थोडं मनातलं - आनंदनिधान
थोडं मनातलं
आनंदनिधान
जॉन किट्स नावाचा एक कवी असं म्हणतो की, A thing of beauty is joy forever . याचा अर्थ असा की एखादी खरोखरची सुंदर गोष्ट असते ती कायमस्वरूपी आनंद देणारी असते. त्या गोष्टीजवळ कधीही गेलं तर ती आनंदाचीच बरसात करणार. तिच्याजवळ असणारा तो आनंदाचा ठेवा कधीही कमी होत नाही. परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरला लताबाईंची ( म्हणजे आपल्या लतादीदी हो ! ) पहिली जयंती साजरी झाली. त्या आता असत्या तर ९३ वर्षांच्या झाल्या असत्या. म्हणजे ही ९३ वी जयंती. लतादीदी म्हणजे आनंदनिधान होत्या. त्या होत्या तेव्हाही त्यांच्यावर भरपूर लिहिलं गेलं, बोललं गेलं. आता त्या नाहीत तरी त्यांच्यावर भरपूर लिहिलं जातंय, किंबहुना पहिल्यापेक्षा अधिकच लिहिलं जाईल. २८ तारखेला त्यांच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल सांगणारे खूप लेख आहे. वर्तमानपत्रांच्या शनिवार रविवारच्या पुरवण्या त्यांच्या लेखांनी रंगल्या. एकंदरीत २८ संप्टेंबरचा दिवस ' लतामय ' झाला होता.
लतादीदींवर कोणी लिहिलं नाही ? ज्याला ज्याला वाटलं तो तो लिहिता झाला. अगदी आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांच्यापासून ते आजपर्यतच्या अनेक साहित्यिकांनी निरनिराळ्या प्रकारे हा ' लता राग ' आपापल्या परीने आळवला. अनेक नव्या जुन्या कवींची, शायरांची चढाओढ लागली. लता नावाच्या या वेलीला दिवसेंदिवस बहर येत गेला आणि त्या वेलीवर विविध साहित्यसुमने दरवळू लागली. दीदींवर वेगवेगळ्या लोकांनी केलेलं लिखाण म्हणजे कधी पंचपक्वानांची मेजवानी असेल तर कधी कधी साध्या जेवणातील आनंद ! पण हा आंनद कायमच राहिला ! असं का व्हावं याचा मी विचार करू लागलो आणि उत्तर सापडलं. मला कळलं की दीदी हे आनंदनिधान आहे ! आणि मग वर सुरुवातीला लिहिलेल्या कीट्सच्या ओळी आठवल्या. दीदी आणि दीदींचं गाणं म्हणजे thing of beauty आहे आणि म्हणूनच तो चिरंतन आनंदाचा स्रोत आहे.
चिरंतन आनंद देणाऱ्या गोष्टी अशा असतात. ' आनंद ' हेच त्यांचे दुसरे नाव असते. तो आनंदघन कधीही रिता होत नाही. आनंदाची बरसात करतच राहतो. मला गुलजार यांच्या गीताच्या लतादीदींनी गायिलेल्या ओळी आठवतात. ' आकाश के ऊस पार भी आकाश हैं ' या गीतात गुलजार म्हणतात
झरते रहो बादल झरे जिस तरह
सागर में भी गिरके कभी खाली न हो
असा हा कधीही रिता न होणारा आनंदघन.
असे चिरंतन आनंदघन आपल्या जीवनात आपल्याला अनेकदा भेटतात. ते आनंदाचं निधान असतात. निधान म्हणजे खाण किंवा भांडार. हे भांडार कधीही रितं होत नाही. काही माणसं, मित्र, नातेवाईक आपल्या जीवनात अशीच आनंदघनाची भूमिका बजावतात. ते कायम आनंदनिधान असतात. अशीच माझ्यासाठी आनंदनिधान असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पुस्तके. चांगले लेखक आणि चांगली पुस्तके कायमच आपल्या जीवनात फार महत्वाची भूमिका बजावतात. ते तुम्हाला कायम आनंदच देतात. त्याच्या जोडीला तुम्हाला ज्ञान देऊन बहुश्रुत करतात. ते तुम्हाला कधी दूर लोटत नाहीत. तुमच्याकडे काही मागत नाहीत. तुम्ही कधीही त्यांच्याकडे जा. ते आनंदमेघ होऊन बरसायला तयारच असतात. कधीही रिते होत नाहीत. रामायण महाभारतासारखे ग्रंथ, राम, कृष्ण यांची रसाळ चरित्रे ही देखील आनंदनिधानच आहेत. निरागस, निष्पाप आणि हसरी बालके देखील परमेश्वराचेच रूप आपण मानतो. त्यांच्याजवळ लबाडी, खोटेपणा यासारख्या मोठया माणसांमध्ये आढळणाऱ्या दुर्गुणांचा लवलेशही आढळत नाही. राम आणि कृष्ण यांच्या बालपणीच्या लीलांचे वर्णन वाचताना आपण त्यात रमून जातो.
विविध प्रकारच्या कला या देखील आनंदाचे चिरंतन स्रोत आहेत. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला या सारख्या कलांनी माणसाचे जीवन समृद्ध केले आहे. शास्त्रीय गायन, लता मंगेशकर, पं भीमसेन यांच्यासारख्या गायकांचे गायन ऐकणे हे सुद्धा आनंदाचे निधान आहे. म्हणून किट्स सारखा कवी म्हणतो ते खरेच आहे. ताजमहालासारखी सुंदर वास्तू, दक्षिण भारतातील देखणी मंदिरे, डोळ्यांचे पारणे फेडणारे काश्मीर सारख्या प्रदेशातील निसर्गसौंदर्य, विविध उद्याने, निरनिराळे पक्षी आणि प्राण्यांनी समृद्ध असलेला निसर्ग, हिरवीगार वृक्षराजी या गोष्टी कधीही त्यांच्याजवळ गेलं तर आनंदच देतात. आपले औदासिन्य घालवून आपल्याला ताजेतवाने करतात. हे सगळे आनंदाचे स्रोत आहेत. आनंदनिधान आहेत. रात्रीची निरव शांतता, तारकांनी भरलेलं आकाश, उसळणारा नी फेसाळणारा दर्या, उगवतीचा आणि मावळतीचा सूर्य ही सगळी निसर्गाची विविध रूपे मनाला केवढा आनंद देतात ! मनातील क्षुद्रपणा घालवून मन विशाल करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे.
आईबाबा हे असंच एक आनंदनिधान आपल्या घराघरात असतं. ' आई ' या आनंदनिधानाची तर किती वेगवेगळी आणि विलोभनीय रूपे ! सगळ्या लेखक आणि कवींचे प्रेरणास्थान असलेलं हे व्यक्तिमत्व. कायमच प्रेम, माया आणि आनंदाची बरसात करणारं. तिच्या पिल्लाला दुःख झालं किंवा आनंद झाला तरी दोन्हीही प्रसंगी तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंची बरसात होते. आपल्या लेकरावर मायेची सावली ती धरते. ऊन पाऊस, वारावादळं आपल्या पंखांवर झेलते. कधीतरी तिच्याजवळ बसावं, तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडावं. तिचा हात आपल्या अंगावरून मोरपिसासारखा फिरवून घ्यावा. हे आनंदनिधान घराघरात असतं. कधीकधी ज्याच्याजवळ असतं त्याला त्याची किंमत कळत नाही. छत्र नाहीसं झाल्यावर कधी कधी भान येतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून हे आनंदनिधान आहे तोपर्यंत कधीच त्याचा अव्हेर करू नये.
पण खरं आनंदनिधान तर ' तो ' आहे जिथून आनंदाची उत्पत्ती होते. ' आनंद ' हेच त्याचे दुसरे नाव आहे. ते आनंदनिधान म्हणजे गुरु किंवा परमेश्वर. प्रत्येकाच्या अंतरात तो वसलेला आहे. राम, कृष्ण, शंकर, पांडुरंग, विष्णू...! नावं भलेही वेगवेगळी असतील पण तत्व एकच आहे, आनंदनिधान तोच आहे. एकदा का आनंद हा गवसला की मग काहीच मिळवायचे बाकी राहत नाही. आनंदच काठोकाठ भरून उरतो. तुकाराम महाराजांना जेव्हा हे ' आनंदनिधान ' गवसलं तेव्हा त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे
अशी त्यांची भावावस्था झाली. आनंदाचा डोह, आनंदाचे तरंग उठू लागले. अवघा रंग एक झाला. एका आनंदाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. दुःख, शोक, राग, भय आदींचा लवलेशही उरला नव्हता. ' काहिचिया बाही ' अशी त्यांची ही अवस्था कशामुळे झाली, कोणी केली ? उत्तर एकच आणि ते म्हणजे 'आनंदनिधान ' ! संत नामदेवांना देखील हे आनंदनिधान गवसले होते. आणि मग त्यांचं सगळंच विठ्ठलमय होऊन गेलं.
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
आपल्यालाही असे आनंदनिधान जीवनात भेटतच असतात. फक्त त्यांचा शोध घेतला पाहिजे. ती दृष्टी विकसित केली पाहिजे. मग आपल्या जीवनातही आनंदघन बरसतील. आनंदाचे निधान आपल्याजवळच आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३०/०९/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Comments
Post a Comment