इकडची स्वारी
थोडं मनातलं
इकडची स्वारी
परवाच्या दिवशी एका लग्नाला गेलो होतो. लग्नाला वेळ होता. लग्नाचे विधी एका बाजूला सुरु होते. गुरुजींचे मंत्र सुरु होते. छानपैकी वातानुकूलित सभागृहात वऱ्हाडी मंडळी बसली होती. दुसऱ्या बाजूला एक धवल पडदा लावलेला होता. त्यावर वधूवरांचे लग्नापूर्वी झालेले चलतचित्रीकरण हल्ली ज्याला प्री वेडिंग शूट असे गोंडस नाव आहे ते सुरु होते. गुरुजींच्या हाती ध्वनिक्षेपक नसल्याने त्यांचे मंत्रपठण आणि विधी एका बाजूला निवांत सुरु होते. वधुवर आणि त्यांचे आईवडील त्यात अडकले होते. वऱ्हाडी मंडळी मात्र समोरच्या पडद्यावर दिसणारी चित्रफीत आणि निरनिराळे फोटो पाहण्यात मग्न होती. हल्ली लग्नापूर्वीच वधूवरांच्या भेटीगाठी, प्री वेडिंग शूटसाठी डेस्टिनेशन, तिथे एकदोन दिवस राहणे आदी गोष्टी होतात. काळाच्या ओघात झालेला हा बदल पाहून माझे मन नकळतपणे भूतकाळात गेले.
पूर्वीच्या काळी मुलींची लवकर लग्नं व्हायची. मुलगा आणि मुलगी यांच्या वयात बरेच अंतर असायचे. मुलगी लग्न होऊन सासरी जायची तेव्हा ते घर सासूसासरे. दीर, नणंद, भावजयी आदींनी भरलेले असायचे. त्या नवीन घरात हीच मुलगी तशी बहुधा वयाने लहान असायची. साहजिकच आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांना ती अहोजाहो करायची. नवरा देखील वयाने बराच मोठा असायचा. त्याला तरी सगळ्यांदेखत कुठे अरेतुरे करणार ? म्हणून त्यालाही वयाच्या ज्येष्ठतेनुसार आणि एकूणच आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्याने अहोजाहो केले जायचे. बायका चारचौघांमध्ये शक्यतो नवऱ्याचे नाव घ्यायला लाजायच्या. त्यामुळे विशेष प्रसंगी सण समारंभात ' नाव घेणे ' हा प्रकार रूढ झाला असावा. अजूनही ही प्रथा रूढ आहे.
आजकाल नवरा बायको यांच्या वयात फारसे अंतर नसते. ते बरोबरीच्या नात्याने एकमेकांना अरेतुरे म्हणतात. पण पूर्वीच्या ' अहोजाहोत ' एक वेगळीच मजा होती. अजून ' हे ' आले नाहीत. ह्यांना हे आवडत नाही. आमचे हे म्हणजे फार तापट आहेत वगैरे वगैरे ' ह ' ची बाराखडी असायची. ' अहो, ऐकलं का ? ' हे शब्द ऐकायची पुरुषमंडळींच्या कानाला पण जणू सवय झाली होती. ' अहो, ऐकलं का ? ' हे शब्द ऐकणाऱ्याच्या मनात एकाच वेळी उत्सुकता, प्रेम, भीती, धास्ती, धडकी भरवायला पुरेसे असायचे. कारण बायको आता काय सांगते याचा काही नेम नसायचा. अमुक एक वस्तू आणा, इथे सेल लागलाय, मला पाटल्या बांगडया करायच्या, घरातले पैसे संपलेत इथपासून तो मी माहेरी जातेय यापैकी काहीही त्यानंतर ऐकावे लागेल अशी शक्यता असायची.
त्यापूर्वीचा काही वर्षांचा कालखंड पाहिला तर अहोजाहो ऐवजी ' इकडची स्वारी ' यासारखे शब्द यायचे. बायको माहेरी असली तर ' तिकडची स्वारी. ' बायकोकडून असा छानसा उल्लेख झाला की खरोखरोच ' तिकडची स्वारी ' खुश असायची. पूर्वी तर घराघरांत गमतीदार संवाद ऐकायला मिळायचे. कोणी बाहेरून विचारलं की ' अहो, गोपाळराव घरी आहेत का ? ' तर घरातून आवाज यायचा. ' खुंटीवर कोट, टोपी पगडी दिसत नाही. ' याचा अर्थ गोपाळराव घरात नाहीत हे ऐकणाऱ्याने समजून घ्यायचं.
पूर्वी नवऱ्याला जेवायला बोलावताना किंवा हाक मारताना पद्धतीत कसकसे बदल होत गेले ते पाहणे पण मनोरंजक आहे. पूर्वी माजघरातील दारात पडद्याआड उभं राहून जेवणासाठी पतिराजांना बोलावणं केलं जायचं. नऊवारी साडी असायची. कपाळावर ठसठशीत कुंकू असायचं. पतीराज बाहेर लोडाला टेकून बसलेले असायचे. किंवा कोणाशी तरी बोलत असायचे. अशा वेळी नाजूक आवाज यायचा. ' इकडच्या स्वारीनं भोजनासाठी यायचं करावं म्हणते. सगळी तयारी झाली आहे. ' आणखी काळानंतर अहोजाहो सुरु झालं, तेव्हा नऊवारी जाऊन सहावारी आली. कपाळावर टिकली आली. आता त्यांचे ' अहो ' समोर पेपर वाचत बसलेले किंवा टीव्ही पाहात आहेत. जेवण्यासाठी बोलावण्याची पद्धत थोडी बदलली. ' अहो, जेवायला येताय ना ? ताट वाढलंय.' आणि आता तर पुढची पिढी आली आहे. आता साडी ऐवजी पंजाबी किंवा इतर पोशाख असू शकेल. टिकली असेल वा नसेल. आताचे अहो बहुधा थ्री फोर्थ घालून लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये डोके खुपसून बसलेले असणार आणि हाक येईल, ' अरे राजेश ( वा राजा ) जेवायला ये. वाढलंय. तेवढा पाण्याचा ग्लास भरून घे. तुला हवं तर फ्रिजमधून अमुक अमुक वस्तू घे...' आणि त्यापुढील पिढी ? सांगता येत नाही. उलटही होईल. एखादे वेळी राजा स्वयंपाक करील आणि ती म्हणेल मी ऑफिसमधून थकून आले आहे. जरा जेवायला वाढतोस का ? ' काळानुसार हे बदल होणारच ! त्यात कोणालाही वाईट वाटण्याचं काही कारण नाही.
पूर्वी बालभारतीच्या पुस्तकात ' झाल्या तिन्हीसांजा ' या नावाची कवी यशवंतांची एक कविता होती. त्यात आपल्या शेतात गेलेल्या नवऱ्याची बायको खूप वाट पाहते आहे असे दाखवले आहे. अगदी संध्याकाळ झाली आहे. पण आपला पती अजून आला नाही असं सरळ न सांगता ती वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या न येण्याबद्दल चिंता व्यक्त करते. ती म्हणते
अजून कसे येतीना परधान्या राजा
किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हीसांजा.
यात परधान्या राजा ही बैलजोडी. ती अजून कशी आली नाही ? यातूनच आपले प्रियतम आले नाहीत असे ती अप्रत्यक्षपणे सूचित करते. रातकिडे किरकिरत आहेत. अंधार पडला आहे. तिला काळजी लागून राहिली आहे. या सगळ्यात एक वेगळाच गोडवा आहे. काही गोष्टी प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा अप्रत्यक्ष सूचित करण्यामध्ये त्यातील सौंदर्य दडलेले असते. उघड्या आणि हिडीस अंगप्रदर्शनापेक्षा अवगुंठित सौंदर्य मनाला जास्त भावते. त्यात संस्कार, सुसंस्कृतपणा, मर्यादा या साऱ्याच गोष्टी येतात.
अहोजाहो आणि अरेतुरे दोघांतही प्रेम, आदर, एकमेकांच्या भावनांची जपणूक असू शकते. नवरा आणि बायको दोघांनाही हाक मारण्यासाठी जे सोयीचे वाटेल, तसे ते करू शकतात. अरेतुरे मध्ये बरोबरीची भावना, मित्रत्वाची भावना आणि मनमोकळेपणा असू शकतो. मात्र दोघांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. दोघांनीही त्याचा आदर किंवा जाणीव ठेवली तर संसार नक्कीच सुखाचा होईल यात वाद नाही.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०४/०८/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा )
Comments
Post a Comment