श्री गणेशाला दुर्वा प्रिय का ?

थोडं मनातलं

‘ श्री गणेशाला दुर्वा प्रिय का...?’



     नुकताच श्रावण महिना संपला आहे. पाऊस जरा कमीजास्त झाला असला तरी डोळ्यांना सुखावणारी हिरवळ सर्वत्र आहे. ऊन सावलीचा आणि पावसाचा खेळ सुरु आहे. तशातच मंगलमुर्ती श्री गणेशाचे आगमन झाले आहे. श्रावण आणि भाद्रपदात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. एरवी वर्षभर सहज उपलब्ध नसणारी विविध प्रकारची फुले, पाने, पत्री आपल्याला मुबलकपणे उपलब्ध होतात. हरतालिकेची पूजा करताना स्त्रिया विविध प्रकारची पत्री पूजेसाठी वापरतात. आणि गणेश चतुर्थीला आपण श्री गणेशाला एकवीस प्रकारची पत्री वाहतो. या प्रत्येक पानाफुलांमध्ये औषधी गुणधर्म दडलेले आहेत. आधुनिक जीवनशैलीत आपण निसर्गापासून थोडे दूर गेलो आहोत. त्यामुळे आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नसते. पण या सणांच्या निमित्ताने ती होते. आपल्या पूर्वजांनी किती कल्पकतेने निसर्गाचा आणि या सणांचा सुरेख मेळ घातला आहे. या निमित्ताने आपण निसर्गात जातो, आवश्यक ती पत्री मिळवतो, त्यांची माहिती करून घेतो. शहरातून हल्ली एवढे शक्य नसले तरी बाजारातून का होईना आपण ही पत्री, फुले, पाने, दुर्वा इ. गोष्टी विकत आणतो. या सर्वांमध्ये दुर्वांचे महत्व काही वेगळेच आहे.

     गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत या संबंधी दोनतीन कथा आहेत. त्या आपण या निमित्ताने पाहू या. दुर्वा हे ब्रह्मदेवाच्या कन्येचे नाव. ती अत्यंत सुंदर होती. तिने तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. पण पुढे तिला आपल्या सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा गर्व झाला. इतका की ती देवी लक्ष्मीला सुद्धा तुच्छ समजू लागली. तेव्हा तिचा गर्व हरण करण्याच्या उद्देशाने देवीने तिला शाप दिला की पृथ्वीवर तृणरूपाने राहशील. या मुळे दुर्वेला खूपच वाईट वाटले. तिने पुन्हा उग्र तप केले. आणि श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. म्हणून गणेशाला दुर्वा प्रिय आहेत. दुसरी कथा अशी आहे की, अनलासुर नावाचा एक राक्षस होता. अत्यंत जुलमी आणि अन्यायी. देवांनाही त्याच्यापुढे हार खावी लागत होती. अशा वेळी संकटातून कोण वाचवणार ? तर विघ्नहर्ता गजानन ! म्हणून सगळे देव गणपतीला शरण गेले. त्यावेळी गणपती बाल रुपात प्रकट झाला. त्याने देवांना मी अनालासुराचा निःपात करतो. तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन दिले.

     बालगणेशाने अनलासुराला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. अनलासुर हा अक्राळविक्राळ, डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडणारा आणि प्रचंड मोठा आवाज असणारा होता. त्याच्या आवाजाने धरणी सुद्धा कंपित होत असे. त्याने मोठ्या आवेशाने बालगणेशालाच गिळून टाकण्याचा प्रयत्न केला. पण गणेशाने आपल्या दैवी सामर्थ्याने त्यालाच गिळंकृत केले. अनलासुर ठार झाला. सर्वत्र आनंदीआनंद झाला. देवांनी गणेशाचा जयजयकार केला. पण अनलासुराला गिळल्याने गणेशाच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. तो शांत करण्यासाठी पार्वतीने त्याला चंदनाचा लेप लावला. शंकराने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला. म्हणून श्री गणेशाला भालचंद्र हे नाव मिळाले. तसेच त्याच्या अंगाची आग शांत व्हावी म्हणून आपल्या गळ्यातील नाग त्याच्या कमरेला बांधला. एवढे करूनही आग कमी होईना. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्याकडील कमळ त्याला दिले. म्हणून त्याला पद्मपाणी हे नाव मिळाले. वरुणाने पाण्याचा अभिषेक केला.

      या नंतर काही ऋषिगण तेथे आले. त्यांनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी श्री गणेशाच्या मस्तकावर ठेवली. या उपायामुळे त्याला तत्काळ बरे वाटू लागले, त्याच्या अंगाचा दाह कमी झाला. म्हणून श्री गणेशाने सांगितले की जो कुणी मला श्रद्धेने दुर्वा अर्पण करील, त्याला हजारो यज्ञांचे आणि तपश्चर्येचे पुण्य प्राप्त होईल. तीर्थयात्रा आणि दानधर्म केल्याचे पुण्य मिळेल. म्हणून आपण श्री गणेशाला दुर्वा वाहतो. दुर्वामध्ये शीतलता आहे. उष्णतेच्या विकारावर दुर्वांचा रस उपयोगी आहे.

     दुर्वांचे महत्व सांगणारी दुसरी एक कथा आहे. पूर्वी कौंडींण्य ऋषी आपल्या आश्रमात आपली पत्नी आश्रया हिच्यासोबत राहत होते. आपल्या पत्नीला श्री गणेशाची महती सांगताना त्यांनी तिला दुर्वांचे महत्व सांगितले. पण ते ऐकून तिला आश्चर्य वाटले. एक प्रकारे तिने अविश्वास प्रकट केला. तेव्हा तिला दुर्वांचे महत्व पटावे म्हणून त्यांनी तिच्या हातात एक दुर्वांची जुडी दिली आणि सांगितले की इंद्राकडे जाऊन तिच्या भाराचे सुवर्ण घेऊन ये. आपल्या पतीच्या आदेशानुसार आश्रया इंद्राकडे गेली. आणि तिने आपल्या पतीचा निरोप इंद्राला सांगितला. ते ऐकून इंद्रही विचारात पडला. त्याने आपला सेवक तिच्यासोबत देऊन तिला कुबेराकडे पाठवले. कुबेराने आपल्या परीने प्रयत्न करून पाहिला. त्याच्या भांडारातील सर्व सोने एका पारड्यात टाकले तरी दुर्वांचे पारडे जडच होते. त्याने मग सर्व देवांना पाचारण केले. इंद्र, कुबेर, विष्णू, शंकर आदी सर्व देव पारड्यात बसले तरी दुर्वांचे पारडे जडच होते. यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असणार ही जाणीव इंद्राला आणि श्री विष्णूला झाली. आणि ते आश्रयासह कौंडीण्य ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी ऋषींनी त्यांना दुर्वांची महती कथन केली आणि सांगितले की गणेश हा त्रैलोक्याचा स्वामी असून त्याच्याहून किंवा त्याने धारण केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा काहीही श्रेष्ठ नाही.

     श्री गणेशाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी या प्रतिकात्मक आहेत. त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी संदेश आहे. अनलासुर हा राग, लोभ आदि षड्रिपूंचे प्रतिक आहे. त्याचा नाश गणपतीने केला. त्यांचा नाश करण्यासाठी किंवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्या करताना अंगात उष्णता निर्माण होते. ती उष्णता कमी करण्यासाठी दुर्वांचा उपयोग होतो. दुर्वा या एकवीस का वाहाव्यात किंवा एकवीस या संख्येचे काय महत्व आहे ? तर पृथ्वीवर सात खंड आहेत. सात समुद्र आहेत. सात वार आहेत. शरीरातही सप्त धातू आहेत. विवाहातही सप्तपदी आहे. आणि सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. या साताला तीनने गुणले की उत्तर एकवीस येते. श्री गणेश हा सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे असलेले दैवत आहेत. कालही तीन आहेत. वर्तमान, भूत आणि भविष्य. श्री गणेश हा आदिदेव. तो या सगळ्यांच्या पलीकडे. पृथ्वी, आकाश आणि पाताळ हे ही तीन लोक तो व्यापून उरला आहे. मानवी शरीराच्या तीन अवस्था आहेत. जन्म, जरा आणि मृत्यू. अशा या सगळ्या प्रतीकात्मक गोष्टी.

     दुर्वा या श्रीमंतापासून गरीबांपर्यंत सर्वाना सहज उपलब्ध होतील अशा आहेत. अलीकडे चांदीच्या दुर्वा पण श्री गणेशाला वाहिल्या जातात. पण खऱ्याखुऱ्या दुर्वाच श्री गणेशाला जास्त प्रिय आहेत. दुर्वा म्हणजे दिसायला गवत किंवा हरळी. पण त्यांचे महात्म्य मोठे. तेव्हा या गणेशोत्सवात गणपतीला प्रिय असणारे मोदक तर वाहू या, प्रसाद म्हणून भक्षण करू या पण दररोज कमीत कमी एकवीस दुर्वांची एक जुडी आणि प्रिय असणारे जास्वंदीचे फुल तरी श्री गजाननाला भक्तिभावे अर्पण करू या.

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२९/८/२०२२




Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..