थोडं मनातलं अजिंठा लेणी आणि बुद्ध दर्शन - भाग ३

 थोडं मनातलं 

अजिंठा लेणी आणि बुद्ध दर्शन - भाग ३

आपला सारथी आणि मित्र असलेला छन्न याला निरोप दिल्यानंतर मजल दरमजल करीत सिद्धार्थ मगध नगरीजवळ येऊन पोहोचला. एका पिंपळ वृक्षाखाली त्याने आपले आसन मांडले. त्याचे तेजस्वी मुखमंडल, राजबिंडे रूप, पुष्ट बाहू पाहून नगरातील स्त्री पुरुष हा कोणीतरी सिद्ध पुरुष दिसतो म्हणून त्याच्या दर्शनाला येऊ लागले. मगधापती बिंबिसार हा गुणिजनांचा चाहता होता. त्याच्या कानावर ही वार्ता गेली. त्याने आपल्या गुप्तहेरांकरवी त्याच्याबद्दल तपास करवला. गुप्तहेरांनी तपास करून बिंबिसाराला सांगितले, ' महाराज, हा तोच शाक्य कुलोत्पन्न युवराज गौतम आहे, ज्याने आपलं राज्य त्यागून संन्यास पत्करला आहे. याच युवराजांबद्दल ऋषींनी अशी भविष्यवाणी केली होती की एक तर तो चक्रवर्ती सम्राट तरी होईल किंवा बुद्ध तरी होईल. ' 

स्वतः मगधापती बिंबिसाराने गौतमाची भेट घेण्याचे ठरवून वनाकडे प्रस्थान केले. ध्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थाचे देखणे रूप पाहून तो भारावून गेला. सिद्धार्थाशी त्याने प्रेमळ संवाद साधला. तो म्हणाला, ' हे शाक्य युवराज, आपला जन्म एका पराक्रमी अशा राजवंशांत झाला आहे. ज्या हातात शस्त्र धरण्याची ताकद आहे, त्या हातात भिक्षापात्र शोभत नाही. आपल्या राज्यात राहणे आपल्याला योग्य वाटत नसेल तर आपण माझ्या राज्यात राहा. मी माझे अर्धे राज्य आपल्याला द्यायला तयार आहे. पण आपण आपल्या निर्णयाचा एकदा पुनर्विचार करा आणि परत फिरा. '

यावर सिद्धार्थ म्हणाला, ' महाराज, आपले म्हणणे एखाद्या राजाला साजेल असेच आहे आणि योग्य असाच सल्ला आपण मला देत आहात. पण आता कोणत्याही ऐहिक सुखाची ओढ मला राहिली नाही. विषयसुखाच्या मागे धावणारे आणि अंतिमतः दुःखी होणाऱ्या सामान्य जनांबद्दल मला कळवळा वाटतो. त्यांच्या दुःखाचे कसे निराकरण करता येईल याच्या शोधात मी निघालो आहे. मला त्याच्या बदल्यात कोणी पृथ्वीचे राज्य देऊ केले तरी ते नको आहे. ' 

त्याचे हे तेजस्वी उद्गार ऐकून बिंबिसार राजाने त्याला त्याच्या ध्येयप्राप्तीसाठी सुयश चिंतिले आणि तो आपल्या नगराकडे परत फिरला. सिद्धार्थाने आपली ध्येयमार्गाकडे वाटचाल पुढे सुरु ठेवली. काही काळ काही ऋषींच्या आश्रमात त्याने वास्तव्य केले. त्या विविध ऋषींकडून त्याने समाधी मार्गाच्या विविध पायऱ्या जाणून घेतल्या. या समाधी पायऱ्यांचा त्याला आपल्या पुढील तपाचरणासाठी उपयोग झाला. विविध संप्रदायांचे तुलनात्मक अध्ययन त्याने केले. त्यात त्याला असे आढळून आले की मानवाला असणारी स्वर्गप्राप्तीची ओढ आणि मोक्षप्राप्तीची तळमळ हेच या सर्व उपासना मार्गांचे प्रमुख सूत्र आहे. उपासना मार्गांच्या या फलनिष्पत्तीबद्दल तो फारसा समाधानी नव्हता. या वैराग्यमार्गातून मानवाच्या हिताच्या दृष्टीने आणखी काही निष्पन्न होऊ शकेल का याचा सततचा विचार त्याच्या मनात होता. त्यातूनच कठोर अशी तपश्चर्या करण्याचा त्याने निश्चय केला. 

मजल दरमजल करीत तो गया प्रांतातील उरुवेला गावाजवळ येऊन पोहोचला. तेथे नैरंजरा नदीच्या काठी काही ऋषी तप करताना त्याला आढळले. या ठिकाणीच गौतमाने कठोर तपश्चर्या करायचे ठरवले. केवळ एका घासपुरतेच तो अन्नग्रहण करी. या तपामुळे त्याची अगदी अस्थिपंजर अशी अवस्था झाली. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. एकच प्रश्न त्याच्या मनाला पोखरत होता की  देहदंड सोसून हे जे तपाचरण मी करतो आहे ते कशासाठी ? त्यातून मला हवे ते साध्य होणार आहे का ? अशी साधारण सहा ते सात वर्षे निघून गेली. तो ज्या वटवृक्षाखाली तपश्चर्येला बसला होता, तेथे एके दिवशी अचानक सुजाता नावाची स्त्री आली. ती गावातील जमीनदाराची सून होती. वटवृक्षाखाली वनदेवतेचा वास असतो, अशी तेव्हा समजूत होती. तिने वनदेवतेला पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता आणि पुत्रप्राप्तीनंतर तो नवस फेडण्यासाठी ती तिथे आली होती. 

ध्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थाला पाहून आणि त्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्यालाच वनदेवता समजून सुजाताने नैवेद्य अर्पण केला. आतापर्यंत जवळपास उपाशीपोटीच राहणाऱ्या सिद्धार्थाने असा विचार केला की उपाशी राहून शरीराला अति क्लेश देण्यापेक्षा देहरक्षणापुरते तरी अन्न ग्रहण केले पाहिजे. त्याने त्या स्त्रीच्या नैवेद्याचा स्वीकार केला. पोटात अन्न गेल्यानंतर त्याला बरे वाटले. मनामध्ये एक प्रकारचे द्वंद्व सुरु झाले होते. ते द्वंद्व होते सद्विचार आणि वासना यांच्यातील. गौतमाला आपल्या ध्येयापासून विचलित करण्याची हीच योग्य वेळ आहे असे समजून ' मार ' नावाचा राक्षस ज्याचा यक्ष किंवा नमुची म्हणून उल्लेख केला गेला आहे, तो प्रकटला. ' मार ' म्हणजे जीवनातील ऐहिक सुखांचे प्रतीकच ! विरक्ती प्राप्त झालेल्या मनाला तो पुन्हा संसारात गुंतवण्याचा प्रयत्न करीत होता. तो सिद्धार्थाला म्हणाला, ' बघ मरणाचे हजार हिस्से आहेत. त्यातील एकच आपल्या वाट्याला येतो. कशासाठी उपाशी राहून एवढी तपश्चर्या करतोस ? हे जीवन फार सुंदर आहे. त्याचा आनंद घे. त्याचा आनंद घेताना तुला अनेक पुण्याची कामे करता येतील. ' ते ऐकल्यावर सिद्धार्थ म्हणाला, ' मला पुण्याची आवश्यकता नाही. ज्यांना पुण्य हवे असेल, त्यांनी खुशाल तुझ्या मार्गाने जावे. ' सिद्धार्थ आणि मार यांच्यात बरेच संभाषण झाले. 

मला वाटते सिद्धार्थ आणि मार यांच्यात झालेला जो काही संवाद आहे, तो म्हणजे आपल्याच मनातील द्वंद्वाचे प्रतीक आहे. ते एक प्रकारचे युद्धच असते. या युद्धात आपण सारेच अर्जुन असतो आणि आपणच श्रीकृष्ण असतो. जो अर्जुन जिंकतो तो सिद्धार्थ होतो, गौतम होतो, बुद्ध होतो. या युद्धात सिद्धार्थ जिंकला, मार हरला. सिद्धार्थाला हरवायला मार एकटा आलेलाच नव्हता. सोबत त्याची सेना होती. या सेनेत माणसाला आकर्षित करणाऱ्या सगळ्याच गोष्टी होत्या. माराची सेना काम, क्रोध, मत्सर, सुखलोलुपता, दांभिकता आदींनी समृद्ध होती. तिचा बुद्धाने पराभव केला. याच प्रसंगाचे सुंदर चित्रण अजिंठा लेण्यातील गुहा क्रमांक एकमध्ये आपल्याला आढळते. मार हा एका विशाल हत्तीवर बसून आलेला आहे. बुद्धावर आक्रमण करण्याची आज्ञा त्याने आपल्या सैन्याला दिली. पण बुद्धापुढे त्यांची सगळी अस्त्रे विफल झाली. मार म्हणाला, ' तुला भीती नाही वाटत माझ्या सेनेची ? ' बुद्ध म्हणाला, ' मी याच्या पलीकडे गेलो आहे. ' असे म्हणून बुद्धाने आपला एक हात जमिनीला लावला. तीच मुद्रा अजिंठ्यातील चित्रात आहे. बुद्धाने भूमीला हात लावताच भयंकर असा धरणीकंप झाला. त्याने माराची सेना भयभीत होऊन पळाली. 

या चित्रात बुद्ध मध्यभागी आहे. बाजूला मार आणि त्याची सेना आहे. बुद्ध पदमासनात बसलेला असून त्याच्या चेहऱ्याभोवती तेजोवलय आहे. मुद्रेवर अपूर्व शांती आहे. नेत्र अर्धोन्मीलित आहेत. त्याच्या डोक्यावर हिरव्या रंगाची प्रभा आहे. ती बोधीवृक्षाचे प्रतीक असावी. मार राक्षसाची एक कन्या चित्रात डाव्या बाजूला दिसते. ती त्याला भुलवण्याचा प्रयत्न करते आहे. या चित्रात विविध आकृत्यांच्या रूपाने आपल्याला मार सेना दिसते. एक योद्धा आपली तलवार परजून सिद्धार्थावर धावून जातो आहे तर एक राक्षस त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या राक्षसाच्या डोक्यावर मृत्यूचं प्रतीक दर्शविणारं एक घुबड आहे. जवळच एक अश्वमुखी किन्नर आणि त्याच्या पाठीमागे व्याघ्रचर्म कमरेला गुंडाळलेली एक भयंकर अशी वृद्धेची आकृती आहे. तिची मुद्रा आणि एकूणच सगळा अवतार भीतीदायक असून स्तन लोंबत आहेत. सिद्धार्थाच्या उजव्या बाजूला चित्रात अशाच विविध आकृत्या आहेत. बुद्धाच्या समोरच्या बाजूला जेथे त्याच्या अर्धोन्मीलित नेत्रांची सहज दृष्टी जाईल, अशा ठिकाणी दोन स्त्रिया आहेत. त्यातील एक स्त्री गर्भार आहे. ही गर्भार स्त्री बहुधा वासना आणि जीवनाचे प्रतीक असावी. कारण ती बाळाला जन्म देणार आहे. अशी विविध चित्रे विविध गोष्टींचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. चित्रकलेच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास अर्धोन्मीलित नेत्र आणि शांत मुद्रा असलेली बोधिसत्वाची आकृती, इतर क्रूर प्राण्यांच्या तुलनेत गौतमाला मोहात पाडू इच्छिणारा मार आणि त्याची सौम्य मुद्रा, गर्भार स्त्री ही सगळी चित्रे अप्रतिम आहेत. 

याच लेणी क्र एक मधील बोधिसत्व पद्मपाणी याचे चित्र अजिंठ्यातील सर्वोत्तम चित्रांपैकी एक आहे. तो त्रिभंगी म्हणजे तीन ठिकाणी ( मान, कंबर आणि पाय ) वाकलेला आहे. मस्तकावर नानाविध फुले आणि रत्नजडित मुकुट आहे. चेहरा अतिशय देखणा आणि रेखीव आहे. मुद्रेवर किंचित उदासी दाखवण्यात चित्रकार कमालीचा यशस्वी झाला आहे. अशाच प्रकारे छतावरील अप्रतिम चित्रे आपलं लक्ष वेधून घेतात. याशिवाय गर्भगृहातील पद्मासनात असलेली बुद्धमूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. याशिवाय बोधिसत्व वज्रपाणी, श्रावस्तीचा चमत्कार आदी अप्रतिम चित्रे आहेत. 

ही सगळी चित्रे अप्रतिम आहेतच पण सिद्धार्थ आणि मार यांच्यातील द्वंद्व आणि संघर्ष आपल्याला खूप काही सांगून जातो. त्या अवस्थेतून प्रत्येक व्यक्ती जातच असते. फरक एवढाच असतो की आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती माराच्या प्रलोभनाला बळी पडतात तर सिद्धार्थ त्यावर विजय प्राप्त करतो म्हणूनच तो बोधिसत्व असतो आणि बुद्ध पदाला पोहोचतो. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१२/०३/२०२३

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 








Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..