खाणाऱ्याने खात जावे...

थोडं मनातलं 

खाणाऱ्याने खात जावे... 

परवाच्या दिवशी एका लग्नासाठी मिरजेला जावे लागले. घरचेच लग्न असल्याने लग्नस्थळी सीमांतपूजनापासून हजर होतो.  गेल्या गेल्या स्वागताला उपीट आणि चहाचा मेनू हजर होता.  आता तुम्ही म्हणाल की उपीट  आणि चहा यात काय विशेष ? पण जेव्हा गरमागरम उपीट खाऊन पाहिले तेव्हा मजा आली. मग काही खवैय्यांनी त्याचा पुन्हा आस्वाद घेतला. यातच बनवणाऱ्याचे यश सामावले आहे ! तुम्ही काय देता यापेक्षा कसं देता याला जास्त महत्व आहे. शिवाय स्वच्छ जागा आणि परिसर, स्वच्छ डिशेस, चमचे, वाट्या इ गोष्टी पण त्यात भर घालतात. उपीट किंवा उपमा साध्या रव्यापासून बनवला जाणारा पदार्थ. पण त्याला ताजा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे इ ची सुरेख जोड दिली की क्या कहने ! मग देणारा देतो आणि खाणारा खातो. ' आज काय स्पेशल ' या टीव्ही शोमध्ये अस्सल आणि रसिक खवैय्या असलेला प्रशांत दामले म्हणतो, ' जगण्यासाठी जेवढा श्वास महत्वाचा, तेवढेच जगण्यासाठी अन्नाचा चविष्ट घासही महत्वाचा आहे. ' उपीट नंतर झकास चहा झाला. मैफलीत एखाद्या गाण्याचा छान सूर लागावा, मग श्रोत्यांनी त्यात रंगून जावे आणि गाणे केव्हा संपले ते कळू नये असेच जणू जेवणाचा मेनू उत्तम असला की होते. अशी संध्याकाळची छान सुरुवात झाली. जणू ' ये शाम मस्तानी...' त्यात छान पावसाळी हवा ! 

दुसऱ्या दिवशीची सकाळ वडा सांबाराच्या चविष्ट आणि गरमागरम नाश्त्याने झाली. हाही मेनू झकास जमला होता. खवैय्यांनी यावर मस्त ताव मारला. सांबार तर इतके चविष्ट झाले होते की काहींनी नंतर नुसते सांबार घेऊन त्याचा आस्वाद घेतला. दुपारच्या जेवणाचा मेनूही  असाच मस्त. पोळ्या, पुऱ्या, साधा भात, मसाले भात, भोपळ्याचे भरीत, बुंदीचे रायते, गरम भजी, पनीर वाटाणा भाजी, बटाटा भाजी आणि जोडीला चविष्ट फ्रुटखंड ! मग काय मैफलच रंगली. हे सगळे बनवणाऱ्या बल्लवाचार्यांचे कौतुक केल्यावाचून राहवले नाही. आदल्या दिवशी संध्याकाळच्या उपम्यापासून जो काही सूर लागला होता, तो जेवणाच्या भैरवीने संपला. सगळेच तृप्त होऊन बाहेर पडले. 

अनिल अवचट यांचं ' छंदाविषयी ' हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं होतं. अनिल अवचट म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या प्रांतात मुशाफिरी करणारा अवलिया. त्याची साक्ष हे त्यांचं पुस्तक देतं . छंद माणसाला काय देतात त्याचं उत्तर या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. चित्रकला, शिल्पकला, पाककला, ओरिगामी , बासरी, वाचन आणखी कितीतरी छंदांविषयी हे पुस्तक आपल्याशी बोलतं. गरजेपुरता थोडाफार स्वयंपाक येत असलेल्या अनिल अवचटांनी निरनिराळ्या व्यक्तींकडून निरनिराळे पदार्थ कसे बनवायचे हे शिकून घेतले. नुसतेच शिकले नाहीत तर ते बनवून दुसऱ्यांना आनंदाने खाऊ घातले. अगदी दही लावण्यापासून तर विविध प्रकारची लोणची, चविष्ट चिवडा बनवणे आदी कौशल्ये त्यांनी हस्तगत केली. त्याच्यात त्यांची अगदी खासियत निर्माण झाली. मग अगदी त्यांच्या मुलीसुद्धा त्यांच्या हातच्या पदार्थांची मागणी करू लागल्या. अगदी मित्रमंडळी सुद्धा त्यांच्या हातचे पदार्थ खाण्यासाठी हक्काने त्यांच्याकडे येऊ लागले. 

आपल्याकडे काही काही क्षेत्रे आपण स्त्रियांची ठरवून टाकली आहेत. त्यातील स्वयंपाक हे एक. लेबल लावण्यात आपण फार पटाईत. एकदा हे काम स्त्रियांचे असे ठरवले की आपण मोकळे. पण अनिल अवचटांसारखी माणसे या कल्पना मोडीत काढतात. तुम्हाला शिकायची इच्छा असली की काहीही शिकता येतं. अवचटांनी तर बाजारातून भाजी आणताना भाजी कोणती आणि कशी घ्यावी, आणल्यावर ती कशी निवडावी, चिरावी या सगळ्या गोष्टी आनंदाने आणि मनापासून शिकून घेतल्या. स्वयंपाक करताना ज्या वस्तू लागणार आहेत, त्या जर उत्तम दर्जाच्या असल्या तर तर स्वयंपाकही चांगला बनतो. खरं तर स्वयंपाक करणं ही गोष्ट जेवढी कला आहे तेवढीच ती शास्त्र पण आहे ! ज्यांनी ज्यांनी ती शिकून घेतली त्यांचा फायदाच झाला. कोरोना काळात काहींच्या नोकऱ्या गेल्या. अशा कठीण परिस्थितीत ज्यांना उत्तम पाककला येत होती, त्यांना त्या कलेने हात दिला. त्यांना एक उत्पन्नाचे साधन मिळाले. 

पाककला जी गृहिणीपुरती मर्यादित होती, अशा पाककलेचे टीव्ही शोज कमालीचे लोकप्रिय झालेले आढळतात. मग ते प्रशांत दामले, शेफ विष्णू मनोहर, संजीव कपूर आदींचे टीव्ही शोज केवळ स्त्रीवर्गच नव्हे तर पुरुषही आवडीने बघायला लागले. स्वयंपाक करणं म्हणजे पुरुषांची गुलामगिरी करणं या कल्पनेतून बाहेर पडून काही स्त्रिया देखील या कलेकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत. आज यु ट्यूबवर हव्या त्या पदार्च्यांच्या रेसिपी उपलब्ध असलेले हजारो लोकप्रिय व्हिडीओ आहेत. एखाद्याच्या हृदयात किंवा मनात प्रवेश करण्याचा मार्ग जिभेपासून पोटापर्यंत जातो. दोन्ही अर्थाने. तुमचं बोलणं चांगलं असेल तरच तुम्ही इतरांच्या मनात घर करू शकता. त्याच्यापुढची गोष्ट म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तींना चांगले पदार्थ करून खायला घालणे. म्हणजेच जिभेपासून पोटापर्यंत ज्याला पोहोचता येतं त्याला दुसऱ्याच्या मनातही घर करता येतं. सिंगापूर, कोरिया इ देशात पाकशास्त्र शिकवणाऱ्या जगातील काही उत्कृष्ट शाळा आहेत. अशा शाळेतून पाककला शिकून बाहेर पडणाऱ्या मंडळींना जगभर मागणी आहे. शिवाय पैसा आणि प्रतिष्ठा आहेच. आपल्याकडील पाककलेची आवड असणाऱ्यांनी या पर्यायाचा जरूर विचार करावा. मग त्यांच्यापुढे अनेक संधी उपलब्ध होतील. 

लता मंगेशकर आपल्या सगळ्यांना श्रेष्ठ गायिका म्हणून परिचित आहेत. पण त्या उत्तम स्वयंपाक करून आपल्या जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तींना खाऊ घालत होत्या ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहित असते. त्यांच्यासारख्या अनेक मोठमोठया व्यक्ती ज्या इतर क्षेत्रात नावाजल्या आहेत, त्या अशा पद्धतीने उत्तम पदार्थ करून लोकांना खाऊ घालण्यात पण प्रवीण असतात याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. 

जेवताना आपण जो श्लोक म्हणतो त्यातील, ' उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म...' ही ओळ किती अर्थपूर्ण आहे ! स्वयंपाक बनवणे म्हणजे केवळ समोरच्या व्यक्तीचे पोट भरणे नाही. त्यात खूप गोष्टी येतात. त्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीचे आरोग्य जोपासता. स्वच्छता आणि चवीचे धडे नकळत देता. वेगवेगळे पदार्थ खायची आवड निर्माण करतात. शिवाय ' महाग म्हणजेच चविष्ट, पौष्टिक आणि चांगले ' यासारख्या कल्पना मोडीत काढू शकतात. आज आपण पाहतो की मोठमोठया शहरातील हॉटेल्समध्ये सुटीच्या दिवशी जेवणासाठी रांगा लागलेल्या असतात. आपण पाककलेची आवड जोपासली तर अशा हॉटेलात नंबर लावून तिष्ठत बसण्यापेक्षा त्यापेक्षाही चांगल्या प्रतीचे पदार्थ घरी बनवून आपल्या जिवलगांना खाऊ घालता येतील. त्यांची एखादी आवडीची डिश बनवावी. ती मस्त सजवावी. आपल्यासमोर जेव्हा सुग्रास असे जेवणाचे ताट येते, तेव्हा त्यातील पदार्थांचे रंग, रूप आणि वास पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटते. उत्तम चव हा त्याच्या पुढचा भाग. अशा वेळी मग भूक नसली तरी माणूस खातो आणि ज्याला भूक आहे तो दोन घास जास्तच जेवतो.  तेव्हा विंदा करंदीकर यांच्या कवितेचा आधार घेऊन असे म्हणू या की 

बनवणाऱ्याने बनवत जावे 

खाणाऱ्याने खात जावे 

खाता खाता एक दिवस 

बनवणाऱ्याचे हात घ्यावे. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१६/०७/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 










Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..