थोडं मनातलं - हरवलेल्या रानवाटा
थोडं मनातलं
हरवलेल्या रानवाटा
असं म्हणतात की आपल्याला सुखानं जगायचं असेल तर भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करू नये. वर्तमान आपल्या हातात असतो. वर्तमानात आनंदात जगावे. ना कालचे दुःख, ना उद्याची चिंता ! तसे तर हे खरेच आहे. पण कधी कधी भूतकाळातील आठवणींचा कप्पा अचानक उघडला जातो. जणू एखादी सुगंधी कुपी अचानक उघडली जावी आणि त्यातल्या सुगंधाचा दरवळ सगळीकडे पसरावा तसे होते. मग दोनचार दिवस मन त्याच धुंदीत विहार करते. ध्यानीमनीही नसताना जणू कालचक्र उलटे फिरते आणि शरीर जरी वर्तमानात असलं तरी मन मात्र त्या काळात विहार करून येतं.
परवाच्या दिवशी अचानक आमच्या गावी खूप दिवसांनी जाण्याचा योग आला. खरं तर खूप वर्षांनी. शहरातले पाहुणे माझ्याकडे आले आणि त्यांनी त्या गावाला जाण्याचा इच्छा व्यक्त केली. आता रस्ता चांगला झाल्याने अर्ध्या तासातच तिथे पोहोचता येतं. मग काय सकाळी सकाळीच पोहोचलो तिथे. तिथे जाताना एक अनामिक हुरहूर मनात होती. कसं असेल हे माझं गाव आता ? ओळखेल का ते मला ? या गावात जो विश्वास नावाचा छोटा मुलगा काही वर्षे वावरला, त्याच विश्वासला आता हे गाव स्वीकारेल ? बरोबर आहे, त्याने नाही ओळखले तर त्याला कसा दोष देता येईल ? मी तर आता अंतर्बाह्य बदललो आहे. बालपणीचा निरागस चेहरा, काळे कुरळे केस, बालपणीचा अवखळपणा, हुंदडणे सगळेच काळाच्या उदरात गडप झाले आहे. ती शेतं, ती झाडं, शेतातली ती विहीर की जिच्या थंडगार पाण्याने माझी अनेकदा तहान भागवली होती, ती सगळी मला ओळखतील ? मला म्हणतील का, ' ये, खूप दिवसांनी आलास. विसरला होतास का रे आम्हाला ? '
खरं तर मी त्यांना विसरलेलो नसतोच. विसरणे शक्यही नसते. मनाच्या एका कोपऱ्यात ती सगळी मंडळी सुखाने राज्य करीत असतात. ' काळरूपी दिवसांचे पक्षी भुर्रकन उडून गेलेले असतात. आठवणींची फुले सुकली असली तरी त्यातील मंद मंद सुगंध कधी तरी वेड लावतो. अशा वेळी मो. रफीच्या एका सुरेख गाण्याच्या ओळी आठवतात.' याद न जाये, बिते दिनोंकी...' पण काळाच्या ओघात ती शेती विकली गेली असल्यामुळे त्या गावाला जायचे काही कारण उरत नाही. म्हणून खूप वर्षे त्या गावाला गेलो नाही एवढेच. पण शेती विकली तरी आठवणी थोड्याच विकल्या जातात ! त्या तर अनमोल असतात. खरं तर अशा बाबतीत परमेश्वराचे, मनाचे किंवा नियतीचे आभार मानावे तेवढे कमीच ! कारण सगळ्याच गोष्टी विकाऊ असलेल्या या जगात आठवणी, सुखदुःखे, प्रेम, भावभावना यासारख्या गोष्टी विकता किंवा खरेदी करता येत नाहीत. जर त्यांची खरेदी विक्री होतच असेल, तर त्या खऱ्या तरी कशा म्हणायच्या ? पण एक गोष्ट मात्र किती छान आहे ! या आठवणी, ही सुखदुःखे वाटून घेता येतात. त्यातून आनंद देता अन घेता येतो.
काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी किती बदलतात ! माझे शेत बघायला म्हणून गेलो. नदीकाठी असणारे एक सुपीक शेत होते. त्या शेतात कधी केळी, कपाशी, मिरची तर कधी ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा अशी पिके घेतली जायची. पण आता ती काहीच नव्हती. ज्याने कुणी ती शेती घेतली होती, त्याने मोसंबीचा बाग लावला होता. मला आठवते या शेताच्या कोपऱ्यावर एक जुने कवठाचे झाड होते. उंचच उंच असे. कधी कधी पहाटे शेतावर गेलो की ते कवठाचे झाड आपली पिकलेली कवठे मला बक्षीस म्हणून द्यायचे. कोण आनंद व्हायचा मला ! पण आता गेलो तर ते कवठाचे झाड कुठेच दिसले नाही. शेताच्या एका बांधावर तिथल्या माणसाने एक झोपडीवजा घर बांधले होते. त्याला त्या कवठाच्या झाडाबद्द्दल विचारले. तो म्हणाला, ' मी हे शेत घेतले तेव्हापासून मला कुठेही तुम्ही म्हणता तसे कवठाचे झाड दिसले नाही. आम्ही इथे पस्तीस वर्षांपासून राहतो आहोत. ' मी मनात चरकलो. ते कवठाचे झाड काळाच्या ओघात नष्ट झाले असेल का की ते कोणी तोडले असेल ? काहीच सांगता येत नाही. माणसांची जुनी पिढी जशी नष्ट होते, तशीच झाडांची जुनी पिढीही नष्ट होत असावी ? '
आजूबाजूला आणखीही कुणाकुणाची शेतं होती. कुठे हिरवागार मका डोलत होता, तर कुठं सूर्यफुलं दिमाखानं जागी होऊन सूर्याकडे एकटक बघत होती. एखाद्या आम्रवृक्षाचा मोहर वातावरण मंद सुगंधित करत होता. काही झाडांवर नुकत्याच आलेल्या छोट्या छोट्या कैऱ्या कुतूहलानं जगाचं निरीक्षण करताना वाऱ्यावर डोलत होत्या. त्या मोसंबीच्या बागेत शिरून एक चक्कर मारून आलो. कुठून तरी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध आला. पण बघतो तर मोगऱ्याची झाडं किंवा रोपं कुठेही दिसत नव्हती. मोसंबीच्या झाडांना शुभ्र धवल फुले आली होती. त्या फुलांचाच हा सुवास मला मोगऱ्याच्या सुगंधाची आठवण करून देत होता. निसर्गाचं वैभव अशा रीतीने बहरून, फुलून आलं होतं. आभाळमाया आणि धरित्रीची माया एकत्र आली की असा कुबेराचा खजिना तयार होतो. रंग, रूप, गंधाची लयलूट होते. तुमच्यासाठी तो खुला असतो. पाहिजे तेवढा लुटा, त्याचा आनंद घ्या. माझ्या बरोबरचे पाहुणे शेतीचा बदललेला भाव विचारण्यात मग्न होते, आणि मी निसर्गाचे बदललेले रूप न्याहाळण्यात.
त्या शेताच्या पुढे आमचे आणखी एक शेत होते. त्या शेताच्या प्रवेशद्वारी एक भले मोठे चिंचेचे झाड होते. त्या झाडाच्या ३०/४० फूट पुढे एक विहीर होती. या विहिरीला बारमाही पाणी असायचे. तिला तळाशी जिवंत झरे होते. उन्हाळ्यात पाणी जरा कमी व्हायचे. पण पावसाळ्यात ही विहीर पाण्याने गच्च भरून जायची. अगदी हाताने बादली बुडवून पाणी घेता येईल इतके पाणी तिला असायचे. पण मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे ना ती विहीर आढळली ना ते चिंचेचे झाड ! ती शेतीही दुसऱ्या कोणी तरी विकत घेतली होती. मी त्या माणसाला भेटलो. त्याला ओळख सांगितली. म्हटलं, ' एके काळी ही आमची शेती होती. इथे त्या कोपऱ्यावर एक चिंचेचे झाड होते. एक छानशी विहीर होती त्याच्याजवळ. ' पण त्या माणसालाही चिंचेचे झाड आठवेना. काळ सगळ्या खुणा कशा पुसून टाकतो ! त्या विहिरीच्या जागी मात्र एक प्रचंड मोठी विहीर बांधून काढलेली आढळली. तिच्यावर आता पाण्यासाठी इलेक्ट्रिकची मोटर बसवलेली होती. पूर्वी याच विहिरीवर आमची मोट चालायची. ढवळ्यापवळ्याची जोडी मोट ओढायची. पाणी खळाळत बांधातून पिकाकडे धावत जायचं. मोटेच्या चाकाचा ' कुई कुई ' असा आवाज यायचा. ' साधी माणसं ' या चित्रपटातल्या ' माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं ...' या गीताची आठवण यावी असं ते दृश्य असायचं. पण काळाच्या ओघात सगळंच बदललं !
मग गावात गेलो. दक्षिणेकडून गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला कोपऱ्यात आमची शाळा होती. एके काळी सुंदर कौलारू असणारी या शाळेचे रंगरूप आज बदललेलं दिसत होतं. आजूबाजूला दोन तीन छोट्या छोट्या खोल्या निर्माण झाल्या होत्या. याच शाळेने मला लहानपणी घडवले होते. तिथे बसून सुरुवातीचे धडे मी गिरवले होते. बालमित्रांना गोष्टी सांगितल्या होत्या. इथेच आम्ही कधी खेळलो होतो, भांडलो होतो. सगळ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. जिथे आमचं घर होतं ती जागा आता उघडीबोडकी पडलेली होती. एके काळी इथेच बालपण गेलं होतं. खूप साऱ्या आठवणी त्या जागेशी निगडित होत्या. पण आता त्या जागेची झालेली अशी अवस्था पाहवत नव्हती. मागेपुढे प्रशस्त आंगण, दोन दारे, लाकडी छत असलेले मातीचे ते प्रसन्न घर खऱ्या अर्थाने मातीला मिळाले होते. त्याची ही अवस्था बघवत नव्हती. गावाच्या बाहेरच्या वेशीजवळ एक मारुतीचे मंदिर होते. मंदिराभोवती एक उंच असा पार होता. मंदिराच्या बाहेर एक मोठे पिंपळाचे झाड होते. गावकऱ्यांनी मंदिर मात्र आता नवीन बांधले होते. उघडा पार जाऊन बंदिस्त आवार निर्माण झाले होते. मंदिराच्या बाहेर असणारा तो प्राचीन पिंपळवृक्षही आता नव्हता. गावकऱ्यांनी त्याच्या जागी पिंपळाचे एक नवीन कलम केलेले झाड लावले होते. ते झाड जणू मला सांगत होते. ' अरे बदल हा जगाचा स्थायीभाव आहे. या जगात नित्यनूतन अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदल ! तेव्हा असा निराश होऊ नकोस. जुने जाऊन त्या जागी नवीन येणारच. ' त्या पिंपळाची हिरवी, सोनेरी, पोपटी पाने वाऱ्यावर सळसळत होती. मला आश्वस्त करीत होती. कुठेतरी रेडिओवर किशोरकुमारचे गाणे ऐकू येत होते, ' ये जीवन हैं, इस जीवन का यही हैं यही हैं रंगरूप...! '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१९/०२/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

Comments
Post a Comment