रातोंके साये घने...
थोडं मनातलं
रातोंके साये घने...
माणसाचं जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांचं यांचा मेळ असतो. सुख आणि दुःख एकेकटं कधी येत नाही. आपण जेव्हा अत्याधिक आनंदात असतो, तेव्हा मनात कुठे तरी धाकधूक असते की हे नक्की खरंय का ? हे संपणार तर नाही ना ? आणि खरंच कोणतीही परिस्थिती सतत कायम कधीच राहत नाही. सुखाच्या पाठोपाठ दुःखाचा प्रवेश जीवनाच्या रंगमंचावर होतोच. किंबहुना जेव्हा सुख आनंदी कपडे घालून रंगमंचावर प्रवेश करते तेव्हा त्याच्या पाठीमागे विंगेत दुःख वाट पाहत उभेच असते. सुख आणि दुःख दोन्हीही येतात आणि आपल्या जीवनात त्यांची भूमिका बजावून जातात. आपण किती आनंदी राहायचे, किती दुःखी व्हायचे हे ते आपल्यावर सोडून देतात. कन्फ्यूशियस नावाचा एक तत्वज्ञ होता. त्याला एकदा त्याच्या शिष्याने विचारले की सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत लक्षात ठेवावी अशी कोणती गोष्ट आहे ? तेव्हा कन्फ्यूशियसने उत्तर दिले की आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे ' हेही दिवस जातील. '
आपण सामान्य माणसे ! कधी कधी संकंटांची मालिकाच आपल्या स्वागताला उभी असते. एक झाले की दुसरे. अशा वेळी आपला धीर साहजिकच खचतो. आपण निराश होतो. परिस्थितीला दोष देऊ लागतो. माझ्याच वाट्याला ही सगळी संकटे, समस्या का असा प्रश्न विचारू लागतो. काही दुर्बल मनाची माणसे तर आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडतात. पण संकटे कोणाच्या जीवनात आली नाहीत ? त्यांच्यापुढे हार न मानता त्यांचा सामना करता आला पाहिजे. अगदी राम, कृष्ण, शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला आढळून येईल की त्यांचे जीवन सुरुवातीपासूनच केवढे संकटांनी भरले होते. पण ही माणसे खचून गेली नाहीत. ती परिस्थितीच्या डोक्यावर पाय देऊन त्यावर आरूढ झाली.
श्रीरामाला राज्याभिषेक होणार होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी वनवासात जावे लागले. प्राणप्रिय सीतेचे अपहरण झाले. रावणासारख्या महाबलाढ्य शत्रूशी गाठ पडली. श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच संकटे पाचवीला पुजली होती. जन्म झाला बंदिवासात. नंतर कंसाने त्याला मारण्यासाठी पाठवलेल्या पुतना मावशींसह अनेक राक्षसांशी सामना करावा लागला. शिवाजी महाराजांनी तर शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली. कधी कधी तहात सारे गमावण्याची वेळ आली पण ते निराश झाली नाहीत. थोरांची चरित्रे या दृष्टीने अभ्यासली नाहीत तर त्यांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, तिच्याकडेच दुर्लक्ष केल्यासारखे होईल.
जेव्हा जीवनामध्ये निराशा आपल्याला घेरते तेव्हा आपले आवडते छंद आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा देतात. अशी ऊर्जा देणाऱ्या साधनांमध्ये निसर्ग, आपल्याला प्रसन्नता देणारे संगीत, आवडणारी आणि वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी पुस्तके, जगण्याची ऊर्जा देणारे आपले मित्र यांचे स्थान कोणी घेऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी निराशेचा अंधार दूर करून तुमच्या जीवनात आनंदाची पहाट आणण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. आज मला असेच एक सुंदर गाणे आठवते आहे. निराश परिस्थितीत वाट दाखवणारे, मरगळलेल्या मनाला उभारी देणारे. ते गाणं आहे ' अन्नदाता ' या चित्रपटातलं. या गीतात चारच कडवी आहेत पण ज्यांच्या कंठातून प्रत्यक्ष सरस्वती गीताचे बोल होऊन प्रकटते अशा लता मंगेशकरांच्या सुरांनी या गीताला अप्रतिम सामर्थ्य प्रदान केले आहे. कवी योगेश यांच्या गीताला सलील चौधरी यांचं संगीत आहे. जया भादुरीचा पडद्यावरील समर्थ अभिनय पाहण्यासारखा आहे.
गीताची सुरुवात लता मंगेशकरांच्या हळुवार सुरांनी होते. ' रातोंके साये घने...' या शब्दांनी गाण्याची सुरुवात होते. हळूहळू आवाज वरच्या पट्टीत जायला लागतो. एका वेगळ्याच ट्रान्समध्ये हे गाणं आपल्याला घेऊन जातं. आपल्या सगळ्यांना रात्र संपून पहाटेची प्रतीक्षा असते. रात्र संपून पहाटेची प्रतीक्षा करणे हे जीवनातील आशेचे प्रतीक आहे. संकटे, समस्या म्हणजे जणू आपल्या जीवनातील काळोखी रात्र ! गाण्याच्या पहिल्या कडव्यात कवी म्हणतो
रातोंके साये घने जब बोझ दिल पे बने
ना तो जले बाती ना हो कोई साथी
फिर भी न डर अगर बुझे दिये
सहर तो हैं तेरे लिये.
रात्रीच्या काळोखाची भीती मनावर असेल, आजूबाजूला कोणताच दिवा प्रकाशमान दिसत नाही. साथीलाही कोणीच नाही. अशा वेळी हे मना, घाबरू नकोस. लक्षात ठेव की पहाट तुझ्यासाठीच आहे. हा अंधार, ही रात्र संपणार आहे. ( ' सहर ' हा उर्दू शब्द आहे. सहर म्हणजे पहाट. )
दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतो
जब भी मुझे कभी कोई जो गम घेरे
लगता हैं होंगे नही सपने ये पुरे मेरे
कहता हैं दिल मुझको माना हैं गम तुझको
फिर भी न डर अगर बुझे दिये...
जेव्हा कधी मी खूप संकटात असतो, निराश करणारी परिस्थिती असते तेव्हा असे वाटते की माझे स्वप्न, माझ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. पण माझे मन मला सांगते की तुला समस्या आहेत, दुःख आहे हे मान्य पण तू घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. अरे वेड्या पहाट तुझ्यासाठीच आहे.
तिसरे कडवे आपल्याला सांगते
जब ना खिले चमन मेरा बहारोमे
जब डुबने मैं लगू रातोंके मंझधार में
मायूस मन डोले पर ये गगन बोले
फिर भी न डर अगर बूझे दिये...
सगळीकडे वातावरण कसं सुंदर, प्रसन्न आहे पण अशा वातावरणातही माझं जीवन कसं निराश, मरगळलेलं आहे !रात्रीच्या नैराश्येच्या अंधारप्रवाहात मी बुडतो आहे. मन निराश आहे. पण हे समोर दिसणारं आकाश मला सांगतं आहे की घाबरू नकोस, उद्याचा सूर्योदय तुझ्यासाठी आहेच. निराश होण्याची कारण नाही. ही भयंकर रात्र संपणार आहे.
शेवटच्या कडव्यात कवी आपल्याला सांगतो
जब जिंदगी किसी तरह बहलती नही
खामोशीयोंसे भरी ये रात ढलती नही
तब मुस्कुराऊ मैं ये गीत गाऊं मैं
फिर भी न डर अगर बुझे दिये...
कधी कधी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही गोष्टीने मनाला बरे वाटत नाही, भयानक शांतता असलेली ही रात्र लवकर संपत नाही, तेव्हा मी हसतो आणि हे सुंदर, आशादायी गीत गातो. कोणतं ? तर हेच ! रात्र कितीही भयानक असली तरी ती संपणार आहे. सुंदर आशादायी पहाट उज्ज्वल उद्याची आशा घेऊन येणारच आहे.
लता मंगेशकर यांनी हे गाणं इतकं अप्रतिम गायलं आहे की कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. अशी ऊर्जा देणारी खूप गाणी आहेत. आणखी काही गाण्यांबद्दल पुढे केव्हा तरी ! या गाण्याबद्दल लिहिताना मला कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात
कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१२/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Comments
Post a Comment