थोडं मनातलं - मुखवटे

 थोडं मनातलं ...

मुखवटे 

 प्रख्यात इंग्रजी नाटककार शेक्सपियर म्हणाला होता की , जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सर्व या रंगभूमीवर वावरणारी पात्रे आहोत. खरेच आहे. आपण आपल्या वाट्याला आलेली भूमिका या रंगमंचावर वठवतो आणि भूमिका संपली की या जगातून एक्झिट घेतो. पण आपापल्या वाट्याला आलेली भूमिका करणे वेगळे आणि अभिनय किंवा नाटक करणे वेगळे. मंडळी मला काय म्हणायचे ते आपल्या लक्षात आले असेलच . सिनेमात किंवा नाटकात आपण करतो तो अभिनय आणि जीवनात जी भूमिका वाट्याला आली ती समरसून जगणे वेगळे. सिनेमा नाटकातील भूमिका करण्याचे प्रशिक्षण दिले घेतले जाते. जीवनातील भूमिका आपल्यालाच वठवावी लागते. 

    ही भूमिका जेवढी सहजतेने आपण करू तेवढे जीवन जगणे सुकर होईल. पण आपण मंडळी अभिनयात पटाईत असतो. अभिनय म्हणजे काय ? आपण जे नाही ते दाखवणे आणि जे दाखवतो तेच आहोत असा आभास निर्माण करणे. नाटक सिनेमात काम करणारा नट  एखाद्या भूमिकेत शिरून ती भूमिका जणू जगून दाखवतो . त्याने राम, कृष्णाची भूमिका केली की  काही काळ तो त्यातून बाहेर येत नाही आणि आपणही त्याला राम  किंवा कृष्ण समजून त्याच्या पायावर डोकं ठेवायला तयार होतो. पण हा सगळाच दिखावा आहे. आत एक आणि बाहेर दुसरेच . खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आणि ही  सगळी मोठी कसरत असते. ती सांभाळताना मोठा संघर्ष करावा लागतो. बाहेर आपण निरनिराळे मुखवटे घालून वावरतो. 

    सगळा घोळ या मुखवट्यांमुळे होतो . त्यात आपण सुखी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि प्रत्यक्षात जे होता आलं नाही त्याची खंत मनात असते. राज कपूरचा मेरा नाम जोकर चित्रपट आहे. त्यातील जोकर हसून सर्वांचं मनोरंजन करतो पण मनातून तो किती दुःखी असतो हे त्यात फार हृदयस्पर्शी रीतीने दाखवले आहे. मंडळी मंदिरात आपण दर्शनाला जातो तेव्हा आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवतो. तसेच काही काळ का होईना आपापले मुखवटे काढून ठेवता आले पाहिजेत. आपण जे सुख बाहेर शोधतो ते खरं  म्हणजे आतमध्येच आहे. बाहेर जे सुख आहे असे आपल्याला वाटते ते खरे म्हणजे तात्कालिक असते.  श्रीखंडाची पहिली वाटी संपवताना जो आनंद असतो तो चौथ्या पाचव्या वाटीत निश्चितपणे नसतो. खरं  म्हणजे सुख किंवा दुःख बाहेरून कुठूनही येत नाही . ते आपले आपणच निर्माण करतो. 

     म्हणून नियतीनं आपल्याला जी भूमिका दिली आहे ती समरसतेनं वठवू या. नको कोणाचं अनुकरण , नको कोणाचा हेवा दावा. मो.रफीच एक छान गाणं आहे - 

    मै जिंदगी का साथ निभाता चला गया 
    हर फिक्र को धुये मी उडाता चला गया . 

Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..