्पकतेने निसर्गाचा आणि या सणांचा सुरेख मेळ घातला आहे. या निमित्ताने आपण निसर्गात जातो, आवश्यक ती पत्री मिळवतो, त्यांची माहिती करून घेतो. शहरातून हल्ली एवढे शक्य नसले तरी बाजारातून का होईना आपण ही पत्री, फुले, पाने,  दुर्वा  इ...

साखळी मानव्याची

Image
 थोडं मनातलं  साखळी मानव्याची  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने १५ ऑगस्टच्या आधी गावागावातून शालेय विद्यार्थ्यांची एक रॅली काढण्यात आली होती. गावातल्या सगळ्या शाळेतले मिळून चारपाच हजार विद्यार्थी तरी जमले असतील. या विद्यार्थ्यांचे तीन तीनचे गट करण्यात आले. अशा तीन तीन विद्यार्थ्यांची एक मोठीच रांग तयार झाली. गावातील एका टोकापासून सुरु झालेली ही रांग गावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचली. या मानवी साखळीनं जवळपास सर्व गाव पादाक्रांत केलं होतं. आमचं गाव तसं छोटं. त्यामुळे ही गोष्ट सहजशक्य होती. या मानवी साखळीने असा एकेक भाग जोडला जाऊन अख्खा गाव जोडला जाऊ शकतो. अशी अनेक गावं मानवी साखळीने जोडली जाऊ शकतात. या साखळीने तालुका, जिल्हा, राज्य आणि या संकल्पनेचा आणखी पुढे विस्तार केला तर आपला देश जोडला जाऊ शकतो. अनेक देश मिळून जगही जोडले जाऊ शकते.  कशासाठी बरं जोडता येईल ही साखळी ? ही साखळी जोडता येईल चांगल्या कामांसाठी, चांगल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी. ही साखळी मानवतेची असेल. एकमेकांचे हात हातात घेऊन आम्ही चालू लागलो तर केवढी मोठी शक्ती निर्माण होईल ! एकमेक...

उमलत्या वेळा

Image
 थोडं मनातलं  उमलत्या वेळा  सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच  भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी  हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.  सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्...

इकडची स्वारी

Image
 थोडं मनातलं  इकडची स्वारी  परवाच्या दिवशी एका लग्नाला गेलो होतो. लग्नाला वेळ होता. लग्नाचे विधी एका बाजूला सुरु होते. गुरुजींचे मंत्र सुरु होते. छानपैकी वातानुकूलित सभागृहात वऱ्हाडी मंडळी बसली होती. दुसऱ्या बाजूला एक धवल पडदा लावलेला होता. त्यावर वधूवरांचे लग्नापूर्वी झालेले चलतचित्रीकरण हल्ली ज्याला प्री वेडिंग शूट असे गोंडस नाव आहे ते सुरु होते. गुरुजींच्या हाती ध्वनिक्षेपक नसल्याने त्यांचे मंत्रपठण आणि विधी एका बाजूला निवांत सुरु होते. वधुवर आणि त्यांचे आईवडील त्यात अडकले होते. वऱ्हाडी मंडळी मात्र समोरच्या पडद्यावर दिसणारी चित्रफीत आणि निरनिराळे फोटो पाहण्यात मग्न होती. हल्ली लग्नापूर्वीच वधूवरांच्या भेटीगाठी, प्री वेडिंग शूटसाठी डेस्टिनेशन, तिथे एकदोन दिवस राहणे आदी गोष्टी होतात. काळाच्या ओघात झालेला हा बदल पाहून माझे मन नकळतपणे भूतकाळात गेले.  पूर्वीच्या काळी मुलींची लवकर लग्नं व्हायची. मुलगा आणि मुलगी यांच्या वयात बरेच अंतर असायचे. मुलगी लग्न होऊन सासरी जायची तेव्हा ते घर सासूसासरे. दीर, नणंद, भावजयी आदींनी भरलेले असायचे. त्या नवीन घरात हीच मुलगी तशी...