थोडं मनातलं - कोण कुणाकडे राहतंय ?
थोडं मनातलं
कोण कुणाकडे राहतंय ?
प्रख्यात लेखक, कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्याकडे एकदा काही कामानिमित्त जाण्याचा प्रसंग आला होता. त्यावेळी त्यांचे आईवडील दोघेही त्यांच्याकडे राहत होते. दोघेही बरेच वयस्कर झाले होते. त्यांचे बाबा थोडं फिरण्यासाठी म्हणून बाहेर गेले होते. आई घरी होती. त्या माऊलीनेच आम्हा दोघांसाठी चहा करून आणला. मी दवणे सरांना विचारले, ' आईबाबा तुमच्याकडे राहतात ? ' त्यांनी मोठे छान उत्तर दिले. ते म्हणाले, ' विश्वासराव, मी आईबाबांकडे राहतो. ' ते असं काही म्हणतील याची मी कल्पनाच केली नव्हती. मीच जरा ओशाळलो. खरंच आपण थोडं काही करायला लागलो की स्वतःला किती मोठं समजतो ! ज्या आईबाबांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांनाच आपण म्हणतो की ते माझ्याकडे राहतात. खरं म्हणजे आपण उलट म्हणायला हवं. दवणे सर जेव्हा म्हणाले ना की मी आईबाबांकडे राहतो, तेव्हा वाटलं खरंच किती छान आहे नाही असं म्हणणं ! आपण जोपर्यंत लहान असतो तोवर कसली काळजी ? आईबाबा असतात ना. त्यांच्या छत्रछायेखाली खुशाल राहावं. भलेही ते आता काही करू शकत नसतील. पण त्यांचे आशीर्वाद तर सदैव असतात ना सोबत !
आपण सारखं माझं माझं करत असतो. पण खरं तर आपलं असं काय असतं ? गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनात एका ठिकाणी म्हणतात, ' आपली रामावर खरी भक्ती असेल तर आपण ज्या घरात राहतो, ते घर रामाचे आहे असे म्हणावे. मी रामाच्या घरात राहतो आहे अशी भावना असू द्यावी. ' एकदा आपल्या मनात ही भावना दृढ झाली की मी राहतो ते घर माझ्या आईवडिलांचे आहे, रामाचे आहे आणि मी सुद्धा त्यांचा आहे की मग अहंकाराला थारा उरतोच कुठे ! एकदा का हे घर त्यांचे आहे असे म्हटले की मग आपण त्यांना जसे आवडते तसेच वागू. त्यांना घरामध्ये वाईट गोष्टी आलेल्या आवडणार नाहीत अशी आपली पक्की भावना झाली की मग आपणच त्या वाईट गोष्टींपासून दूर राहू. घरामध्ये चांगल्याच गोष्टी होतील. अनीतीचा, भ्रष्टाचाराचा पैसा येणार नाही. वाईट सवयी, व्यसने यापासून आपण आपोआपच लांब राहू. अशा वेळी आपले घर म्हणजे एक पवित्र असे मंदिर होईल. मंदिरात जाताना जसे आपण आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवतो, तसेच या घररूपी मंदिरात जाताना वाईट गोष्टी, विचार या बाहेरच सोडून मग घरात येऊ.
एका व्यक्तीने एक नवीन चारचाकी गाडी घेतली. त्या गाडीत त्याने स्वामी समर्थांची प्रतिमा स्थानापन्न केली. पण ती प्रतिमा आपण नेहमी पाहतो तशी आपल्या दिशेने तोंड करून न बसवता समोरच्या रस्त्याकडे स्वामींचे मुख येईल अशी ती बसवली. त्याला ही प्रतिमा अशी उलट का बसवली असे विचारले तर तो म्हणाला, ' अरे स्वामी किती वेळ आपल्याकडे पाहणार ना ? सतत आपल्याकडे पाहून त्यांना कंटाळा नाही का येणार ? आपल्यासारखीच त्यांना थोडी रस्त्यावरील मौजमजा पण पाहू दे. ' या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की त्या स्वामींच्या प्रतिमेला तो नुसतीच प्रतिमा मानायला तयार नव्हता. स्वामी हे सगुण आहेत. त्यांनाही आपल्यासारख्या भावभावना आहेत. त्यांना आवडेल ते आपण करावे असे त्याला वाटत होते. स्वामींशी तो किती एकरूप झाला होता ! माझ्या परिचित असलेल्या आणखी एका स्वामींच्या आश्रमात स्वामींच्या शिष्यांनी त्यांच्यासाठी गाडी घेतली होती. ड्रायव्हर शेजारी असलेल्या सीटवर स्वामी बसत. आता ते स्वामी नाहीत. पण ते शिष्य जेव्हा केव्हा ती गाडी काढतात तेव्हा त्या गुरूंच्या आसनावर कोणीही बसत नाही. ती जागा फक्त आणि फक्त गुरूंची अशी त्यांची श्रद्धा आहे.
आणखीही एक याच्या पुढची पायरी आहे. आपले घर,आपली गाडी किंवा आपली अशी कोणतीही वस्तू जशी आईवडिलांची, रामाची आहे असे आपण म्हणतो तसाच आपला देह हा सुद्धा आपला नाही अशा प्रकारची भावना करणे ही ती पुढील पायरी. ज्या देहाला आपण मी, माझा असे म्हणतो तो सुद्धा आपल्या आईवडिलांकडूनच आलेला असतो. आपल्या देहातच पंचमहाभूतांचा वास असतो. आत्म्याच्या रूपाने परमेश्वराचा अंश आपल्यातच असतो. म्हणून तर साधुसंत म्हणतात, ' देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर..' घराप्रमाणेच एकदा का आपले ठरले की आपला देह हा सुद्धा देवाचे मंदिर आहे की मग आपण या देहाला पवित्र राखण्याचा प्रयत्न करू. माझ्या अंतरात वसलेल्या परमेश्वराला अमुक एक गोष्ट आवडणार नाही. त्याला आवडेल असे मला काय करता येईल असे आपण वागू. वाईट गोष्टी, व्यसने इ पासून आपोआपच दूर राहू.
घराला, देहाला देवाचे मंदिर म्हणणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. त्यासाठी मनाला तशी सवय लावावी लागेल. आजच्या संगणकाच्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या मनाचे तसे ' प्रोग्रॅमींग ' करावे लागेल. पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीत जे चार आश्रम सांगितले होते, ते जीवन आचारण्याच्या दृष्टीने आदर्श असे होते. त्यातून आपल्याला आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते. ब्रह्मचर्याश्रमात सगळे नियम पाळून गुरुगृही राहायचे, विद्या संपादन करायची. त्या काळात ज्ञान, आरोग्य यांची उपासना करायची. ही एक प्रकारची साधनाच असायची. ही साधना पुढील आयुष्यात कामी यायची. मग नंतर गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमात आपली कर्तव्ये पालन करून समाजाला आणि कुटुंबाला उपयोगी ठरेल अशा पद्धतीने आचरण करायचे. ब्रह्मचर्याश्रमात संपादन केलेल्या विद्येचा, कौशल्यांचा वापर करून सदाचरणाने धन मिळवायचे. अशा पद्धतीच्या गृहस्थाश्रम आचरता आला तर त्याला ' धन्य गृहस्थाश्रमः ' असे म्हणायचे.
पुढील वानप्रस्थाश्रमात संसारातील आसक्ती हळूहळू कमी करायची. ईश्वरभक्तीत रममाण व्हायचे अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे आपले पूर्वज हळूहळू मनाने विरक्ती स्वीकारीत असत. म्हणजे मग या संसाराच्या मोहमायेतून बाहेर पडणे त्यांना शक्य होई. गृहस्थाश्रम धन्य करून वानप्रस्थ आणि मग संन्यासाश्रम अशी त्यांची वाटचाल होत असे. आजच्या जीवनपद्धतीत हे सगळी आश्रमव्यवस्थाच विस्कळीत झाल्याने माणसाचा गोंधळ उडाला आहे. नात्यागोत्यात, जडात, पार्थिवात अडकलेले त्याचे मन बाहेर यायला तयार होत नाही. अपेक्षा पूर्ण होत नसल्याने होणारे अपेक्षाभंगाचे दुःख फार मोठे असते. सुख सुख म्हणून आयुष्यभर ज्या गोष्टींचा पाठलाग केला त्या सुख देण्यास असमर्थ ठरतात.
अशा वेळी माणसाचे मन ईश्वराकडे धाव घेते. आपला जन्म या मातीतला. पण या मातीला आभाळाची ओढ लागते. मोहमायेच्या, नात्यांच्या बेड्या माणसाला या मातीत जखडत असतात. मन मात्र पंख लावून आभाळाकडे उडतअसते. कवी म. म. देशपांडे यांची एक सुंदर कविता आहे. ' अंतरिक्ष फिरलो पण...' या नावाची. त्यात कवी म्हणतो
अंतरिक्ष फिरलो पण
गेली न उदासी
गेली न उदासी.
आज माणसाने भौतिक प्रगती खूप केली आहे. त्या प्रगतीच्या जोरावर तो अंतरिक्षात फिरून आला पण त्याच्या मनातली उदासीनता,असमाधानाची भावना काही गेली नाही. पुढे कवी म्हणतो
लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी
त्याच्या हाताला अविनाशी असे काहीच लागले नाही. सगळ्या गोष्टी विनाशीच आहेत. पुढील दोन कडवी फार सुंदर आहेत.
क्षितिज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर
घेऊन मी चालू कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर .
परमेश्वराच्या चरणांना कवी क्षितिज असे म्हणतो. क्षितिज जवळ आल्यासारखे वाटले तरी प्रत्यक्षात ते लांबच असते. अनेक वासनाविकारानी, जीवनातील ताणतणावांनी कवीचे हृदय व्यथित झाले आहे. असा हा ' भरलेला ऊर ' घेऊन त्याच्यापर्यंत जाता येत नाही. कवितेची शेवटची दोन कडवी पहा. कवी म्हणतो
जरि वाटे जड कळले
तळ कळला नाही
तळ कळला नाही.
जड म्हणते ' माझा तू '
क्षितिज म्हणे ' नाही '
क्षितिज म्हणे ' नाही. '
या ओळीत कवीला सांगायचे आहे की भौतिक प्रगती आपण केली की आपल्याला अगदी स्वर्ग जिंकल्याचा भास होतो. आपल्याला सगळे कळले असे वाटते. पण ' तळ ' म्हणजेच मूळ गाभा, शक्ती किंवा चैतन्य आपल्याला कुठे कळलेले असते ? आपण त्यापासून अनभिज्ञच असतो. जड आणि चेतन, पार्थिव आणि अपार्थिव अशा एका विचित्र कोंडीत तो सापडला आहे. जडाशी जखडला आहे. अशा वेळी क्षितिज ( म्हणजे ईश्वरी सत्ता ) त्याला सांगते की तू केवळ जडाचा, पृथ्वीचा नाहीस माझाही आहेस. अशा वेळी माणूस हतबल झाला आहे. काय करावे हे त्याला कळत नाही. ' जिवलगा राहिले दूर घर माझे ' या आपल्या कवितेत कवयित्री शांता शेळके म्हणतात
निराधार मी मी वनवासी
घेशील केव्हा मज हृदयासी
तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे.
अशी आर्त प्रार्थना करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. त्याची कृपा झाली की हे भवबंध तुटू शकतात. आणि खरोखर ज्याला ' माझे ' असे म्हणता येईल त्या 'दूरच्या' घरापर्यंतचा आपला प्रवास सुखकर होईल.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२०/११/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Comments
Post a Comment