दीपावली : आनंद आणि प्रकाशपर्व
थोडं मनातलं दीपावली : आनंद आणि प्रकाशपर्व वर्षभर ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो आपला सर्वात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी किंवा दीपावली. या सणाच्या निमित्ताने खूप काही गोष्टी आपण मनात ठरवलेल्या असतात. वर्षभरात आपल्याला एखादी वस्तू हवी असते. ही वस्तू म्हणजेच एखादी अतिउपयोगी, अतिमौल्यवान अशी गोष्ट असते, जी वर्षभरात केव्हाही घेता येत नाही. मग आपण ठरवतो की या दिवाळीला आपण अमुक एक वस्तू घेऊ या. मग ते नवीन वाहन असेल, जागेची खरेदी असेल, एखादा दागिना, नवीन कपडे असतील वा अन्य काही. दिवाळीच्या सुमुहूर्तावर आपण अशा प्रकारची खरेदी करतो. या निमित्ताने बाजारातही कोट्यवधींची उलाढाल होते. आर्थिक व्यवहारांना चालना मिळते. याच काळात छोटे छोटे व्यावसायिक सुद्धा आपली आर्थिक प्रगती करू शकतात. समाजातील काही घटक वर्षभर तसे उपेक्षित राहिलेले असतात. त्यांच्याही पदरात हा सण दोन पैसे टाकतो. पणत्या, घडे बनवणारा कुंभार, केरसुणी बनवणारे कारागीर, पादत्राणे बनवणारे गावाकडील चर्मकार, हॉटेल व्यावसायिक, हलवाई इ सर्वानाच यानिमित्ताने काम मिळते. त्याचबरोबर साफसफाई करणारे कामगार, रंग देणारे कारा...