थोडं मनातलं अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन
थोडं मनातलं
अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन ( भाग एक )
औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिद्ध अशी अजिंठ्याची लेणी आहेत. अर्धवर्तुळाकार किंवा घोड्याच्या नालेच्या आकाराची ही लेणी पाहिली की मला कधी कधी मुंबईच्या नरिमन पॉईंटची आठवण येते. नरिमन पॉईंटच्या भोवती सिमेंटचे जंगल आहे. पण ही अजिंठ्याची लेणी अत्यंत निसर्गरम्य वातावरणात वसलेली आहेत. गोलाकार अशा हिरव्याकंच टेकडीवर ही लेणी आहेत. खाली वाघुरा नदीचे खळाळते पात्र आहे. आजूबाजूला प्रचंड मोठे डोंगर आहेत. निसर्गाच्या कुशीत अलगद वसलेली ही मानवी प्रतिभेतून निर्माण झालेली प्रतिसृष्टी. ज्याच्या कोणाच्या डोक्यातून या ठिकाणी अशी अप्रतिम काळावर अमीट ठसा उमटवणारी ही कलाकृती निर्माण करण्याची कल्पना जन्म पावली, त्याच्या सौंदर्य दृष्टीचे कौतुक करायला शब्द कमी आहेत.
अजिंठा, वेरूळची लेणी हा आपला अत्यंत अभिमानास्पद असा जागतिक सांस्कृतिक वारसा आहे. संपूर्ण जगातून येथे पर्यटक येतात. पण आपल्याकडील या अनमोल ठेव्याचे महत्व आपल्याकडील लोकांना तेवढे वाटत नाही. अजिंठ्याला आता काय राहिले आहे, वेरूळची लेणी तर बरीचशी भग्न झालेली आहेत असे म्हणून आपणच त्यांचे महत्व कमी करतो. अजिंठा लेणी तर इ.स. पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकात निर्मिलेली एवढी प्राचीन आहेत. त्या काळातील वैभवशाली इतिहासाची, संस्कृतीची आणि लोकजीवनाची साक्ष देत ती आजही उभी आहेत. वाकाटक राजांच्या काळात त्यांची निर्मिती झाली. बौद्ध धर्मात हीनयान आणि महायान असे दोन पंथ आहेत. हीनयान पंथीय लोक मूर्तिपूजा करीत नाहीत, तर महायान पंथीय भगवान बुद्धांच्या मूर्तीची पूजा करतात. अजिंठा लेणीतील काही लेणी हीनयान या पंथातील तर काही लेणी महायान पंथातील लोकांशी संबंधित आहेत.
पण प्रामुख्याने अजिंठा लेणी जगप्रसिद्ध आहेत ती तेथील अजरामर चित्रांसाठी. त्या काळातील चित्रकार आणि शिल्पकार यांच्या कलाकौशल्याचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. विश्वामित्रांनी जशी आपल्या तपसामर्थ्याच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण केली, तशीच प्रतिसृष्टी या शिल्प आणि चित्रांच्या माध्यमातून येथील कलाकारांनी त्या काळी उभारली. ज्या राजांच्या काळात या लेण्यांची निर्मिती झाली, ते राजे कला आणि सौंदर्याचे किती उपासक असले पाहिजेत. त्या काळातील चित्रकला, शिल्पकला कळसाला पोहोचली होती, त्याचे मनोरम दर्शन या लेण्या घडवतात. त्यासाठी त्या काळातील राजांचे आणि कलाकारांचे हे मोठेच ऋण आपल्यावर आहे.
भगवान गौतम बुद्ध या सगळ्या चित्रांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग येथे चित्रित करण्यात आले आहेत. त्यांचा जन्म, गृहत्याग, बुद्धप्रलोभन किंवा मार नावाच्या राक्षसाने त्यांना साधना करण्यापासून परावृत्त करण्याचे केलेले प्रयत्न ज्यांना पाश्चात्य इतिहासकारांनी टेम्पटेशन ऑफ बुद्धा असे म्हटले आहे, भगवान बुद्ध एकाच वेळी हजार ठिकाणी प्रकट झाले तो म्हणजे श्रावस्तीचा चमत्कार, नीलगिरी नावाच्या उन्मत्त हत्तीचे दमन, गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल आदी बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांचे चित्रण येथे आढळते.
अजिंठा लेण्यात बुद्धांच्या पूर्व जीवनातील जन्माच्या कथा मोठया प्रमाणावर आहेत. त्यांना जातक कथा असे म्हटले जाते. या पूर्वजन्मांमध्ये भगवान बुद्धांनी प्रज्ञा,शील, करुणा, धैर्य यासारख्या दहा गुणांमध्ये पारंगतता मिळविली. या पूर्व जन्मांमध्ये त्यांना बोधिसत्व असे म्हटले जाई. बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचे सत्व किंवा क्षमता ज्याच्यामध्ये आहे अशी व्यक्ती. अजिंठ्यातील लेण्यांची संख्या तीस असून त्यात बुद्धांच्या पूर्वजन्मातील एकूण ३६ जातक कथांची चित्रे आपल्याला आढळतात. बौद्ध धर्मातील आचार्यांनी पुढे बुद्ध साहित्याला अनेक प्रकारे समृद्ध केले. त्यातीलच एक महाकवी अश्वघोष. त्यांचे सौंदरनंद हे नाटक प्रसिद्ध आहे. त्यातील कथा अजिंठ्याच्या लेण्यात चित्रित झाली आहे. सुंदरी आणि नंद यांची ही कथा. नंद हा भगवान गौतमांचा सावत्र भाऊ. त्याने गौतम बुद्धांच्या उपदेशावरून संन्यास घेतला. त्याच्या दुःखात त्याची पत्नी सुंदरी हिचा दुःखद शेवट झाला.
या लेण्या नवव्या दहाव्या शतकापर्यंत लोकांना ज्ञात होत्या. सातव्या शतकात भारतात आलेल्या ह्युएन त्संग या चिनी प्रवाशाने आपल्या लेखनात अजिंठ्याच्या लेण्यांचे वर्णन केले आहे. त्यानंतर मात्र या लेण्या हळूहळू लोकांच्या दृष्टीआड झाल्या आणि काही शतकात पूर्णपणे विस्मृतीत गेल्या. १८१९ मध्ये तेथे शिकारीसाठी गेलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याला योगायोगाने या लेण्यांचा शोध लागला आणि त्या जगाला ज्ञात झाल्या.
गौतमाचे बुद्ध झाल्यानंतरचे आयुष्य जेवढे आकर्षक आणि महान आहे, तेवढेच त्यापूर्वीचे सुद्धा. कपिलवस्तूच्या शुद्धोधन राजाला उशिरा प्राप्त झालेले हे पुत्ररत्न साहजिकच त्याचे अत्यंत लाडके असते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या बाळाला त्याची आई त्याच्या जन्माच्या सातव्या दिवशीच पोरके करून जाते. अत्यंत देखणा आणि सर्व कलांमध्ये निपुण असलेल्या या राजपुत्राला कोणत्याही प्रकारचे दुःख दृष्टीला पडू नये म्हणून त्याचा पिता राजा शुद्धोधन काळजी घेतो. सगळी सुखे त्याच्यापुढे हात जोडून उभी असतात. पण या सुखांचा उपभोग घेण्याची लालसा तेव्हाही त्याच्या मनात उद्भवलेली नसते. सिद्धार्थ उर्फ गौतम हा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर विचार करणारा अतिशय संवेदनशील आणि कोमल मनाचा युवक असतो. त्याची ही एक प्रकारची विरक्त वृत्ती पाहून राजाला त्याची काळजी लागलेली असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी दरबारी जनांच्या सल्ल्याने तो त्याचा विवाह करून देण्याचे ठरवतो. त्यामुळे तरी त्याची विरक्ती कमी होऊन मन संसारात रमेल असे त्याला वाटते.
सिद्धार्थाच्या विवाहासाठी ज्या राजकन्येची निवड केली जाते, तिच्या पित्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो. त्यावेळी तिच्या पित्याच्या कानावर सिद्धार्थाचा लौकिक गेलेला असतो. अंगात कोणतेही शौर्य आणि मर्दुमकी नसलेल्या या राजपुत्राला आपली कन्या देणे तो अयोग्य समजतो. वधूपिता म्हणून त्याची चिंता योग्यच असते. पण त्याच्या नकारामुळे शुद्धोधन राजा दुःखी होतो. त्याचे हे दुःख जगाचे दुःख समजून घेणाऱ्या सिद्धार्थाच्या हृदयाला विद्ध करते आणि तो त्या मुलीच्या वडिलांना तिच्या विवाहासाठी स्वयंवर आयोजित करण्याचे सांगून त्यात भाग घेतो. त्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी जे राजपुत्र, सरदारपुत्र जमलेले असतात, त्या सर्वांचा पराभव सिद्धार्थ आपल्या उपजत कौशल्याने करतो. सगळेच आश्चर्यचकित होतात. आणि अत्यंत सुस्वरूप अशा यशोधरेशी त्याचा विवाह होतो.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२५/०२/२०२३
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Comments
Post a Comment