भिंत

थोडं मनातलं 

भिंत 

आमच्या घरासमोर असणारा एक छान, प्रशस्त बंगला. आधीच्या मालकाने तो विकला आणि दुसऱ्या एका श्रीमंत व्यक्तीने तो विकत घेतला. तसा बंगला छान असला तरी तो बांधून अनेक वर्षे झाली होती. साहजिकच नवीन मालकाला आपण तेथे राहायला जाण्यापूर्वी त्याची दुरुस्ती, रंगरंगोटी नव्याने करावी असे वाटले. त्याप्रमाणे त्यांनी कामही सुरु केले. त्यांच्या शेजारी असेच एक छोटेसे दुमजली घर होते. त्या घरात खाली तळमजल्यावर एक आणि वरच्या मजल्यावर दुसरे अशी दोन भाडेकरू बिऱ्हाडे राहत होती.  घराचे काम सुरु असल्याने त्या घरमालकाच्या दिवसातून अनेक वेळा चकरा होत असत. कधी कधी शेजारील भाडेकरुंकडे काही लागले तर तो जात असे. समोर किंवा आजूबाजूला राहणाऱ्यांकडेही तो जाई, 

त्याच्या बोलण्यातून एक नवा शेजारी आपल्या शेजारी येणार याची बाजूला राहणाऱ्या लोकांना जाणीव झाली. तो देखील शेजारी जाऊन तुम्ही सगळे किती चांगले आहात असे म्हणत असे. शेजारी देखील त्याला चहापाण्याचा आग्रह करीत. त्या नवीन घरमालकाच्या घराभोवती आणि शेजारच्या घराभोवती एक सामायिक अशा प्रकारची कुंपणाची भिंत होती. तिची उंची साधारण चार पाच फूट असावी. त्या भिंतीजवळ उभे राहून त्या घरमालकाला आणि त्याच्या शेजाऱ्याला सहज संवाद साधता येई, काही देवाणघेवाण करता येई. पण नवीन घरमालकाने घरदुरुस्तीचे काम सुरु केल्यानंतर पहिल्यांदा त्याने त्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम सुरु केले. आता ती भिंत साडेसहा फूट उंच झाली होती. शिवाय त्यावर लोखंडी खांब बसवून त्याला काटेरी तार लावण्यात आली. 

मला या विरोधाभासाची मोठी गंमत वाटली. एका बाजूला शेजाऱ्यांकडे जायचे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करायच्या आणि आपण आता शेजारी होणार आहोत असे सांगायचे. यापुढे वर्षानुवर्षे आपण शेजारी, आपले संबंध दृढ होतील. आणि दुसऱ्या बाजूला दोघांमध्ये अशी भिंत उभी करायची की एकमेकांना संपर्क साधता येणार नाही. मग जणू तू कोण आणि मी कोण ? मला तुमची गरज नाही. तुम्ही तुमच्या भागात राहा, आम्ही आमच्या भागात. तो नवीन घरमालक असे काही म्हणाला नाही हे जरी खरे असले तरी त्याने उभ्या केलेल्या भिंतीतून हाच संदेश जणू जात होता. अशा संदेशांना शब्दांची गरज नसते. हा प्रकार म्हणजे ' शब्देविण संवादु ( की विसंवादु  ? )

अशा खूप कोतेपणाच्या भिंती आपण आपल्या आजूबाजूला उभारतो. मोठमोठया गृहसंकुलातून खाली वाहने उभे करून ठेवण्यासाठी जी जागा असते, त्यावर त्या त्या घरमालकाचा हक्क असतो हे खरे. पण स्वामित्वाचा हक्क गाजवण्याची केवढी हाव ! त्या जागेत कोणी प्रवेशसुद्धा करू नये म्हणून त्या जागेच्या इतर बाजू दोराने, साखळीने किंवा छोट्या भिंतीने बंद केलेल्या असतात. खाली असणाऱ्या प्रसाधनगृहांना देखील कडीकुलुपात बंदिस्त केलेले असते. कधी कोणाला ' घाई ' असली तरी त्याला त्याचा वापर करता येत नाही. याही एक प्रकारच्या भिंतीच नाही का ? 

या सगळ्या तर दृश्य भिंती. पण मनामनातल्या अदृश्य भिंती फार मोठया असतात. त्या दिसत नाहीत पण जगण्यात फार मोठे अडथळे निर्माण करतात. या अदृश्य भिंती असतात जाती, धर्म, भाषा, वर्ण, पंथ, प्रदेश इ. च्या. दृश्य भिंती कधी ना कधी पडतात. अदृश्य भिंती मात्र द्वेष, मत्सर, असूयाच्या सिमेंटने दिवसेंदिवस मजबूत होत जातात. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीत असलेली भिंत एक दिवस पडली. नव्हे लोकांनीच ती पाडून टाकली. साम्यवादी पूर्व जर्मनी आणि उदारमतवादी पश्चिम जर्मनी यांना विभक्त करणारी ही भिंत पडली आणि एका नव्या युगाचा सूर्योदय झाला असे लोकांना वाटले. पण मनामनातल्या भिंती थोड्याच पडतात. त्या टिकून राहाव्यात यातच काहींना रस असतो कारण त्यामुळेच त्यांचे अंत:स्थ हेतू साध्य होतात. 

भिंतीचा उदय कसा झाला असावा असा विचार केला तर डोळ्यापुढे येतो तो आदिमानव. तो घनदाट अशा जंगलात हिंस्त्र प्राण्यांच्या सान्निध्यात राहत होता. ऊन, वारा, पाऊस, कडाडणाऱ्या विजा यापासून आश्रय घेण्यासाठी त्याने आधी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या भिंतींचा म्हणजे डोंगरातील गुहांचा आश्रय घेतला असावा. त्यातूनच संरक्षणासाठी भिंतींची, डोक्यावर छताची कल्पना त्याच्या डोक्यात आली असावी. जसजसा मानव प्रगत होत गेला, तसतशी त्याच्या बांधकामाच्या कलेत प्रगती होत गेली. मग हळूहळू तो दगडांच्या भिंती उभारायला शिकला. आधी झाडांच्या फांद्यांचे, गवताचे छप्पर तो बांधायला शिकला. आधी झोपडी, मग पक्के घर अशी त्याची प्रगती झाली. विटेचा शोध बऱ्याच उशिराचा असावा. त्यानंतर तो विटांच्या साहाय्याने घरे बांधायला लागला. मग भिंत हे मानवाच्या निवाऱ्याचे, संरक्षणाचे प्रतीक झाले. आता जंगलात उघड्यावर राहणे सोडून माणूस सुरक्षित अशा भिंतींच्या घरात राहायला लागला. 

जशी भिंत असलेली घरे मानवाने बांधली, तसेच तो आणखी जसजसा प्रगत होत गेला तसतशी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्याने भिंती असलेल्या शाळांची सुद्धा निर्मिती केली. निसर्गात शिकणारी मुले आता शाळेत शिकू लागली. पण या भिंती असलेल्या शाळेत आयुष्याची सुरुवातीची बरीच वर्षे घालवल्यानंतर सुद्धा तो पूर्ण ज्ञानी कधी होतच नाही. या शाळेच्या बाहेर उघड्या जगात तो बरेच काही शिकतो. अनुभवाची शाळा सगळ्यात मोठी असते. त्यात माणूस जे शिकतो, ते आयुष्यभर लक्षात राहते. म्हणून एखादी यशस्वी व्यक्ती लौकिक अर्थाने फारशी शाळेत गेली नसेल तर तो ' बिनभिंतीच्या शाळेत ' शिकला असे आपण म्हणतो. ही बिनभिंतीची शाळा खूप महत्वाची. 

बहिणाबाई या खान्देशातील महान कवयित्री. कधीही शाळेत गेल्या नाहीत. पण बिनभिंतीच्या शाळेत त्यांनी जे ज्ञान ग्रहण केले त्यामुळे त्यांनी चार भिंतीत शिक्षण घेतलेल्यानाही मागे टाकले. प्राथमिक शाळेपासून तो अगदी पी एच डी प्राप्त करणारे विद्यार्थीही त्यांच्या कवितांचा अभ्यास करू लागले. 

अरे संसार संसार 

आधी हाताला चटका तेव्हा मिळते भाकर. 

हे बहिणाबाईंना आयुष्याच्या शाळेने शिकवले. काही मिळवायचे असेल, घडवायचे असेल मग ती भाकरीसारखी साधी गोष्ट का असेना, चटका सोसावा लागतो. लता मंगेशकर लौकिक अर्थाने काय दोन चार दिवस शाळेत गेल्या असतील तेवढ्याच. बाकी सगळे त्या आयुष्य, अनुभव  नावाच्या बिनभिंतीच्या शाळेत शिकल्या. मात्र नवनवीन गोष्टी त्या शिकतच राहिल्या. अगदी शेवटपर्यंत. त्यातूनच त्या समृद्ध झाल्या. आज बहिणाबाई म्हणा की लता मंगेशकर म्हणा, ज्यांच्याजवळून शिकावं अशी विद्यापीठं झाल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की ज्या चार भिंतींच्या शाळेत आपण शिकतो, ती उपयोगाची नाही. ती उपयोगाची आहेच, पण बाहेरची बिनभिंतीची शाळा ही त्यापेक्षा मोठी आहे हे सांगण्याचे तात्पर्य ! 

पूर्वी गावांचे, शहरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याभोवती मोठमोठ्या भिंती बांधल्या जायच्या. चीनची अजस्त्र भिंत ही त्यापैकीच एक असावी. किल्ल्यांभोवतीची तटबंदी ही त्याचेच प्रतीक. भारताच्या उत्तर दिशेला उभा असणारा हिमालय म्हणजे भारताला शत्रूपासून, थंड वाऱ्यांपासून संरक्षण देणारी नैसर्गिक अभेद्य अशी भिंतच ! अशा भिंती  संरक्षणाचे, सुरक्षिततेचे प्रतीक असतात. त्या विभाजन करीत नाहीत. माणसाच्या मनातही भेदाभेद करणाऱ्या अदृश्य भिंतींपेक्षा अशा नैसर्गिक संरक्षण करणाऱ्या भिंती उभ्या राहिल्या तर...! फूट पडणाऱ्या भिंतींची जागा अशा भिंतींनी घेतली तर...! सोनेपे सुहागा ! 

संत ज्ञानेश्वरांच्या काळातील चांगदेव हे चौदाशे वर्षांचे योगी. त्यांनी हे प्रदीर्घ आयुष्य आपल्या तपश्चर्येच्या बळावर प्राप्त केले होते. निसर्गातील वाघ, सिंह आदी हिंस्त्र प्राण्यांवर त्यांची हुकमत चालत होती. पण त्यांना जेव्हा ज्ञानेश्वरांविषयी कळले, तेव्हा कोण हा तरुण पोरगा, जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायचे ठरवले. पण मायना काय लिहावा, त्यांना लहान म्हणून आशीर्वाद द्यावा तर ते ज्ञानाने श्रेष्ठ, मोठे म्हणावे तर वयाने लहान. म्हणून कोरेच पत्र पाठवले.  लहानगी मुक्ताई म्हणाली, ' चौदाशे वर्षे तपश्चर्या करून चांगदेव कोरेच राहिले. ' अखेरीस चांगदेव त्यांच्या भेटीसाठी निघाले. तेही वाघावर स्वार होऊन, हाती सर्पाचा चाबूक घेऊन. कारण त्यांना ज्ञानेश्वर माउलींना दाखवायचे होते की बघा मीही काही कमी श्रेष्ठ असा योगी नाही. 

एवढा मोठा योगी आपल्या भेटीसाठी येणार हे जेव्हा ज्ञानेश्वरांना कळले तेव्हा ते आपल्या भावंडांसह एका भिंतीवर बसले होते. ते चांगदेवांच्या स्वागताला निघाले. ते ज्या भिंतीवर बसले होते ती निर्जीव भिंत माउलींच्या आज्ञेने चालू लागली. वाघ, सिंहासारख्या सजीव प्राण्यांवर हुकूमत चालवणारे चांगदेव माउलींनी चालवलेली ती निर्जीव भिंत पाहून खजील झाले. त्यांचा सारा अहंकार एका क्षणात उतरला. ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या ज्ञानाच्या बळावर ती निर्जीव भिंत सजीव केली होती. नेहमी एकाच जागी उभी असणारी, कधीही न हलणारी भिंत आता गतिमानतेचे प्रतीक बनली होती. अशा प्रकारे अज्ञानाच्या भिंतींना आपल्या ज्ञानाने दूर सारता येते, त्या सजीव, उपयोगी आणि ज्ञानी होऊ शकतात हेच माउलींनी आपल्याला दाखवून दिले नाही का ? 

या मनामनातल्या भिंती नष्ट होण्यासाठी माउलींच्याच शब्दात मागणे मागू या. 

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो 

जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२९/०६/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..