Posts

Showing posts from November, 2022

थोडं मनातलं - तिसरा डोळा

 थोडं मनातलं  तिसरा डोळा  परवाच्या दिवशी ( म्हणजे आता पाच सहा दिवस झाले. पण आता नुकतेच घडलेले काही सांगायचे झाले तर परवा अमुक अमुक झालं किंवा परवाच्या दिवशी अमुक तमुक भेटला होता असं म्हणण्याची पद्धत आहे ) काही कारणाने माझे राहात्याला ( शिर्डी जवळचे ) जाणे झाले. गावाचे नाव जरी राहता असले आणि तेथील जिवलगांनी येथे राहता का असे आग्रहपूर्वक विचारले. पण अस्मादिकांना राहणे शक्य नव्हते. त्यामुळे राहात्याला राहणे राहता राहता राहिले. पण तेथे काही सुहृदांची भेट मात्र झाली. त्यामुळे जरी राहात्याला काही तास राहिलो तरी राहिल्यासारखे वाटले हा भाग वेगळा !  राहात्याला गेल्यावर आमचे परममित्र रवींद्र धस यांनी मनापासून आगतस्वागत केले. याच रवींद्रांनी माझी आणखी एका रवींद्रांशी गाठ घालून दिली. या बुद्धिमान, जाणकार व्यक्तीचं नाव रवींद्र जोशी. त्यांची भेट घेतल्यावर त्या माणसाकडून ऐकण्यासारखं आणि शिकण्यासारखं भरपूर आहे याची जाणीव झाली. त्यांचं घर, ऑफिस पाहताना आपण एक उच्च कलात्मक दर्जाचं काहीतरी पाहतो आहोत अशी जाणीव होते. त्यांच्या घरातील जागेचा कलात्मक वापर करून तेथे देखणी बुद्धाची मूर्ती, ...

थोडं मनातलं - कोण कुणाकडे राहतंय ?

Image
थोडं मनातलं  कोण कुणाकडे राहतंय ?  प्रख्यात लेखक, कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्याकडे एकदा काही कामानिमित्त जाण्याचा प्रसंग आला होता. त्यावेळी त्यांचे आईवडील दोघेही त्यांच्याकडे राहत होते. दोघेही बरेच वयस्कर झाले होते. त्यांचे बाबा थोडं फिरण्यासाठी म्हणून बाहेर गेले होते. आई घरी होती. त्या माऊलीनेच आम्हा दोघांसाठी चहा करून आणला. मी दवणे सरांना विचारले, ' आईबाबा तुमच्याकडे राहतात ? ' त्यांनी मोठे छान उत्तर दिले. ते म्हणाले, ' विश्वासराव, मी आईबाबांकडे राहतो. ' ते असं काही म्हणतील याची मी कल्पनाच केली नव्हती. मीच जरा ओशाळलो. खरंच आपण थोडं काही करायला लागलो की स्वतःला किती मोठं समजतो ! ज्या आईबाबांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांनाच आपण म्हणतो की ते माझ्याकडे राहतात. खरं म्हणजे आपण उलट म्हणायला हवं. दवणे सर जेव्हा म्हणाले ना की मी आईबाबांकडे राहतो, तेव्हा वाटलं खरंच किती छान आहे नाही असं म्हणणं ! आपण जोपर्यंत लहान असतो तोवर कसली काळजी ? आईबाबा असतात ना. त्यांच्या छत्रछायेखाली खुशाल राहावं. भलेही ते आता काही करू शकत नसतील. पण त्यांचे आशीर्वाद तर सदैव असतात ना सोबत !  आपण...
थोडं मनातलं  असं आहे...  मधुकर तोरडमल यांचे ' तरुण तुर्क म्हातारे अर्क ' हे नाटक बहुतेकांनी पाहिले असेल. पाहिले नसले तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्या नाटकात प्रा बारटक्के यांच्या तोंडी घातलेली ' ह हा हि ही...' ची बाराखडी बहुधा सर्वांच्या परिचयाची असेल. व्यवहारात अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांना बोलण्यासाठी पटकन शब्द सापडत नाहीत. अशी माणसे मग ' ह हा हि ही ' चा आधार घेतात. समोरच्या व्यक्तीला संदर्भाने त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागते. पण कधी कधी अशा बोलण्यातून भयंकर विनोद वा क्वचित गैरसमजही होऊ शकतो. पु ल देशपांडे, मधुकर तोरडमल, लक्ष्मण देशपांडे यांच्यासारखी निरीक्षण चतुर मंडळी लोकांच्या अशा लकबी बरोबर हेरतात आणि खुबीने त्यांचा आपल्या लेखनात वापर करून घेतात. ' वऱ्हाड निघालं लंडनला '  या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात तर प्रत्येक पात्रागणिक त्यांनी अशा लकबींचा सुरेख वापर केला आहे. त्यातून त्या पात्रांचे स्वभाववैशिष्ट्य तर दिसतेच पण त्यातून निर्माण होणारा विनोद श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतो.  माझ्या संपर्कात अशी काही माणसे आली आहेत की ब...