यांना काही कळतच नाही ....!

थोडं मनातलं 

 यांना काही कळतच नाही ....!

काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये एक बातमी वाचली. जपानी सम्राट अकीहितो म्हणे आपल्या राज्यपदाचा त्याग करून आपला पुत्र नारूहितो याची सम्राट्पदी नियुक्ती करणार आहे. आता या घटनेने तेथील जनतेला कोण आनंद झाला म्हणे..! जपानी सम्राटाला तेथे दोनशे वर्षांची परंपरा आहे म्हणे. आणि तीस वर्षांनंतर तेथील लोकांना नवीन राजा मिळणार आहे. आता हा आनंद लोकांना साजरा करता यावा म्हणून जपान सरकारने म्हणे दहा दिवसांची सुटी जाहीर केली आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी दहा दिवसांची सुटी देणे लोकांना अजिबात आवडलेले नाही. त्यांनी त्याबाबतीत नाराजी व्यक्त केली.

म्हणूनच मी म्हणतो की यांना काही कळत नाही. आधी मुळात चूक त्या जपानच्या सम्राटाची . कोणी सांगितले नाही तरी स्वतः हून तो पायउतार झाला. राहिला असता अजून काही वर्षे तर कोणी काही म्हटले असते का ? नाहीतर आमच्याकडे भारतात पाहा. कोणी म्हटल्याशिवाय आम्ही सत्तेतून बाजूला व्हायला तयार नसतो. सगळ्या कर्मचार्‍यांना निवृत्तीचे वय आहे, पण सत्तेत असणार्‍याना किंवा राजकारणार्‍याना ते बंधन नाही. सगळ्यांना शिक्षणाची अट आहे पण त्यांना ती नाही. आणि त्यांना ती आवश्यकही नाही. ते मुळातच सर्वगुणसंपन्न असतात. सर्वसामान्यांनाची गोष्ट वेगळी. असो . तो विषय आपला नाहीकाही  वेळा माझ्याकडून विषयांतर ओघाने होते. त्याबद्दल आपण उदार मनाने मला माफ करालच.

तर झालं काय की जपान सरकारने लोकांना आनंद साजरा करावा म्हणून जी दहा दिवसांची सुटी दिली ती लोकांना अजिबात आवडली नाही. त्यांना म्हणे प्रश्न पडला. की या दहा दिवसात जे काम बुडेल ते पुन्हा जास्त काम करून भरून काढावे लागेल. शिवाय या दहा दिवसात सुटी असल्यामुळे पर्यटन वगैरेचा खर्च होईल तो वेगळाच. शिवाय दहा दिवसाचं उत्पन्न बुडेल तर या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ कसा घालायचा ? वेडेच आहेत हे लोक, नाही का ? अहो, सरकार एवढी स्वतःहून सुटी देते आहे, तर करायची ना एन्जॉय...! पण नाही. हे पडले कर्मदरिद्री .

मी म्हणतो,  अरे जरा आम्हा भारतीयांकडे बघा. तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आम्हाला सुटी मिळाली की कोण आनंद होतो !  काम तर नेहमीचेच आहे हो. जरा मौजमजा नको का करायला ?  आमच्या शाळांना उन्हाळयात महिन्या दीड महिन्याची सुटी असते. दिवाळीत पंधरा दिवसांची सुटी असते. शिवाय गणेशोत्सव, नाताळ इ. वेगवेगळ्या सणांच्या सुट्या वेळोवेळी असतातच. सुटयांचा देश म्हणून एक वेगळी ओळख आमची आहे. बँका, सरकारी कार्यालये वर्षातून बर्‍याच वेळा सुट्यांमुळे बंद असतात. या सगळ्या सुटयांचा फायदा घेऊन आम्ही मस्त पर्यटनाला जातो. मॅचेस पाहतो. किंवा अगदी काहीच नाही जमले तर घरी मस्त उशिरापर्यंत झोपून राहतो. सुटीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरा उठणे यासारखे सुख नाही. पण हे सगळे तुम्हाला माहीत असण्याची शक्यताच नाही. आमच्याकडे एक म्हण आहे,  गाढवाला गुळाची चव काय ?  जाऊ द्या.

बरं, मी असंही ऐकलंय की तुम्हाला म्हणे ऑफिसमध्ये सलग तेरा तास काम करायची सवय आहे म्हणे..! त्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. इतके काम करणे आरोग्याला चांगले नाही. बरं, बायका सुद्धा तेवढेच काम करतात म्हणे. शिवाय घरी आल्यावर घरकाम वेगळेच ! त्यांच्याकडे घरकामाला नोकर ही कल्पनाच नाही. सगळे मिळून घरातील कामे करतात. ऑफिसमध्ये काम, घरात काम. अरे आहे काय ? या जपानी लोकांना म्हणे वर्कहोलिक म्हणतात. वर्कहोलीक म्हणजे सतत कामात व्यस्त असणारे. आमच्याकडे अल्कोहोलिक वगैरे शब्द आम्हाला माहिती आहेत. वर्कहोलिक ही भानगड आमच्या पचनी पडणारी गोष्ट नाही बुवा.

जपानमध्ये आपल्या महाराष्ट्राएवढी लोकसंख्या आहे. आणि आपली देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. पण जपान आज जगातील श्रीमंत देशांपैकी एक राष्ट्र आहे. पण जपान पुढे गेला तो तेथील लोकांच्या कार्यनिष्ठेमुळे . जपानी कार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आणि अन्य उत्पादने यांना एक विशिष्ट असा उत्तम गुणवत्तेचा  दर्जा आहे. जपानी लोक आपल्या कामाशी आणि कामाच्या दर्जाशी कधीच तडजोड करीत नाहीत. जपानमध्ये अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे आलीत आणि सतत येत असतात. पण आपल्या अथक प्रयत्नाने आणि कष्टाने त्या लोकांनी आपल्या देशाला प्रगतिपथावर नेले आहे. दुसर्‍या महायुद्धात जपानची बेसुमार हानी झाली. हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे तर बेचिराख झाली होती. पण त्यातून जपानने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. ते या अशा देशभक्त आणि आपल्या कामावर निष्ठा असणार्‍या जपानी जनतेमुळे.

जपानी लोक वर्षातून केवळ 9 दिवसच रजा घेतात. त्यांच्या या करण्यामागे आपला देश उत्पादनात पुढे जावा, संपन्न व्हावा ही भावना असते. त्यामुळे जपान आज विकसित देश आहे. आणि आपला देश विकसित होण्यासाठी धडपडतो आहे. आपला देश तर त्यामानाने किती मोठा ! नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध. पण असो देशाचे काय जे व्हायचे ते होईल. आपण कशाला त्याची चिंता करायची ?

या जपान्यांना काही कळत नाही. म्हणून आपण काय तसेच वागायचे ? जपानमध्ये सुद्धा कधी कधी आपल्याकडे होतात तसे संप होतात. पण  ते संप सुद्धा करतात ते ज्यादा काम करून. आता याला काय म्हणावे ? दुर्दैव, दुसरं काय ! अरे, संपच करायचा आहे ना, तर काम कशाला करतात ? आपल्याकडे संप म्हणजे संप. नो काम. त्याला खरा संप म्हणतात. आपले सरकार कधी कधी काही कारणासाठी आपल्याला सुटी देते. सुटीत ते काम करावे एवढीच माफक अपेक्षा असते. आता आपल्याला मतदानासाठी सुटी दिली गेली. उद्देश काय की प्रत्येकाने मतदान करावे. आपले राष्ट्रीय कर्तव्य करावे. पण सुटी जाहीर करून असा काय फरक पडला ? मतदानाची टक्केवारी काही वाढली नाही. उलट आपल्याकडे त्याला जोडून लोकांनी दोनतीन दिवस सुटी घेऊन पर्यटन किंवा इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यात धन्यता मानली. आणि फ्रेश होऊन आली मंडळी. पुन्हा कधी सुटी मिळेल या प्रतिक्षेत. त्यांचे बिचार्‍यांचे पुढील सुटयांचे नियोजन सुद्धा तयार असते.

तात्पर्य काय, या जपान्यांनी बर्‍याचशा गोष्टी भारतीयांकडून शिकायला हरकत नाही. याबाबतीत तरी आपण विश्वगुरू होऊ शकतो. आणि हा लेख वाचून कोणीही जपानी लोकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. फक्त माहिती म्हणून तुम्हाला ते सांगितले इतकेच. मी आधीच म्हटले ना यांना काही कळत नाही...!

-        ©  विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 


Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..