थोडं मनातलं कल आज और कल
थोडं मनातलं
कल आज और कल
हिंदीत काल आणि उद्यासाठी एकच शब्द आहे. तो म्हणजे ‘ कल ‘. मराठीत आपण काल आणि उद्या म्हणतो. हिंदी आणि अहिराणी बोलीत एक साम्य या बाबतीत मला आढळले. ते म्हणजे अहिराणी भाषेत बोलताना काही लोक उदयाला सुद्धा काल म्हणतात. बहुधा हा काल शब्द ‘ काळ ‘ वरून आला असावा. कालचा दिवस गेला तो भूतकाळ आणि उद्याचा येणारा दिवस तो भविष्यकाळ. आणि आजचा आपल्या हातात असलेला वर्तमानकाळ.
लहानपणी मला कोणी एखादी चांगली गोष्ट करायला सांगितली की मी आईशी बोलताना म्हणत असे, ‘ मी उद्यापासून करीन. ‘ उदा. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, रोज नियमाने अभ्यास करणे, घरातील वडिलधाऱ्या मंडळीना नमस्कार करणे इ. पण आई म्हणायची, अरे वेड्या, उद्या कधी येत नसतो. म्हणून जे काही करायचे ते आजपासून कर. खरं म्हणजे तिचं ते बोलणं मला लहानपणी फारसं कळायचं नाही. मला वाटायचं असं कसं होईल ? आजच्या दिवसानंतर येणारा पुढचा दिवस म्हणजे उद्या नाही का ? तो तर येणारच आहे ना !
पण आईचे ते बोलणे मला पुढे कळायला लागले. आजच्या नंतरचा दिवस म्हणजे ‘ उद्या ‘ आपल्या हातात येतो सुद्धा. पण यावेळी एक जादू झालेली असते. आपल्या हातात तो पुढचा दिवस जेव्हा येतो तेव्हा त्याचे रुपांतर आजमध्ये झालेले असते. पुन्हा उद्याचा दिवस लांबच राहतो. तो आपल्या हाती लागतच नाही. म्हणूनच म्हटले जाते ‘ कल करे सो आज कर, और आज करे सो अभी कर.’ किती सार्थ असतात नाही या म्हणी ! जणू युगानुयुगांचा अनुभव या म्हणींच्या पाठीशी असतो ! म्हणून आपला उद्या चांगला हवा असेल तर त्याची पायाभरणी आपल्याला आजच करावी लागते.
नुकतेच हिंदू नववर्ष सुरु झाले आहे. वर्षारंभीचा चैत्र सुरु झाला आहे. चैत्र शब्द चित्रा नावाच्या नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता किंवा वैविध्य. या महिन्यात सृजनाचा उत्सव निसर्ग साजरा करीत असतो. हिवाळ्यातली कडक थंडी नसते. वैशाखातील उन्हाचा तडाखा सुरु व्हायला अवकाश असतो. वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं. झाडाझाडांवर पोपटी, तांबूस कोवळी, हिरव्या रंगांची पाने दिमाखात मिरवत असतात. ही जणू निसर्गाची रंगपंचमी असते. कोकिळेचा स्वर वातावरणात भरून राहिलेला असतो. झाडं मोहरानं बहरलेली असतात. वातावरण सुगंधित झालेले असते. आम्रवृक्षालाही मोहर आलेला असतो. फळांचा राजा आंबा आपल्या आगमनाची वर्दी देतो. सगळीकडे प्रसन्नता आणि उत्साहाचं वातावरण असतं . येणाऱ्या वर्षासाठी उत्तम संकल्प करण्याचा हाच सुंदर काळ असतो.
आपल्या हातात जो आजचा दिवस किंवा आजचा क्षण आहे त्याचा पुरेपूर वापर करायला हवा कारण आपण आज केलेली ही भविष्याची पायाभरणी असते. आपले उद्याचे दिवस कसे असणार ते आपण आजचा दिवस कसा वापरतो यावर अवलंबून असते. ज्याप्रमाणे कोणतीही इमारत मजबूत पायाभरणी झाल्याशिवाय काळाच्या कसोटीवर टिकू शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचं सुद्धा असतं. आपल्या पुढील आयुष्याची पायाभरणी आपण वर्तमानत केली तर येणारा भविष्यकाळ नक्कीच सुखाचा असू शकतो. एक प्रकारे भविष्यकाळासाठी केलेली ही गुंतवणूक असते. कोणतीही गोष्ट घ्या. आपण आज ती केली तर उद्यासाठी तिचा उपयोग होणारच आहे. आपण आज एखादे झाड लावले तर भविष्यात त्याची फळे आपल्याला चाखायला मिळतील. आपण अनेक प्रकारच्या पुस्तकांचे किंवा नानाविध अशा प्रकारचे वाचन केले तरत्यामुळे आपलं वागणं, बोलणं यात एक प्रकारची परिपक्वता यायला मदत होते. वाचन म्हणजे आपण समृद्ध होणं. ती एक प्रकारची भविष्यकाळासाठीची गुंतवणूकच असते. अशाच प्रकारे संगीत, व्यायाम, पर्यटन यासारख्या गोष्टींमुळे आपले व्यक्तिमत्व समृद्ध होत असते आणि अशा प्रकारचं हे समृद्ध व्यक्तिमत्व ही भविष्यातील एक प्रकारची आपली गुंतवणूकच असते म्हणून ' कल करे सो आज कर और आज करे सो अभी ' ही म्हण अगदी सार्थ आहे.
आपल्या हातात येणारा पैसा हा सुद्धा मर्यादित असतो. त्याचे स्रोत मर्यादित असतात पण आपण जर त्याचा सुयोग्य पद्धतीने वापर केला आणि नियोजन करून भविष्यातील आर्थिक अडचणींसाठी तरतूद करून ठेवली तर तो पैसा उद्या आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल.
अत्यंत दुर्दैवी आणि जीवघेण्या अशा कोरोनाच्या कालखंडातून आपण आज बाहेर पडलो असलो तरी निरनिराळ्या प्रकारचे विषाणू आजही आपल्या आरोग्याला धोका उत्पन्न करीत आहेत. एच थ्री एन थ्री हा विषाणू त्याचप्रमाणे कोरोनाचे नवीन व्हेरियंटस हा एक नवीनच धोका आपल्यासाठी तयार झाला आहे. पण कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. स्वच्छता राखणे, आरोग्यदायी आहार घेणे, स्वावलंबन,व्यायाम यासारख्या अनेक गोष्टी आपल्या निरोगी जीवनासाठी आवश्यक आहेत याची तीव्रतेने जाणीव आपल्याला कोरोना कालावधीत झाली आहे. त्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणे आणि भविष्यासाठी त्याला तयार करणे ही काळाची गरज असेल हीसुद्धा एक प्रकारची उद्यासाठीची गुंतवणूकच आहे.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. काही प्रसंग आपली कसोटी पाहतात. आपली चिकाटी, मनोधैर्य, शारीरिक क्षमता इत्यादी गोष्टींची त्यात परीक्षा होते. त्यासाठी मानसिक, भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या आपल्याला सक्षम बनवणे आवश्यक आहे तरच आपण भविष्यातील संकटांना तोंड देऊ शकू. हमारा कल अच्छा था, आज ठीक हैं और कलको और बेहतर बनाना हैं. त्यासाठी एवढे करूया.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२०/०३/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Comments
Post a Comment