दिल हैं छोटासा...
थोडं मनातलं
दिल हैं छोटासा...
गेल्या आठवड्यात पुण्याला मुक्काम होता. घराच्या गॅलरीत उभं राहिलं की समोरचा अखंड वाहणारा हायवे नजरेत पडायचा. सकाळी चार वाजल्यापासून जे रहदारीला सुरुवात व्हायची ती रात्री अकरा बारा वाजेपर्यंत. बारानंतर वर्दळ थोडी कमी व्हायची. मग पहाटे चार वाजेपर्यंत तुरळक वाहतूक सुरु असायची. या कालावधीत रस्ता थोडा मोकळा श्वास घेत असावा. रात्रीची वाट पाहत असावा. नाहीतर दिवसभर अखंड घरघर लागलेली. अंगावरून गाड्यांची चाके फिरतच राहतात. हीच अवस्था थोड्याफार फरकाने सगळ्याच मोठया शहरांची आहे.
मला अशी शहरं म्हणजे एक मोठं जगड्व्याळ यंत्र वाटतात. रात्री उशिरा झोपतात आणि पहाटे लवकर जागी होतात. एखादे मोठे यंत्र फिरत असताना त्याच्याबरोबर त्या यंत्राचे इतरही लहानमोठे भाग फिरतच असतात. त्यांना काही पर्यायच नसतो. तशी ही शहरं धावत असतात. लहान मुलांचे जत्रेतील मेरी गो राउंड नावाचे मोठे व्हील असते ना अगदी तसे. त्यात आपण बसलो की त्याच्या गतीने आपणही फिरायला लागतो. कधी कधी त्याचा वेग नकोसा होतो. असं वाटतं की उगीच बसलो यात. पण थांबू म्हटलं किंवा त्यातून बाहेर पडू म्हटलं तर ते शक्य नसतं. ते थांबल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. त्यातून आपण पडू नये म्हणून जागेवरच आपण साखळदंडांनी जखडले गेलो असतो ते वेगळंच.
मुलांच्या शाळा सुरु झाल्या. आईला सकाळी उठून त्यांची तयारी करून द्यायची, टिफिन भरून द्यायचा असतो. शिवाय तिचीही कामं असतातच की. त्या धावपळीत रिक्षावाले काका किंवा बसवाले काका हॉर्न देतात. ती छोटी मुले धावपळ करत आईबरोबर बाहेर येतात. बसमध्ये किंवा रिक्षात बसून मार्गस्थ होतात. आई मुलगा दोघेही एकमेकांना हसत हसत बाय करतात. आईच्या चेहऱ्यावर हास्य दिसलं तरी आता ती दिवसभर त्या चिमुरड्याला भेटू शकणार नसते. तिच्या हास्यासोबतच तिच्या हृदयात दडलेली मुलाची काळजी चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. आई सुटकेचा एक निःश्वास टाकून घराकडे परतते. घरातल्या कामाचा एक भाग होऊन जाते. वडिलांचंही तसंच असतं. ऑफिसला जाणं असो की घरून काम करणं तुम्हाला त्या यंत्राचा एक भाग व्हावंच लागतं. दिवसभर सगळं रुटीन असंच सुरु राहतं. माणसं काय, मुलं काय सगळेच जणू दिनक्रमाच्या धावणाऱ्या यंत्राचा एक भाग झालेला असतो. अशी धावपळ करत आठवडा निघून जातो. धावणाऱ्यांना दमवतो. शनिवारची आस लावून बसलेले डोळे सुखावतात. मग नेहमीप्रमाणेच शनिवार, रविवार पाहुण्यासारखे येतात. त्यांनी आणखी राहावं असं वाटत असतानाच भुर्रकन निघून जातात. काही तास थांबलेलं जगड्व्याळ यंत्र पुन्हा सुरु होतं. सगळ्यांना आपल्या कवेत घेऊन पुन्हा फिरायला लागतं.
प्रशांत दामलेंच्या ' सारखं काहीतरी होतंय ' असं वाटत राहतं. रोजच्या धावपळीला कंटाळलेलं मन आणि मरगळलेलं शरीर विसाव्याचे, विरंगुळ्याचे क्षण शोधू लागतं. अशा वेळी सकाळच्या प्रहरी थोडा वेळ काढून घराबाहेर पडावं, चिंतेचं ओझं घरातच ठेवून बाहेर पडावं . घरातून बाहेर पडलं की चहाची एखादी टपरी दिसते. एखादा चहावाला त्याचा शुभारंभाचा चहा मस्त घोटून घोटून बनवताना दिसतो. झाडाच्या सावलीत चार पाच खुर्च्या अस्ताव्यस्त मांडून ठेवलेल्या असतात. मन मानेल त्या खुर्चीवर निवांत बसावं. चहाचे घोट घेताना आजूबाजूचा निसर्ग न्याहाळावा. काही कष्टकरी, कामकरी माणसं यावेळी आजूबाजूला दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात ताण, चिंता नसते. त्यांच्याकडे बघावं. प्रसन्नता, आनंद एखाद्या वाऱ्यासारखा झुळूझुळू वाहत असतो. आपण त्याला परवानगी दिली की तो आपल्याकडेही येतो.
आता उठून थोडासा फेरफटकाही मारावा. शहर आता जागे झालेले असते. धावपळीचे रहाटगाडगे सुरु झालेले असते. यंत्राची घरघर आपल्या आजूबाजूला सुरु असते. पण आपण आता या क्षणी तरी या यंत्राचा भाग होणे नाकारले असते. मग छानपैकी मुक्त वातावरणाचा आनंद घ्यायचा. एखादं छानसं गाणं गुणगुणायचं. तुम्हाला गाता येवो न येवो, तुमचा आवाज चांगला असो वा नसो तुम्ही गायचं. प्रत्येक माणूस गुणगुणन्यातला आनंद कधी कधी ना तरी घेतच असेल. जो कधी गुणगुणलाच नाही, त्याला काय म्हणावे ? तेव्हा गात चला.
वाचनालयातून एखादं छानसं पुस्तक आणा. छानपैकी वाचत बसा. त्याच्यासारखा निर्भेळ आनंद नाही. दोन प्रकारचे इडियट बॉक्स आहेत. एक छोटा आणि दुसरा मोठा. मी मोबाईल आणि टीव्हीबद्दल बोलतो आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. तर त्यांना द्या जरा सुटी. काहीच करावंसं वाटत नसेल तर मस्तपैकी लोळत पडा. सगळी कामं एखादा दिवस, निदान काही तास तरी बाजूला ठेवा. असा एखादा ' उनाड दिवस ' हवाच. नाही का ? म्हणून तर लेखाचं नाव दिलंय ' दिल हैं छोटासा, छोटीसी आशा. ' हे परमेश्वरा, मला पैसा नको, गाड्या बंगले नको. पोटापुरता पसा पाहिजे या गाण्यातल्या ओळी आठवताहेत. कवी म्हणतो
महाल माङया नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने, जतन कराया काया.
पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
Comments
Post a Comment