थोडं मनातलं - तिसरा डोळा

 थोडं मनातलं 

तिसरा डोळा 

परवाच्या दिवशी ( म्हणजे आता पाच सहा दिवस झाले. पण आता नुकतेच घडलेले काही सांगायचे झाले तर परवा अमुक अमुक झालं किंवा परवाच्या दिवशी अमुक तमुक भेटला होता असं म्हणण्याची पद्धत आहे ) काही कारणाने माझे राहात्याला ( शिर्डी जवळचे ) जाणे झाले. गावाचे नाव जरी राहता असले आणि तेथील जिवलगांनी येथे राहता का असे आग्रहपूर्वक विचारले. पण अस्मादिकांना राहणे शक्य नव्हते. त्यामुळे राहात्याला राहणे राहता राहता राहिले. पण तेथे काही सुहृदांची भेट मात्र झाली. त्यामुळे जरी राहात्याला काही तास राहिलो तरी राहिल्यासारखे वाटले हा भाग वेगळा ! 

राहात्याला गेल्यावर आमचे परममित्र रवींद्र धस यांनी मनापासून आगतस्वागत केले. याच रवींद्रांनी माझी आणखी एका रवींद्रांशी गाठ घालून दिली. या बुद्धिमान, जाणकार व्यक्तीचं नाव रवींद्र जोशी. त्यांची भेट घेतल्यावर त्या माणसाकडून ऐकण्यासारखं आणि शिकण्यासारखं भरपूर आहे याची जाणीव झाली. त्यांचं घर, ऑफिस पाहताना आपण एक उच्च कलात्मक दर्जाचं काहीतरी पाहतो आहोत अशी जाणीव होते. त्यांच्या घरातील जागेचा कलात्मक वापर करून तेथे देखणी बुद्धाची मूर्ती, कृष्णभक्त मीरेची मूर्ती आणि उच्च अभिरुची दर्शवणारे पेंटिंग्स लक्ष वेधून घेत होते. रवींद्र जोशी यांनीही आमचे यथोचित आदरातिथ्य केले. नंतर त्यांच्यासोबतच आम्ही शिर्डीत गेलॊ आणि आम्हाला साईबाबांच्या प्रसाद भोजनाचा लाभ मिळाला. 

राहता गावात एक ज्येष्ठ, ज्ञानी असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नाव डी यु जोशी. सगळा गाव प्रेमानं आणि आदरानं त्यांना डी यु मामा म्हणतो. त्यांचं वय सध्या ८७ वर्षांचं आहे. माझ्या मागच्या राहता भेटीत त्यांची ओझरती भेट झाली होती. यावेळी पुन्हा त्यांच्या भेटीसाठी मला रवींद्र धस घेऊन गेले. या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं म्हणजे डी यु मामांचं पुस्तकाचं एक छोटंसं दुकान आहे. त्या दुकानात मामा बसले होते. मामांनी आपल्या गोड आणि मनमिळावू स्वभावानं अनेक लोक जोडले आहेत. प्रत्येकाला मामा म्हणजे आपल्या घरातीलच ज्येष्ठ व्यक्ती वाटते. आता मामा वयपरत्वे थकले आहेत. त्यांच्या मागे म्हटलं तर पाहणारं कोणी नाही पण म्हटलं तर सारा गाव आहे. मामांनी आता वयपरत्वे काम होत नाही म्हणून आपलं पुस्तकांचं दुकान बंद करायचं ठरवलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस झाला, त्यावेळी आपल्या जवळच्या मित्रांना त्यांनी आपल्या दुकानातील त्यांना आवडतील ती पुस्तके घेऊन जाण्याची मुभा दिली. त्याचे पैसे घेतले नाहीत. काही मंडळींनी मात्र त्यांना आग्रहाने पैसे घ्यायला लावलेच. 

मी मामांच्या भेटीला गेलो तेव्हा मलाही मामांनी ' सर, तुम्हाला आवडतील ती पुस्तके घेऊन जा ' असा आग्रह केला. मी तेथे उपलब्ध असलेल्या पुस्तकातील चार पाच पुस्तके निवडली. मी पुस्तके पाहत असताना मामा मला पुस्तकांबद्दल सांगत होते. ' सर, या ठिकाणी प्रवासवर्णनं आहेत, इथे चरित्रं आहेत, इकडे कादंबऱ्या वगैरे. ' मामांनी केवळ पुस्तकाचे दुकान चालवले असे नाही तर त्यांचे वाचनही प्रचंड होते. त्याचे प्रत्यंतर त्यांच्याशी बोलताना सहज येत होते. मी पुस्तके घेतल्याचा त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी मला पुस्तकांचे पैसे देऊ नका असे सांगितले पण मला तसे योग्य वाटले नाही. मी आग्रहाने त्यांच्या काउंटरवर पैसे ठेवले. त्यांना आदराने नमस्कार केला आणि बाहेर पडलो. मामांसारखी पुस्तकप्रेमी मंडळी नाहीत असे नाही. पण आता दिवसेंदिवस अशी माणसे दुर्मिळ चालली आहेत. 

वाचन महत्वाचे आहेच पण कोणते आणि काय वाचायचे हे ज्याने त्याने ठरवावे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी. ती ही की पुस्तकांच्या वाचनाने आपल्या विचारांमध्ये बदल घडून यायला हवा. भावभावनांचा, जाणिवांचा विकास व्हायला हवा. योग्यायोग्यतेचा निर्णय घेता यायला हवा. जर अनेक वर्षे आपण वाचत असू पण असा काही बदल आपल्या व्यक्तिमत्वात होताना आपल्याला जाणवत नसेल, तर कुठेतरी आपण काय वाचतो आहोत याचाही पुनर्विचार व्हायला हवा. असं म्हटलं जातं की जी स्वप्ने तुम्हाला झपाटून टाकतात, झोपू देत नाहीत अशी स्वप्ने आपण पाहावीत. थोडक्यात म्हणजे आपल्या डोळ्यासमोरच ध्येय असे झपाटून टाकणारे हवे. तेच आपल्याला पुस्तकांबाबतही म्हणता येईल. जी पुस्तके आपल्याला अस्वस्थ करतात, झपाटून टाकतात अशी पुस्तके वाचायला हवीत. अशीच पुस्तके आपल्या अंतरातील बदलांची सुरुवात करतील. श्यामची आई सारखी पुस्तके आपल्याला अंतर्बाह्य हेलावून टाकतात. वपुंच्या काही कथा आपल्याला अस्वस्थ करतात आणि विचार करायला भाग पडतात. अशी अनेक महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे आपल्याला झपाटून टाकतात, जगण्याची दिशा दाखवतात. 

आज मोबाईल, टीव्हीच्या जमान्यात वाचणारे कमी झाले आहेत. कपाटातल्या, वाचनालयातल्या पुस्तकांवर धूळ जमा होते आहे. मध्यंतरी समाज माध्यमांवर एक छान संदेश आला होता. बंद कपाटातल्या पुस्तकांनी आत्महत्या केली. कारण मोबाईल होता. असे होऊ द्यायचे नसेल जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. पुस्तकांची शेती करायची आणि भरघोस पीक घ्यायचे तर आजच विचारांची लागवड करायला हवी. 

शांता शेळके आपल्या ' सहावे सुख ' या लघुनिबंधात म्हणतात, ' दोन चिनी माणसे एकमेकांना भेटली की आपल्यासारखेच एकमेकांचे अभिष्टचिंतन करतात. तुम्हाला जीवनातील सहाही सुखे प्राप्त होवोत असे म्हणतात. ' पैसा, आरोग्य, संतती, मनासारखा जोडीदार, प्रसिद्धी इ पाच गोष्टी पण सहावी गोष्ट किंवा सहावे सुख हे ज्याचे त्याने शोधायचे असते. ते सहावे सुख बहुधा आपण ज्या भौतिक सुखांची कल्पना करतो त्यापलीकडे असते. ते बहुधा मनाची शांती, समाधान यासारखे असू शकेल. ज्याने ग्रंथांना आपला सखा बनवले आहे, अशा माणसाच्या जीवनात हे सहावे सुख निश्चितपणे येऊ शकते. डी यु मामांसारखी माणसे हाच विचार, वारसा मागे ठेवून जात आहेत. वाचन ही केवळ एक कृती नसून तो एक संस्कार आहे, संस्कृती आहे आणि डी यु मामांसारखी माणसे याची जितीजागती उदाहरणे आहेत. 

या लेखाला तिसरा डोळा असं नाव देण्याचं कारण ज्ञानाला आपण मनुष्याचा तिसरा डोळा म्हणतो. तसं तर तिसरा डोळा म्हटलं की अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. महाभारतात महर्षी व्यासांनी संजयला प्रदान केलेली दिव्य दृष्टी, रामायण लिहिण्यासाठी महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाने दिलेली दिव्य दृष्टी या गोष्टींना तिसरा डोळाच म्हणता येईल. शिवाजी महाराजांकडे बहिर्जी नाईकसारखे गुप्तहेर होते. ते म्हणजे त्यांचा तिसरा डोळा. सगळीकडच्या गुप्त बातम्या त्यांना त्यामुळे मिळायच्या. अलीकडे सगळीकडे जे सी सी टीव्ही कॅमेरे बसवलेले असतात, ते सुद्धा तिसरा डोळाच म्हणायला हवेत. खेळांच्या स्पर्धेत एखादा खेळाडू खरोखरच बाद झाला आहे की नाही याचा अचूक निर्णय हे कॅमेरे देतात. असे हे तिसऱ्या डोळ्याचे अनेक प्रकार. 

मला आतापर्यंत जी जी मंडळी भेटली त्यात मग डी यु मामांसारखी मंडळी असतील किंवा आणखीही त्यांच्यासारखीच वाचनातून समृद्ध झालेली व्यक्तिमत्वे असतील, या सर्वांनी अफाट वाचन केले आहे. त्यातून त्यांचा जगाकडे पाहण्याचा तिसरा डोळा विकसित झाला आहे. एक वेगळी दृष्टी त्यांना प्राप्त झाली आहे. भगवान शंकरांना आपण त्रिनेत्रधारी म्हणतो. त्यांचा तिसरा डोळा उघडला की जगाचा विनाश होतो असं म्हणतात. भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला जाळून भस्म केले. मला वाटतं त्याचा प्रतीकात्मक अर्थ म्हणजे आपल्या अंतरातील कामवासना त्यांनी योगाच्या साहाय्याने जाळली किंवा नष्ट केली. त्यावर विजय प्राप्त केला. भगवान शंकर हे योगी आहेत. तिसरा डोळा हा योगशक्तीचे प्रतीक आहे. 

आपले दोन डोळे भौतिक गोष्टी पाहू शकतात. तिसरा डोळा मात्र योगसामर्थ्याच्या साहाय्याने त्यापलीकडे पाहू शकतो. तिसऱ्या डोळ्याचा हा व्यापक, विशाल आणि अध्यात्मिक अर्थ असला तरी, आपण या ठिकाणी तो मर्यादित अर्थाने घेऊ या. जीवनातील सुखदुःखांकडे समत्वभावनेने पाहण्याची दृष्टी विकसित होणे म्हणजे तिसरा डोळा विकसित होणे या अर्थाने तो घेता येईल. हा आपला तृतीय नेत्र जीवनातील विविध अनुभव, आणि उत्तम पुस्तकांचे वाचन यामुळे विकसित होऊ शकतो. वाचन मनुष्याला समृद्ध करते. त्याच्या जाणिवा विकसित होतात, दृष्टी विशाल होते. समोर आलेली सुखदुःखे तो सारख्याच सहजतेने स्वीकारतो. या अर्थाने त्याचा तिसरा डोळा विकसित झालेला असतो असे म्हणता येईल. डी यु मामांसारखी व्यक्तिमत्वे आपल्याला याचा प्रत्यय आणून देतात. 

© विश्वास देशपांडे,चाळीसगाव 

२५/११/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 





Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..