साखळी मानव्याची
थोडं मनातलं
साखळी मानव्याची
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने १५ ऑगस्टच्या आधी गावागावातून शालेय विद्यार्थ्यांची एक रॅली काढण्यात आली होती. गावातल्या सगळ्या शाळेतले मिळून चारपाच हजार विद्यार्थी तरी जमले असतील. या विद्यार्थ्यांचे तीन तीनचे गट करण्यात आले. अशा तीन तीन विद्यार्थ्यांची एक मोठीच रांग तयार झाली. गावातील एका टोकापासून सुरु झालेली ही रांग गावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचली. या मानवी साखळीनं जवळपास सर्व गाव पादाक्रांत केलं होतं. आमचं गाव तसं छोटं. त्यामुळे ही गोष्ट सहजशक्य होती. या मानवी साखळीने असा एकेक भाग जोडला जाऊन अख्खा गाव जोडला जाऊ शकतो. अशी अनेक गावं मानवी साखळीने जोडली जाऊ शकतात. या साखळीने तालुका, जिल्हा, राज्य आणि या संकल्पनेचा आणखी पुढे विस्तार केला तर आपला देश जोडला जाऊ शकतो. अनेक देश मिळून जगही जोडले जाऊ शकते.
कशासाठी बरं जोडता येईल ही साखळी ? ही साखळी जोडता येईल चांगल्या कामांसाठी, चांगल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी. ही साखळी मानवतेची असेल. एकमेकांचे हात हातात घेऊन आम्ही चालू लागलो तर केवढी मोठी शक्ती निर्माण होईल ! एकमेकांचा हात हातात आल्यावर आम्ही अशा एका पातळीवर येऊ जिथे धर्माच्या, जातीपातीच्या भिंती गळून पडतील. सगळे एकमेकांच्या मदतीला धावतील. ' नया दौर ' या चित्रपटात एक गाणे आहे. ' साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना. ' किती अर्थपूर्ण आहे हे गाणं ! एखादं चांगलं काम एकट्यानेच करत राहण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून केलं तर ते अगदी सहज होईल. अनेक हात, अनेक मनं एकत्र आली तर केवढी मोठी ऊर्जा निर्माण होऊ शकते ! ही ऊर्जा, ही एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली मने जग बदलू शकतात, क्रांती घडवून आणू शकतात. ही क्रांती चांगल्या विचारांची असू शकते. त्यातून आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात. गरज आहे ती सगळे विसरून एकत्र येण्याची.
आम्ही विद्यार्थी असताना आमच्या शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला एक छोटीशी रोजनिशी दिली होती. आमचे शिक्षक, मुख्याध्यापक सांगायचे की रोज एक तरी चांगलं काम करा. ज्यात तुमचा कोणताही स्वार्थ नसेल असे एखादे तरी चांगले काम करा. त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. एखाद्या तरी व्यक्तीला तुमच्या परीने काहीतरी मदत करा मग ती अगदी छोटीशी असली तरी चालेल. तुम्ही जे काही चांगलं काम केलं, त्याची नोंद या रोजनिशीत ठेवा. आम्ही अधूनमधून तुमची ही रोजनिशी पाहणार आहोत. यातून इतरांना मदत करण्याचा संस्कार बालवयात रुजवला जात होता. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी नकळत करण्याची शाळेची ही सुंदर कल्पना होती. अशा कल्पक शाळा, कल्पक शिक्षक मानवतेची एक साखळीच तयार करतात. ही साखळी जेवढी वाढत जाईल तेवढी जगात चांगल्या गोष्टींची आशा करता येते.
ग्रेटा थनबर्ग या स्वीडनमधल्या मुलीचे नाव कदाचित आपण ऐकले असेल. या शाळेतील विद्यार्थिनीने शाळेच्या बाहेर बसून पर्यावरणाचा जो ऱ्हास सगळ्या देशांनी चालवला आहे त्याच्याविरोधात निदर्शने केली. सुरुवातीला तिला सगळ्यांनी वेड्यात काढले. पण ती आपल्या मतावर ठाम होती. हळूहळू मात्र तिचे म्हणणे सगळ्यांना पटू लागले. अनेक मुलंमुली तिच्यासोबत बाहेर निदर्शनात सामील झाली. पुढे तिला हजारो विद्यार्थ्यांचा पाठींबा मिळाला. ही चळवळ संपूर्ण युरोपात पसरली. ' राईट लाइव्हलीहूड ' या पर्यायी नोबेल पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. जगातील मोठमोठ्या नेत्यांनाही तिने पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल खडे बोल सुनावण्यास कमी केले नाही.
' पे इट फॉरवर्ड ' या नावाचा एक इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटात शाळेतील एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना रोज असंच काही तरी चांगलं काम करायला सांगतात. तेव्हा वर्गातला एक विद्यार्थी म्हणतो की मी माझ्या परीने दररोज तीन लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न करीन. त्या आनंदी झालेल्या तीन लोकांना तशाच पद्धतीने पुढील तीन लोकांना त्यांच्यापैकी प्रत्येकाने मदत करावी असं सांगेन. अशा पद्धतीने दुसऱ्यांना मदत करणाऱ्यांची, आनंद देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल. मल्टी लेव्हल मार्केटिंग मध्ये विविध कंपन्या हाच फंडा वापरून आपले उखळ पांढरे करून घेतात. त्यात लोकांचा फायदा कितपत होतो हा संशोधनाचा भाग आहे. त्यांचा उद्देश वेगळा असतो. या ठिकाणी मी ज्या मानवी साखळीबद्दल बोलतो आहे तिचा उद्देश मात्र उदात्त असा आहे. तो सर्वांच्या कल्याणासाठी आहे.
आज अनेक लोक मानवतेच्या भावनेतून इतरांना मदत करण्यासाठी काम करतात. सिंधुताई सपकाळांनी अनाथ मुलांना आपलेसे केले. पुण्यात डॉ अभिजित सोनवणे भिक्षेकऱ्यांसाठी काम करतात. भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर हे बिरुद ते अभिमानाने मिरवतात. मराठवाड्यातील गेवराईला संतोष गर्जे नावाचा तरुण आणि त्याची पत्नी असंच अनाथ मुलांसाठी अनाथालय चालवतात. डोंबिवलीजवळ अविनाश बर्वे आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी मतिमंद मुलांसाठी शाळा सुरु केली. स्वतः अंध असलेले राहुल देशमुख पुण्यात अंध विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवतात. त्यांच्या राहण्याची, शिक्षणाची सोय करतात. चाळीसगावच्या स्वतः दिव्यांग असलेल्या मीनाक्षी निकम दिव्यांग तसेच निराधार स्त्रिया, मुलींसाठी मोठे काम करीत आहेत. अशी खूप उदाहरणे आहेत. या सगळ्या मंडळींचे एकच म्हणणे असते की इथून जो कोणी शिक्षण घेऊन बाहेर पडेल, आपल्या पायावर उभा राहील, त्याने आपल्यासारख्याच समाजातील इतर व्यक्तींना मदत करावी. त्या व्यक्तीवर जे ऋण आहे, ते त्याने समाजाला अशा प्रकारे परत करावे. अशा कामातून मानव्याची, माणुसकीची साखळी तयार व्हावी.
आजही गावागावातील अनेक व्यक्ती मग ते शिक्षक असतील, पालक असतील गरीब विद्यार्थ्यांना मदत करतात. कोणाची शाळेची फी, परीक्षेची फी भरण्याची ऐपत नसते, कोणी विद्यार्थी गणवेश विकत घेऊ शकत नाहीत. अशा अनेकांना ही मंडळी मदत करत असतात. परतफेडीची कोणतीही अपेक्षा त्यांची नसते. अशी अनेक माणसे मला माहिती आहेत. तुम्हालाही माहिती असतील. आपल्या मदतीची ते फार वाच्यता किंवा प्रसिद्धी करत नाहीत. पण अशा पद्धतीने शिक्षण घेऊन जे कोणी विद्यार्थी बाहेर पडतील, त्यांनी आपल्या परीने तशाच आणखी गरजू विद्यार्थ्यांना किंवा समाजातील दुर्बल घटकांना मदत करावी. दिव्याने दिवा लावावा. आपल्याजवळील प्रकाश इतरांनाही वाटावा. मात्र ही चळवळ अधिक व्यापक होण्याची गरज आहे. कारण मदतीची गरज असलेले अनेक हात आहेत. मदत करणारे हात थोडे आहेत. विंदांच्या शब्दात सांगायचे तर
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
आपण सुद्धा आपल्याकडे येणारी कामवाली बाई, पोस्टमन, झाडूवाले आदींना कधी तरी सहज म्हणून मदत करू शकतो. प्रत्येक वेळा आर्थिकच मदत दिली पाहिजे असे नाही. कधी तरी तुम्ही त्यांना चहा पाणी देऊ शकता. दोन प्रेमाचे शब्द बोलून त्यांच्या कामाचे कौतुक करू शकता. तुम्हाला वेळ असेल तर तुमच्याजवळील कला, ज्ञान इतरांना शिकवू शकता. जे पेराल ते उगवते हे आपल्याला माहित आहे. पण त्यापुढची गोष्ट म्हणजे आपण जे पेरू ते शतपटीने उगवते. आपण जे दुसऱ्याला देऊ ते शतपटीने आपल्याला परत मिळते. आपण दुसऱ्याला आनंद दिला तर तो अनेक पटींनी आपल्याकडे परत येईल हे निश्चित !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२२/०८/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Comments
Post a Comment