थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं 

लग्नाला जातो मी ... 

मराठीमध्ये लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे. जो कोणी या अनुभवातून जाईल त्यालाच त्यातला गहन अर्थ कळतो. म्हणतात ना ' जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे .' काय एकेक म्हणी आठवताहेत आज ! आपल्या मराठी भाषेचा प्रभाव, दुसरं काय ! तर ते असो. झालं असं की काही दिवसांपूर्वी मी एका लग्नाला गेलो होतो. लग्न केल्याचा आणि घर बांधल्याचा असे दोन्ही अनुभव मी घेतले. त्याला बरीच वर्षे झाली. त्याबद्दल नाही बोलत मी. उगीच कशाला सांगायचे ते ! अहो, आपले अनुभव आपल्यापाशी असलेले बरे. नाहीतर कोण काय म्हणेल काही सांगता यायचे नाही. हां, तर मी काय सांगत होतो ? तर मी एका लग्नाला गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे ? आम्ही सगळेच जातोच की लग्नाला. तर मंडळी, मला काय म्हणायचे आधी नीट ऐकून तर घ्या. 

मी आणि आमच्या सौ एका लग्नाला गेलो होतो. लग्न ठरले ठरले म्हणून बऱ्याच दिवसांपासून कानावर येत होते. जवळच्या नात्यातील लग्न असल्याने ते लांब असले तरी जाणे क्रमप्राप्त होते. तेव्हा आम्ही लग्नाच्या एक दिवस आधीच इच्छित ठिकाणी पोहोचलो. मी आधीपासून आमच्या हिला म्हणत होतो की आपण मंगल कार्यालयात मुक्काम करण्याऐवजी एखाद्या हॉटेलमध्ये राहू या म्हणजे झोप वगैरे व्यवस्थित होते. पण हिने नेहमीप्रमाणे माझे म्हणणे फेटाळून लावले. तिचा एक भाऊ कधीही आणि कुठेही लग्नाला गेला तरी तो कार्यालयात राहत नाही. एखाद्या हॉटेल किंवा रेस्ट हाऊसमध्येच त्याची मुक्कामाची व्यवस्था असते. असे असूनही आमच्या हिने माझे ऐकले नाही. ती म्हणाली, ' अहो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांनी एक मोठे हॉटेलच लग्नासाठी घेतले आहे. भरपूर खोल्या आणि राहण्याची छान व्यवस्था आहे. ' मी विचार केला की ठीक आहे. बघू या. 

आम्ही  पोहोचलो तेव्हा कार्यालयात  काही वऱ्हाडी मंडळींची फारशी वर्दळ नव्हती. मात्र सुखद आश्चर्य म्हणजे वराकडील मंडळी मात्र तेथे नुकतीच येऊन डेरेदाखल झाली होती. आम्ही कार्यालयात पोहोचलो तेव्हा सकाळी साधारण साडेदहा अकराची वेळ होती. उपस्थित मंडळींचा गरमागरम नाश्ता सुरु होता. कचोरी, सामोसे असा फर्मास मेनू होता. बाजूलाच चहा, कॉफीची सोय होती. यजमानांनी आम्हाला पाहताच आमचे स्वागत केले आणि नाश्त्याचा आग्रह केला. मला तसे कोणाला नाराज करणे आवडत नाही. त्यामुळे मी त्यांच्या आग्रहानुसार माझे पाय त्या नाश्त्याच्या काउंटरकडे वळवले. एक कचोरी आणि सामोसा खाऊन झाल्यावर मला जेवणाची आठवण झाली. थोड्या वेळाने जेवायचे पण आहे त्यामुळे मनाची समजूत घातली आणि नाश्ता आवरता घेतला. चहा, कॉफीचीही सोय असल्याने आपण ती घेतली नाही असे उगाच होऊ नये म्हणून एक छानपैकी चहा घेतला. 

ते कार्यालय म्हणजे एक प्रशस्त हॉटेल होते. खाली लग्नासाठी, जेवणासाठी मोठा हॉल, बाहेर पुन्हा संध्याकाळी जेवणाचे स्टॉल लावता येतील अशी जागा आणि मंडप, आणि वरच्या दोन मजल्यांवर प्रशस्त अशा प्रकारची निवासव्यवस्था असलेल्या खोल्या होत्या. ही सगळी व्यवस्था पाहून ' दिल खुश ' झाले. तेवढ्यात यजमानांनी एका रूमची चावीच आमच्या हाती सोपवली. आता आपण लग्नाला आलो आणि इथेच थांबलो ते फार बरे केले असे वाटू लागले होते. मग पहिल्या मजल्यावर आमची खोली असली तरी उदवाहिकेची ( मराठीत ' लिफ्ट ' म्हणतात बहुतेक ) सोय असल्याने जिना चढण्याचा त्रास कशाला घ्या असा प्रामाणिक विचार करून त्यातून वर गेलो. चावीने दरवाजा उघडला आणि तोंडातून उद्गार निघाले, ' वा, क्या बात हैं.' प्रशस्त रूम होती. रूममध्ये दोन डबलबेडची सोय होती. म्हणजे एकूण चार व्यक्ती व्यवस्थित झोपू शकणार होत्या तर ! शिवाय ए सी ( अर्थात थंडी असल्यामुळे त्याची गरज पडली नाही ), टीव्ही, कपाटे वगैरे सोय होती. हे सगळे पाहून अस्मादिक कमालीचे खुश झाले. आता रात्रीपर्यंत तेथे कोणी इतर येणार नव्हते. मग पुन्हा इथे थांबण्याचा  निर्णय घेतला, तो फार चांगला ठरला असे पुन्हा वाटून गेले. 

सकाळी लवकर उठल्याने आणि प्रवासाने कंटाळलो असल्याने जेवणाची वेळ होईतो छान आराम करावा असे वाटले. इतक्यात तर लगेच कोणी येणार नव्हते तेव्हा आता संध्याकाळ होईपर्यंत छानपैकी इथे आराम करता येईल असे मनाशी ठरवून कपडे बदलणार तोच आमच्या सौभाग्यवतीची एक बहीण, तिचा मुलगा, तिची सून, छोटा नातू वगैरे मंडळी अचानक हजर झाली. त्यांच्यात असे ठरले की या रूममध्ये फक्त स्त्रियांनी थांबावे आणि आम्हा पुरुष मंडळींसाठी एक वेगळी शेजारील रूम घ्यावी. झाले, मग काय मी माझी बॅग उचलली आणि शेजारच्या खोलीत गेलो. मला वाटले की आता आपण निवांत. कोणी आपल्या आरामात व्यत्यय आणणार नाही. असा विचार करून थोडं पडावं असा विचार केला तोच खाली जेवणाची तयारी झाली असा निरोप आला. लागोपाठ दोन तीन जण हा निरोप देण्यासाठी तत्परतेने खोलीत येऊन गेले. आता फारशी भूक नसली तरी जेवणासाठी जाणे भागच होते. आता जेवण झाल्यावर मस्तपैकी आराम करू असा बेत मनाशी आखला आणि जेवणासाठी खाली गेलो. 

भोजनासाठी विविध पदार्थांची रेलचेल होती. मात्र आपल्याला हवे ते आणि हवे तेवढेच घेऊन आणि हातात वाढलेले ताट घेऊन बसण्यासाठी खुर्चीचा शोध घेतला. अशा प्रसंगी ताटात वाढून घेणे आणि बसण्यासाठी सोयीस्कर जागा शोधणे ही कामे मला फार कठीण वाटतात. कारण हातात ताट घेऊन चालण्याची कसरत, त्यातून कोणाला आपला धक्का लागून ते सांडू नये याचीही काळजी घ्यावी लागते. एकदा अशाच एका प्रसंगी माझा लग्नासाठी आणलेला चांगला पोशाख अन्न अंगावर सांडल्याने खराब झाला आहे. ( अर्थात त्यात माझी चूक नव्हतीच. दुसराच येऊन मला धडकला होता. तर असो. काही लोकांना हे सगळे फार छान जमते. एवढया गर्दीत हातात ताट घेऊन उभ्या उभ्या सुद्धा ही मंडळी जेऊ शकतात. खरे तर अशी मंडळी प्रशंसेला पात्र आहेत. पण त्यांची बिचाऱ्यांची कोणी दखल घेत नाही. तर असो. सुदैवाने मला बसण्यापुरती एक रिकामी खुर्ची दिसली. एखादे वेळी अशी का होईना पण आपल्याला खुर्ची मिळाली याचा कोण आनंद मला त्यावेळी झाला ! 

आता विविध पाहुण्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली होती. काही नुकतेच येऊन जेवणात सामील झाले होते तर काही मंडळी आपापल्या बॅगा सावरत येत होती. यातील बरीच मंडळी बऱ्याच वर्षांनी भेटत असल्याने त्यांच्याशी बोलणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे जेवणानंतर आराम करण्याचा जो प्रामाणिक विचार माझ्या मनात आला होता, त्याला मी थोडा आवर घातला. मनात म्हटलं, ' जाऊ द्या यार, आराम काय आपण नेहमीच करतो. जरा सगळ्यांशी गप्पा मारू.'  त्याप्रमाणेच झाले. थोड्या गप्पा टप्पा, बाहेर इकडे तिकडे चकाट्या पिटणे यात छान वेळ गेला. तोपर्यंत चार वाजले होते. आता सीमांत पूजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी पुन्हा ड्रेस वगैरे घालून तयार झालो. साधारण सहा वाजेपर्यंत तोही कार्यक्रम आटोपला. नाश्ता, जेवण, चहा, सीमांत पूजन आदींच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जाताना पहिल्यांदाच पाहत होतो. 

कार्यक्रम आटोपला. हिवाळा असल्याने अंधार लवकर पडायला सुरुवात झाली होती. दिवस मावळला होता आणि त्याबरोबरच आराम करण्याचा विचारही मावळला. आता रात्रीच छानपैकी झोप मिळेल असा पोक्त विचार करून जेवणाच्या वेळेपर्यंत सगळ्यांशी छान गप्पा झाल्या. रात्रीच्या जेवणाचे काउंटर्स बाहेरच्या बाजूला मंडपात लावले होते. पाणीपुरी, शेवपुरी, टोमॅटो सूप पासून तर मुख्य जेवणापर्यंतच्या सगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती. जो ज्याला जे आवडेल त्याच्यावर ताव मारत होता. पोटाचा विचार करण्यापेक्षा यजमानांनी इतके विविध पदार्थ ठेवले आहेत, त्यांचाही जरा विचार करावा, त्या पदार्थांनाही न्याय द्यावा असा प्रामाणिक विचार बहुतेक मंडळी करताना दिसत होती. मला त्यांच्या या न्यायप्रियतेचे कौतुक वाटले. 

अशा रीतीने जेवणं वगैरे आटोपून रूममध्ये परत येईपर्यंत साडेनऊ दहा झाले. रूममध्ये दोन दोन डबलबेड असल्याने चार माणसांची सोय होतीच. चार जण येऊन दाखलही झाले होते. पण ऐनवेळी आणखी एक जण आल्यावर एका बेडवर तीन जण अशी तडजोड करण्यात आली. माझ्या बेडवर मात्र सुदैवाने आम्ही दोघेच जण होतो. माझ्याशेजारी जी व्यक्ती झोपली ती फारच गप्पिष्ट निघाली. रात्री अकरा साडेअकरा पर्यंत त्यांचे निरनिराळे किस्से सांगणे सुरूच होते. शेवटी मी त्यांना होकार भरणे बंद करून शांत पडलो. इतरांशी मात्र त्यांचे बोलणे सुरूच होते. केव्हातरी बारा साडेबाराच्या सुमारास ते झोपले. त्यांचे घोरणे सुरु झाले. घोरण्याचा आवाज रात्रीची शांतता भंग करीत होता. मी शेजारीच झोपलेलो असल्याने माझ्या कानाजवळ तर मोठाच आवाज येत होता. बराच वेळ त्या आवाजाने मला झोपच लागली नाही. एक दोन वेळा मी हाताने त्यांना ढोसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरी आवाज कमी होईल अशी एक आशा मनात होती. पण छे ! माझ्या ढोसण्याचा काही एक परिणाम होत नव्हता. ते दुसऱ्या बाजूला तोंड फिरवून केव्हा तरी झोपतील आणि आपल्याला थोडी झोप लागेल हा अंदाजही त्यांनी चुकीचा ठरवला. रामायणात कुंभकर्णाला उठवताना रावणाला किती त्रास झाला असेल त्याची कल्पना आली. मग काय ' करवटे बदलते रहे सारी रात हम ...' अशी आमची अवस्था झाली. अशी ही लग्नघरची रजनी कशी तरी संपली. 

सकाळी सहा वाजताच, ' उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली ' या जाहिरातीप्रमाणे ' उठा उठा खाली चहा कॉफी आली. अंघोळीची वेळ झाली. ' यासारखी वाक्ये कानावर पडू लागली. आता उठणे क्रमप्राप्त होते. खाली गेलो तोवर सुरुवातीचा चहा संपला होता. कॉफी मात्र शिल्लक होती. पण माझ्यासारख्या चहाचे चाहते असणाऱ्या व्यक्तीला दिवसाची सुरुवात चक्क कॉफीने करावी हे न मानवण्यासारखे होते. त्यामुळे ' खाईन तर तुपाशी...' या म्हणीप्रमाणे दिवसाची सुरुवात करीन तर ती चहानेच असे ठरवले होते. आणि एकदा केलेले नियम मी पाळतो, त्यामुळे मी चहासाठी आणखी थोडा वेळ थांबलो. मग छानपैकी चहा आला. रात्रीची अपुरी झोप, चहाची दीर्घ वेळ वाट पाहावी लागणे या सगळ्या गोष्टींची भरपाई मी डबल चहा घेऊन केली. यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी उरकायच्या होत्या. रूममध्ये माणसे पाच, बाथरूम एक असा प्रकार असल्याने मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या असतील याचा अंदाज तुम्ही करू शकाल. सुज्ञास अधिक सांगणे नलगे. त्यातही पुन्हा गरम पाणी न येणे, चुकून भलताच नळ सुरु होऊन वरून शॉवरचे थंडगार पाणी अंगावर पडणे या गोष्टी घडल्या. अशा सगळ्या दिव्यातून पार पडून आम्ही लग्नाच्या वेळी छानपैकी हजर राहू शकलो याचा आनंद झाला. दुपारी लग्न लागल्यानंतर तातडीने आपले चंबूगबाळे आवरले आणि यजमानांचा निरोप घेऊन निघालो. 

( या लेखात कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही. वाचकांना निर्भेळ विनोदाचा आनंद मिळावा एवढ्याच माफक उद्देशाने हा लेख लिहिला आहे.)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१०/०२/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..