दीपावली : आनंद आणि प्रकाशपर्व

थोडं मनातलं 

दीपावली : आनंद आणि प्रकाशपर्व 

वर्षभर ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो आपला सर्वात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी किंवा दीपावली. या सणाच्या निमित्ताने खूप काही गोष्टी आपण मनात ठरवलेल्या असतात. वर्षभरात आपल्याला एखादी वस्तू हवी असते. ही वस्तू म्हणजेच एखादी अतिउपयोगी, अतिमौल्यवान अशी गोष्ट असते, जी वर्षभरात केव्हाही घेता येत नाही.  मग आपण ठरवतो की या दिवाळीला आपण अमुक एक वस्तू घेऊ या. मग ते नवीन वाहन असेल, जागेची खरेदी असेल, एखादा दागिना, नवीन कपडे असतील  वा अन्य काही. दिवाळीच्या सुमुहूर्तावर आपण अशा प्रकारची खरेदी करतो. या निमित्ताने बाजारातही कोट्यवधींची उलाढाल होते. आर्थिक व्यवहारांना चालना मिळते. याच काळात छोटे छोटे व्यावसायिक सुद्धा आपली आर्थिक प्रगती करू शकतात. समाजातील काही घटक वर्षभर तसे उपेक्षित राहिलेले असतात. त्यांच्याही पदरात हा सण दोन पैसे टाकतो. पणत्या, घडे बनवणारा कुंभार, केरसुणी बनवणारे कारागीर, पादत्राणे बनवणारे गावाकडील चर्मकार, हॉटेल व्यावसायिक, हलवाई इ सर्वानाच यानिमित्ताने काम मिळते. त्याचबरोबर साफसफाई करणारे कामगार, रंग देणारे कारागीर यांनाही काम मिळते. एकूणच समाजातील सर्वच घटकांच्या आशा पल्लवित करणारा हा सण आहे. 

याच सणाच्या निमित्ताने वर्षभरात ज्यांना आपल्याकडे यायला जमले नाही असे नातेवाईक, पाहुणे, आप्तस्वकीय आपल्याकडे येतात. प्रियजनांच्या भेटीगाठी होतात. म्हणूनही आपण दिवाळीची वाट पाहत असतो. वर्षभर तर सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. या निमित्ताने चार दिवस एकत्र येऊन गप्पागोष्टी, फराळाचा, मिष्टान्नाचा आस्वाद घेतात. एक नवीन ऊर्जा, आनंद घेऊन आपापल्या घरी परततात. तसे पाहिले तर दिवाळीचे चार दिवस हे वर्षातल्या इतर दिवसांसारखेच असतात पण आपण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, त्यावर त्यांचे वेगळेपण अवलंबून असते. 

गृहिणींच्या दृष्टीने तर दिवाळी म्हणजे पर्वणीच असते ! दिवाळी आली की तिच्या आनंदाला सीमा नसते. कारण विविध कारणांनी  बाहेरगावी असलेली तिची मुले यानिमित्ताने तिच्याकडे येणार असतात. भाऊबीजेला भाऊ येणार असतो किंवा तीच सर्वांना भेटायला माहेरी जाणार असते. आयुष्यभरासाठी ज्या पतीची जोडीदार म्हणून तिला साथ लाभलेली असते, त्याच्यावरचे प्रेम व्यक्त करणारा आणि एकूणच पतिपत्नीच्या नात्याला बळ आणि आनंद देणारा पाडवा या चार दिवसांमध्ये असतो. त्यामुळे दिवाळी येण्यापूर्वीच तिची लगबग सुरु होते. यानिमित्ताने घराची साफसफाई केली जाते. फराळाचे गोडधोड पदार्थ केले जातात. आजच्या धावपळीच्या जीवनात शहरातील गृहिणीला, नोकरी करणाऱ्या स्त्रीला या सगळ्यांसाठी कदाचित फारसा वेळ मिळत नसेल पण उत्साह मात्र तोच असतो. भावनाही त्याच असतात. 

दिवाळीला आपापली घरे आपण स्वच्छ तर करतोच पण जेवढे शक्य असेल तर तेवढी सजावटही करतो. घराला बहुधा नवीन रंग दिलेला असतो, नवीन फर्निचर घराची शोभा वाढवते. बाहेर देखणा आकाशकंदील लागलेला असतो. मनोहारी रोषणाई आणि पणत्यांची आरास केलेली असते. एकंदरीतच सगळा आसमंत उजळून निघतो. म्हणूनच दीपावली हे आनंद आणि प्रकाशपर्व आहे. 

आली आली रे दिवाळी 

आनंदाचा हा सण 

दारावर तोरण मांगल्याचे 

दीप तऱ्हेतऱ्हेचे लावियले दारी 

सुखावती सारी लोचनांना 

दीपावलीला पहाटे 

होई अभ्यंगस्नान 

प्रसन्न तनमन होत असे. 

असा हा सुंदर सण. या सणाचे महत्व जर आपण आजच्या पिढीला समजावून सांगितले नाही तर हा फक्त एक मोठा सण आहे, चार दिवस सुटी असते, नवीन काहीतरी खरेदी करायची, गोडधोड करून खायचे, फटाके उडवायचे यासारख्या गोष्टी करणे म्हणजेच दिवाळी असा त्यांचा समज होण्याची शक्यता आहे. आपले सगळेच सण आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक आणि कल्पकतेने ठरवले आहेत. त्यामागे काही एक विशिष्ट उद्देश, अर्थ आहे हे आपण मुलांना उलगडून सांगायला हवे. 

आज दिवाळीचा सण केवळ भारतातच नव्हे इतरही अनेक देशात साजरा केला जातो. श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान या शेजारील देशात हा सण साजरा होतो. याशिवाय जगात जिथे जिथे भारतीय लोक राहतात, तिथे तिथे हा सण साजरा होतो. आजकाल तर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये देखील दिवाळीचा सण साजरा होऊ लागला आहे ही आम्हां भारतीयांच्या दृष्टीने गौरव आणि अभिमानाची बाब आहे. दिवाळीतील प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवण देतो. साधारणपणे कराष्टमी पासूनच दिवाळी सुरु होते असे लोक मानतात. कराष्टमीला करे म्हणजेच कुंभ किंवा घटांचे पूजन केले जाते. हे पूजन प्रतीकात्मक आहे. कुंभ किंवा घट हा मातृगर्भाचे किंवा गर्भाशयाचे प्रतीक आहे. हा मातृशक्तीचे गौरव करणारा सोहळा आहे. तसा जवळपास संपूर्ण अश्विन महिनाच मातृशक्तीला वाहिला आहे असे म्हणा ना ! नवरात्रीला आपण घटस्थापना करतो. कोजागिरीला लक्ष्मीपूजन करतो. दिवाळीत लक्ष्मी, सरस्वती पूजन करतो. विविध रूपात केलेला हा मातृशक्तीचा गौरव आहे. त्याबद्दलची कृतज्ञता आहे, प्रेम आहे. 

वसुबारस या दिवशी आपण गायीवासराची पूजा करतो. आपल्या पूर्वजांनी दूरदृष्टीने गायी, बैल आदींना धन मानले होते. म्हणूनच त्याचा उल्लेख गोधन असा केला जातो. गाय ही आपल्या दुधाने आमचे पोषण करते. तिच्यापासूनच शेतीसाठी गोधन प्राप्त होते. तिच्याबद्दलची कृतज्ञता, प्रेम म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आज काळानुरूप शहरातून गायी पाळणे शक्य नाही, शेतीतही बैलांचा वापर मर्यादित प्रमाणात होतो आहे. पण म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही. या गोधनाची ओळख, त्यांचे महत्व मुलांना सांगण्याची जबाबदारी पालकांवर येते. अन्यथा गाय म्हणजे फक्त एक उपयुक्त पशु आहे, त्यात विशेष काय ? जसा तुम्ही आम्हाला जन्म दिला त्यात विशेष काय असेही कुठूनतरी ऐकायला येते. कृतज्ञता, प्रेम हरवत चालले आहे. 

यानंतरचा  दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आधी गायीबद्दल कृतज्ञता. गोवंश हेच पूर्वी धन मानले जायचे. म्हणून त्या धनाची पूजा. शिवाय कुबेर ही धनाची देवता आहे म्हणून या दिवशी कुबेर पूजन. धनाचा उपभोग घ्यायचा तर आरोग्यही उत्तम हवे. आरोग्याची देवता असणारे धन्वंतरी यांची ही जयंती. त्यांचेही पूजन या दिवशी आपण करतो. उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. डॉक्टर मंडळीसुद्धा आपल्याला रुग्णावर उपचार करताना यश मिळावे म्हणून धन्वंतरी पूजन करतात. आपणही आजच्या या काळात डॉक्टरांना धन्वतरींचे रूप मानून शुभेच्छा देतो. ' आरोग्यम धनसंपदा ' आपले आरोग्य हेच खरे धन आहे हे आपल्याला हा दिवस सुचवतो. म्हणून आपले आरोग्य सर्वांनी जपले पाहिजे. आरोग्य केवळ औषधे घेऊन वा दवाखान्यात जाऊन मिळत नाही. त्याची काळजी आहार, विहार आणि विचार उत्तम राखून आपल्यालाच घेतली पाहिजे हे हा दिवस सांगतो. त्यासाठीच या दिवसात अभ्यंगस्नान इ. चे महत्व आहे. 

नरकचतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी अशा भौमासुर किंवा नरकासुराचा वध केला. त्याच्या बंदिवासात असलेल्या स्त्रियांना मुक्त केले. अशा स्त्रियांना समाज स्वीकारणार नाही म्हणून त्यांच्याशी विधिवत विवाह केला. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला. स्त्रीशक्तीचा सन्मान केला. नरकासुर वधाचा आनंद आणि श्रीकृष्णाच्या या थोर कृतीचा गौरव यांचे प्रतीक म्हणजे हा दिवस. आपल्यातील  वाईट विचारांचा नाश करून सद्विचारांचे, सत्कृत्यांचे दीप लावावेत. स्त्रियांचा सन्मान करावा असेच हा दिवस जणू आपल्याला सांगत नाही का ? 

अश्विन वद्य अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीने याच दिवशी श्रीविष्णूंची पती म्हणून निवड केली. याच दिवशी श्रीविष्णू वैकुंठाला परत आले असेही सांगितले जाते. या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करून ती आपल्यावर सदैव प्रसन्न राहावी म्हणून प्रार्थना केली जाते. साळीच्या लाह्या, मिठाई आदींचा नैवेद्य दाखवला जातो. वही पूजन केले जाते. केरसुणीलाही लक्ष्मी मानून तिचे पूजन आपण करतो. केरसुणीची पूजा आपल्या जीवनातील स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करते. 

बलिप्रतिपदा किंवा पाडवा हा एक अतिशय महत्वाचा दिवस. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नींनी एकमेकांबद्दलचे प्रेम प्रकट करण्याचा हा अनोखा दिवस आहे. याच दिवशी विष्णूने वामनाचे रूप धारण करून दानशूर अशा बळीराजाला पाताळात धाडले पण त्याचवेळी त्याच्या भक्तीचा, निश्चयाचा आणि दानशूरतेचा गौरव म्हणून स्वतः विष्णू त्याचे द्वारपाल झाले. आजकाल शेतकऱ्यालाही आपण बळीराजा म्हणतो पण या बळीराजाशी त्याचा संबंध नाही. श्रीकृष्णाचा ज्येष्ठ बंधू बलराम किंवा बळिभद्र हा शेतीशी संबंधित हल किंवा नांगर हे आयुध वापरत होता. त्याचा संबंध बळीराजाशी आहे. 

भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे भाऊबीज. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्याकडे जेवण करतो, तिच्याकडून ओवाळून घेऊन तिला काहीतरी भेट देतो. या दिवशी बहीणही भावाला ओवाळून त्याला दीर्घायुष्य लाभावे आणि त्याने आपले रक्षण करावे अशी प्रार्थना करते. बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा संदेश देणारा हा सण परस्त्रीकडे भगिनी म्हणून पाहण्याचा, तिचे सन्मान आणि रक्षण करण्याचा संदेश देतो. 

अशी ही दिवाळी. कृतज्ञता, प्रेम, सहकार्य, आदर यासारख्या नैतिक मूल्यांचा जागर करणारी ! आपल्याकडे आपण राजाला दिवाळी काय माहिती असे म्हणतो. त्याचे कारण म्हणजे त्याच्याकडे नित्य दिवाळी असते. त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते. आपणही समाजातील दुर्बल घटकांच्या प्रती प्रेम कृतज्ञता बाळगावी, दुसऱ्यांच्या आनंदातही आपला आनंद मानायला शिकावे. जसे पेरलेले धान्य अनेकपटींनी परत मिळते तसाच दुसऱ्यांना दिलेला आनंदही अनेक पटींनी आपल्याकडे परत येतो. निसर्ग, शेतकरी, पशुधन, आपल्याला वर्षभर सहकार्य करणारी सर्व माणसे यांच्याबद्दल कृतज्ञता, प्रेम बाळगावे. अज्ञानाचा, वाईट विचारांचा, भेदभावाचा अंध:कार दूर करून ज्ञानदीप उजळावे ही शिकवण हा सण आपल्याला देतो. आपण असे वागलो तर राजाप्रमाणेच आपल्याकडेही नित्य दिवाळीच आहे ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१८/१०/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..