ये रे घना...

 थोडं मनातलं 

ये रे घना...

जुलै महिन्यातील एक संध्याकाळ. पाच वाजले असतील. गॅलरीतून बाहेर डोकावलं आणि बाहेरचा निसर्गाचा कॅनव्हास पाहून मन एकदम प्रसन्न झालं. पावसाळी वातावरण असलं तरी आज स्वच्छ ऊन पडलं होतं. पण उन्हं आता कलली होती. पण भवतालची सगळी सृष्टी पावसात न्हाऊन निघाल्याने सगळं कसं स्वच्छ वाटत होतं. माझ्या उजव्या बाजूला लांबवर डोंगरांची एक रांग दिसत होती. माझ्या समोर ऊन आणि डोंगराकडच्या भागावर पाऊस भरलेला दिसत होता. विस्तीर्ण आकाशातले काळे ढग डोंगराला टेकले होते. जणू काही क्षणांची विश्रांती ते घेत होते. पण कोणत्याही क्षणी त्यांना पाझर फुटेल आणि बरसणऱ्या जलधारांचा एक पडदा तयार होईल. डोंगरावर बरसणारे मेघ हळूहळू माझ्याकडेही येतील आणि सृष्टीला पर्जन्याभिषेक सुरु होईल. 

इकडे आकाशाच्या विस्तीर्ण पटावर खूप हालचाली सुरु असतात. मध्येच काळे ढग आकाश व्यापून टाकतात तर सूर्यदेव मी अजून आहे अशी जाणीव करून देतात. आकाशाच्या मध्यभागी एक मोठ्ठा काळा ढग जणू सांडलेल्या शाईचा ठिपका कागदभर पसरावा तसा पसरलेला असतो. कुठे कुठे रुपेरी ढगही असतात. ऊन, पाऊस, रुपेरी ढग, काळे ढग आकाशात एक मनोहर चित्र करतात. पावसाळ्यात निसर्गाचे रंग असे क्षणोक्षणी बदलत असतात. मनात येतं कोण बरं रंगवत असेल हा आकाशाचा पट ! एखाद्या शोभादर्शकातल्या प्रतिमा जशा ते कसेही फिरवले तरी सुंदरच भासतात तसे हे आकाशाचे रंग ! कसाही बदल झाला तरी त्यांची शोभा अवर्णनीयच असते. 

अशा वेळी मनात मग पावसाची गाणी रुंजी घालू लागतात. कवी मग तो मराठीतला असो की हिंदीतला, मानवी मनातील तरल भावभावना अचूक पकडतो निसर्ग आणि भावभावना, मानवी जीवन यांचा सुंदर मेळ घालतो. अशा वेळी ' अरे संसार संसार ' चित्रपटातील गाणं आठवतं. त्यात पावसाचं वातावरण किती सुंदर उभं केलंय कवीनं ! कवी म्हणतो 

चाले ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ 

लोणी पायाला भासती मऊ भिजली ढेकळं 

काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो 

हिरवं सपान पाहतो, काटा पायात रुततो. 

पावसाळ्यात ऊनपावसाचा जणू पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. शेतात पडलेल्या पावसानं मातीची ढेकळं भिजून मऊ झाली आहेत. शेतकऱ्याच्या पायाला ही भिजलेली माती म्हणजे जणू लोण्याचा स्पर्श वाटतो. पडलेल्या पावसानं आता या शेतकऱ्याच्या डोळ्यात हिरवं स्वप्न पेरलं आहे. त्याचं ते स्वप्न मातीत उगवून साकार होण्याचे दिवस जवळ आले आहेत. हिरवं स्वप्न पाहताना काटेही पायात रुतणारच ! त्याचीही तयारी ठेवावीच लागणार. मानवी जीवन म्हणजे ऊनपावसासारखा सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे. या गाण्याचे शब्द, संगीत मनात रुंजी घालू लागतं. 

एव्हाना डोंगरावर सुरु असलेला पाऊस आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला असतो. निसर्गराजा वरून बरसात करत असतो. धरती जणू आपल्या हातांची ओंजळ करून या मंगलधारा सामावून घेते. अशा वेळी सुमन कल्याणपूर यांनी गायिलेल्या गीताची ओळ मनात घर करते. त्या गीतात कवी म्हणतो 

रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात 

आकाशातून झरणाऱ्या श्रावणधारा धरतीवर तर पडताहेत पण कुठे ? कवी फार सुंदर कल्पना करतो. ही सगळी धरती जणू कलशस्वरूप होते आणि निसर्गाचं देणं आपल्या कलशात सामावून घेते. खरं तर पाऊस पडताना जागा पाहत नाही. तो कुठेही पडतो. जमिनीवर, समुद्रावर, नदीत सुद्धा. पण ही सगळी धरतीचीच रूपे आहेत. धरती जणू चहुबाजूनी आपल्या हातांची ओंजळ पसरते आणि ही आभाळमाया आपल्या ओंजळीत सामावून घेते. या हातांची ओंजळच या गीतात कलशाचे रूप घेते. हा प्रसंग कवीला विरहिणीची भावना व्यक्त करायला योग्य वाटते. आपला प्रियकर जवळ नसल्याने ती झुरते आहे. ती म्हणते. 

रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात 

प्रियाविण उदास वाटे रात 

बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम 

आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात 

रात्रीचा अंधार दाटला आहे. त्या अंधारात तिचे आतुरलेले डोळे प्रियाला शोधताहेत. ती पुढे म्हणते 

प्रासादी या जिवलग येता,कमल मिठीमध्ये भृंग भेटता 

बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात 

या ओळी वाचल्या की मला मुकेश यांनी गायिलेल्या एका हिंदी गीताची आठवण होते. तेही याच अर्थाचे आहे. त्यात कवी म्हणतो 

बरखा रानी जरा जमके बरसो मेरा दिलबर जा न पाये, झुमके बरसो 

तसंच हे आपलं मराठी गीत. या गीतात ती विरहिणी म्हणते 

मेघा असशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी 

वर्षामागुनी वर्षती नयने, करती नित बरसात 

हे मेघा तू आकाशात असतोस. वर्षातून कधीतरी वर्षतोस. पण तुला वर्षामागून वर्षे वर्षणारे माझे नेत्र दिसत नाहीत का रे ? या ओळींमध्ये वर्षा, वर्षणे या शब्दांचा सुंदर उपयोग केलेला आपल्याला दिसतो. 

आणखी एक वेगळ्या चालींचं अन वेगळ्या ढंगाचं गाणं म्हणजे आशा भोसलेंनी गायिलेलं ' झुंजूर मुंजूर पाऊस माऱ्यानं अंग माझं ओलंचिंब झालं रं...' या गाण्यातही विरहीणीची आपल्या साजणासाठीची ओढ आहे. अशी अनेक ' वर्षागीते ' आठवत जातात. 

हिंदी चित्रपटात तर खूपच बहारदार गीते आहेत. ' मंझिल ' चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायिलेले ' रिमझिम गिरे सावन ' हे सुंदर गाणं मला आठवतं. यात सुरु असणारा पाऊस, अंगावर उडणारे पावसाचे तुषार आणि उसळत्या दर्याच्या लाटांचे तुषार आणि त्यात चिंब भिजलेली अमिताभ आणि मौसमी चॅटर्जी यांची जोडी आपल्याला दिसते. या गाण्यात अवखळपणे बागडणाऱ्या मौसमीच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्यालाही आनंदित करतो. अशीच सुंदर गीते ' छायी बरखा बहार ...', ओ सजना बरखा बहार आयी आहेत. अशी अनेक गीते हिंदी चित्रपटात आहेत. सगळ्यांचा उल्लेख करायचा म्हटला तरी लेख खूप लांबेल. 

असंच माझं अत्यंत आवडतं गाणं आहे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं ' श्रावणात घननीळा बरसला...' या अप्रतिम गीतावर मागे मी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे. ' घन ओथंबून येती, वनात राघू ओघीरती ...' आहे. शेवटी तो घन आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि आपल्यालाही चिंब भिजवतो. मग आपोआपच ओठांवर शब्द येतात, ' येरे घना येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना...' 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२२/७/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा ) 











Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..