सुहास्य तुझे मनास मोही...

थोडं मनातलं 

सुहास्य तुझे मनास मोही... 

अशी कल्पना करू या की बाजारात आपण फेरफटका मारायला गेलो आहोत. एका दुकानात तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे विक्रीस ठेवले आहेत. काहींचा चेहरा हसरा आहे, काही रागट आहेत, काही रडके आहेत, काही उदास दीनवाणे आहेत तर काही भयंकर किंवा भेसूर वाटताहेत. असे वेगवेगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. आपल्याला सांगितले की तुम्ही यातून तुम्हाला जो आवडेल तो चेहरा निवडा. आपण सगळे कोणता चेहरा किंवा मुखवटा पसंत करू ? तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. हसतमुख असलेला मुखवटा कोणीही हसत हसत पसंत करील. आपल्या जीवनातही असेच आहे. हसतमुख, सुहास्य मुखावर विलसत असलेली व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. काही काही लोक अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहतात तर सगळे काही अनुकूल असूनही काहींच्या चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले असतात. 

आमचे एक नातेवाईक होते. त्यांचा चेहरा नेहमी गंभीर असे. त्यांच्या शेतात आमचाही वाटा असणारी काही आंब्याची सामाईक झाडे होती. वर्षातून एकदा आंबे आल्यानंतर ते माणसं लावून उतरवावे लागत. असे आंबे उतरवून ते त्यांच्या घरी बैलगाडीने घेऊन येत. मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना उतरवण्याचा आणि आणण्याचा जो काही खर्च आला असेल तो देऊन आंबे घरी आणत असू. आंबे कधी येतात आणि काकांचा निरोप कधी येतो याची आम्ही वाटच पाहत असू. तर आंबे उतरवले की काका आमच्या घरी ते सांगायला येत असत. अर्थात ते कशासाठी आले आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नसायची. ते माझ्या वडिलांपेक्षा वयाने मोठे असल्याने त्यांना नावाने हाक मारत. हाश हुश्श करीत घरात प्रवेश करीत. आधी मला हाक मारून, ' विश्वास, पाणी आण. ' असे म्हणत. मी पाणी दिले की, ' विष्णू कुठे आहे ? ' अशी माझ्या बाबांच्या संदर्भात विचारणा करीत असत. मग वडील समोर आले की, ' विष्णू, अरे आंबे आले आहेत खेड्यावरून. ते घेऊन जा बाबा. ' तोपर्यंत आम्ही सगळे मानसिक तणावात असायचो. आम्हाला वाटायचे की काका काहीतरी गंभीर बातमी घेऊन आले आहेत. पण आंबे आले आहेत ही तर आनंदाची बातमी असायची. पण एवढी आनंदाची बातमी देखील ते अत्यंत गंभीरपणे सांगायचे. मग लक्षात आले की अरे हा तर यांचा स्वभावच आहे. मग मनातल्या मनात त्यांचे नाव गंभीरराव ठेवले होते. 

Smile and the world smiles with you असे एक छान इंग्रजी वाक्य आहे. तुम्ही हसलात तर जग हसेल. तुम्ही जसे असाल तसेच जग तुम्हाला वाटेल. लहान मुलं किती आनंदी असतात ! त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाही आनंद वाटतो. आनंदही एखाद्या व्हायरस सारखा असतो. तो सभोवताली पसरत जातो. भोवतालच्या माणसांना आपल्या आनंदात सामील करून घेतो. अशा वेळी चेहऱ्यावर गंभीरतेचा मास्क लावायचा नसतो. त्यात सामील व्हायचे असते. लहान मुलं खूप आनंदी का असतात यामागील कारणाचा आपण कधी विचार केला आहे का ? त्याचे कारण आहे ती दिवसातून अनेक वेळा खळखळून हसतात. त्यांना काही कारण लागत नाही. ते हसतात म्हणून आनंदी असतात. आणि आनंदी असतात म्हणून हसत राहतात. 

जसजसे आपले वय वाढते तसतसे आपले हसणे कमी होत जाते. पण हे तितकेसे खरे नाही. आपले हसणे कमी होत जाते म्हणून आपले वय वाढत जाते. सदैव हसतमुख असणारी माणसे वयाला पराभूत करतात. वय ही त्यांच्यासाठी फक्त एक संख्या असते. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा तेथील देवाच्या मुद्रेवरचे प्रसन्न भाव पाहून आपलेही मन आनंदित होते. परमेश्वर आनंदस्वरूप आहे. म्हणूनच परमेश्वराच्या मूर्ती कायम प्रसन्न असतात. श्रीकृष्णाचे वागणे बोलणे कसे होते हे आपण प्रत्यक्ष तर पाहिले नाही पण आतापर्यंत त्याच्याबद्दल जे काही वाचले, मालिकांमध्ये पाहिले, त्या सगळ्यात त्याच्या प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो. संकटांना सुद्धा हसतमुखाने सामोरे जा ही आपल्या राम कृष्ण आदी देवांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे. आपण नेमकी तीच विसरतो. 

साधना, तपश्चर्या करणाऱ्या मंडळींच्या, साधू संतांच्या मुखावर एक विलक्षण तेज आणि प्रसन्नता विलसत असते. त्यांची मुद्रा कायम आनंदी असते. कारण हा आनंद आतून एखाद्या फुलासारखा उमलून आलेला असतो. वृत्ती आनंदी असली की आपला चेहरा ती आपोआपच दर्शवतो. चेहरा हा मनाचा आरसा आहे. मन स्वच्छ तर चेहरा स्वच्छ. चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरणारांची गोष्टच वेगळी. त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण शरीराच्या स्वच्छतेसाठी जसा साबण आवश्यक तसाच मनाच्या निर्मळतेसाठी हास्ययोग आवश्यक. परमेश्वराने हास्य ही मानवाला बहाल केलेली देणगी आहे. इतर कोणत्याही प्राण्याला ती नाही. गोष्टीतले प्राणीच फक्त हसतात. 

समोरच्या ओळखीच्या व्यक्तीला पाहून तर आपण स्मितहास्य करतोच पण अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरही आपण जर सुहास्य मुद्रेने त्यांना सामोरे जाऊ शकलो तर संबंधात एक मोकळेपणा, नैसर्गिकपणा येतो. काही व्यक्ती हसण्यातही काटकसर करतात. मोजून मापून हसतात. कोणी कोणी तर चेहऱ्यावरची गंभीरतेची इस्त्री मोडू देत नाहीत. म्हणून ' एखादी तरी स्मितरेषा...' असे म्हणावे लागते. पण आपण जर खळखळून हसलो तर त्याचे अनेक फायदे होतात. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून चेहरा प्रसन्न दिसतो. हृदय, फुफ्फुसानाही अधिक प्राणवायू मिळतो, व्यायाम होतो. असं म्हणतात की चालणाऱ्याचं नशीब चालतं, बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं. त्याच धर्तीवर हसणाऱ्याचं नशीबही हसतं, रडणाऱ्याचं नशीबही रडतं असं म्हणायला हरकत नाही. हसतमुख असणारी माणसं संकटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. 

नॉर्मन कझिन्स या नावाचा एक पत्रकार होता. तो एका दुर्धर आजाराने बिछान्याला खिळून होता. रुग्णालयात त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार सुरु होते. अनेक प्रकारची वेदनाशामक औषधें घ्यावी लागत होती. त्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने चार्ली चॅप्लिनचा चित्रपट बघितला. तो खळखळून हसला. त्याला असे आढळून आले की त्या दिवशी त्याला वेदनाशामक औषधांशिवाय झोप लागली. मग त्याने विनोदी साहित्य वाचायला सुरुवात केली. औषधोपचारांच्या जोडीला रोज तो खळखळून हसू लागला आणि काय आश्चर्य ! काही दिवसांनी तो पूर्ववत बरा झाला. त्याची वेदनाशामक औषधे थांबली. तो पूर्ववत सगळी कामे करू लागला. आपल्या अनाटॉमी ऑफ इलनेस या पुस्तकात त्याने ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे. त्याला असे आढळून आले की आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचा एक स्त्राव स्त्रवतो. हे एन्डॉर्फिन वेदना शांत करण्याचे कार्य करते. मनाची मरगळ दूर करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. खळखळून हसण्याने रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ सिगमंड फ्राईड यांनीही हसण्याचे फायदे सांगताना हसण्यामुळे मनातील राग, द्वेष, ताण तणाव यासारख्या नकारात्मक भावना नष्ट होतात असे म्हटले आहे. हसण्याबद्दल लिहिताना नॉर्मन कझिन्स म्हणतो, ' हसणं हे एखाद्या ब्लॉकिंग एजंटसारखं आहे. ते जणू बुलेटप्रूफ जाकीट आहे. नकारात्मक भावनांपासून ते तुमचं रक्षण करतं. ' 

विनोदी चित्रपट, विनोदी नाटके यांना लोकांची कायमच पसंती असते ती यामुळेच. तास दोन तास खळखळून हसल्याने मनातली मरगळ निघून जाते, नकारात्मक भावनांचा निचरा होतॊ आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागते. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, मार्क ट्वेन यांच्यासारख्या लेखकांचे विनोदी साहित्य म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा आहे. मधुकर तोरडमल हे विलक्षण ताकदीचे कलाकार होते. त्यांच्या ' तरुण तुर्क म्हातारे अर्क ' या नाटकातील ' ह हा हि ही ' ची बाराखडी कमालीची मजा आणते. त्यातून वेगळा विनोद, वेगळा अर्थ निर्माण होतो. प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला या ' ह ' च्या बाराखडीचा वापर करणारे पुष्कळ लोक भेटतात. त्यांचं बोलणं ऐकताना मोठी मजा येते. प्रसंगी स्वतःच्या चुकांवरही हसता आले पाहिजे. अशी माणसे मनाने निर्मळ असतात. 

पूर्वी आमच्याकडे एक दूधवाला दूध घालण्यासाठी यायचा. तो ' दूध घ्या ' म्हणायच्या ऐवजी त्याच्या खर्जातल्या आवाजात  ' चला, भांडं घ्या ' असं म्हणायचा. मला त्याची खूप गंमत वाटायची. आमच्याकडे भांड्याधुण्यासाठी येणाऱ्या बाई बाहेरच उभ्या राहून फक्त ' ताईsss ' असा आवाज देतात. मग आपण समजून घ्यायचं की त्यांना भांडीधुणी करायची आहेत. कधी कधी एखाद्या ठिकाणी स्फोटक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी कोणी एखादा हलकाफुलका विनोद केला तर वातावरणातील तणाव लगेच निवळायला मदत होते. आमच्या शाळेत घडलेला एक किस्सा आहे. एकदा वार्षिक परीक्षा सुरु असताना झालेल्या पेपर्सचे गट्ठे तपासण्यासाठी शिक्षकांना वाटप करण्यात येत होते. विद्यार्थी आणि वर्गसंख्या वाढल्याने एका शिक्षिकेला तपासण्यासाठी जास्त पेपर्स दिले गेले. साहजिकच त्या चिडल्या. तेथे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे दोन दोन शब्द झाले. वातावरण तापले. त्या शिक्षिका रागाने त्या अधिकाऱ्याला विचारू लागल्या, एवढे पेपर्स मी कसे तपासायचे ? ' एक ज्येष्ठ पण मिश्किल शिक्षक तिथे हजर होते. ते म्हणाले, ' लाल पेनने तपासा...' आणि एकदम हास्याचा स्फोट झाला. तणावपूर्ण वातावरण क्षणात निवळले आणि गंमत म्हणजे त्या शिक्षिकाही हास्यात सामील झाल्या. 

हसण्याची क्रिया ही अशी एक क्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकाच वेळी काम करतात. आपण ऐकलेली गोष्ट किंवा वाचलेली गोष्ट मेंदूचा डावा भाग समजून घेतो. उजवा भाग ती गोष्ट गंभीर आहे की विनोदी याची छाननी करतो. विनोदी गोष्ट असेल तर आपल्याला हसू येते. अशा रीतीने शरीराचे सर्व अवयव जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते काम उत्तम होते. व्यायाम, हसणे, चालणे यासारख्या गोष्टीत आपल्या शरीरातील सर्व अवयवांचा सुरेख समन्वय घडतो. आरोग्यासाठी जसा उत्तम आहार आणि व्यायाम महत्वाचा तसाच निरोगी मनासाठी हास्योपचारही महत्वाचा. 

सखी शेजारिणी तू हसत राहा या गीतात ते सखी शेजारणीला उद्देशून म्हटले असले तरी ते आपल्या सगळ्यांसाठी पण आहे असे समजायला हरकत नाही. ' प्रकाशातले तारे तुम्ही ' या कवितेत कवी उमाकांत काणेकर म्हणतात, ' रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. ' पुढे ते म्हणतात, ' सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता...' खरंच मागचा सगळा गुंता,समस्या टाकून देऊन हसता आले पाहिजे म्हणजे ' आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा ' अशी स्थिती प्राप्त होईल. 

© विश्वास देशपांडे,चाळीसगाव 

८/१०/२०२२

प्रतिक्रियेसाठी ६४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









 

Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..