धन्यवाद हो धन्यवाद...

थोडं मनातलं 

धन्यवाद हो धन्यवाद... 

' होम मिनिस्टर ' नावाचं एक धारावाहिक आहे. टीव्ही वर सुरु असणाऱ्या या शोचा आनंद भगिनी वर्ग मोठया प्रमाणात घेताना आढळून येतो. ' भावजी ' या नावाने लोकप्रिय असणारे आदेश बांदेकर या शोचे अतिशय कुशल आणि सहज संचालन करतात. अर्थात मला तुमच्याशी या शोबद्दल बोलायचं नाही. पण या शोमध्ये आदेश बांदेकर एक  प्रश्न हमखास विचारतात. तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. ते म्हणतात, ' वहिनी, आभार मानायचे तर कोणाचे मानाल किंवा धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्याल ?' मग ती भगिनी आपल्या माहेरचे, सासरचे किंवा आणखी कुणा व्यक्तीचे आभार मानते किंवा धन्यवाद देते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. 

याचं तात्पर्य असं की आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल, यशाबद्दल कोणाची तरी मदत आपल्याला झालेली असते. आपण मिळवलेलं यश किंवा केलेली प्रगती ही एकट्याची असू शकत नाही. आपण एकटे त्याचे श्रेय घेऊ शकत नाही. म्हणून आजच्या परिस्थितीत या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचताना आपल्याला अनेक लोकांची मदत झालेली असते. त्या सगळ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचे आभार मानणं वा त्यांना धन्यवाद देणं हे  आपलं आद्य कर्तव्य. आपण तसं केलं नाही तर आपण कृतघ्न ठरू. 

आचार्य अत्रे यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलं आहे की, ' उद्या माझी समाधी बांधायची झाली तर तिच्यावर एक वाक्य लिहून ठेवा. ते असं की हा माणूस मूर्ख असेल, अविचारी असेल पण कृतघ्न कधीच नव्हता. कृतज्ञ असण्याबद्दलचा  महिमा इतक्या सुंदर शब्दात क्वचितच कोणी सांगितला असावा. अनेक साधू, संत, निरनिराळे उपासना संप्रदाय आपल्यला जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास सांगतात. तुकाराम महाराजांच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळात त्यांचे जवळचे आप्त हे जग सोडून गेले. त्यांच्या सावकारी धंद्याचे तीन तेरा वाजले. पण ते परमेश्वराला म्हणतात ' बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. अनुतापें तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. ' केवढी अपरिमित श्रद्धा तुकाराम महाराजांची परमेश्वरावर ! अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या जागी दुसरी कोणीही व्यक्ती असती तर परमेश्वराला बोल लावला असता. पण ते तुकाराम महाराज आहेत. श्रीकृष्णाचा परम सखा सुदामा, श्रीकृष्णाची आत्या कुंती हे तर विपरीत परिस्थितीत त्याचे धन्यवाद मानून त्याची भक्ती करीत होते. कुंतीने तर त्याला ' तुझा क्षणभरही विसर न होवो म्हणून आपल्याला कायम दुःखात ठेव ' अशी जगावेगळी मागणी मागितली. आपण तर सामान्य माणसं ! आपल्यात तेवढी हिंमत नाही म्हणण्याची की मला दुःख किंवा विपरीत परिस्थितीत ठेव. पण आपल्याला जे काही मिळालं आहे तेही खूप आहे. त्याबद्दल तरी आपण त्याचे  आभार मानायला हवेत. 

तसं तर जन्माला येताना आपण काही घेऊन येत नाही. आयुष्यभर सुखाच्या मागे लागताना पैसा, गाडी, बंगला यासाठी आपल्या आयुष्याचा मौल्यवान काळ आणि शक्ती खर्च करतो. पण जाताना सगळे इथेच ठेवून जातो. मग जे काही आपल्याला मिळाले ते त्याचीच कृपा नाही का ? आपल्याला ते ज्यांच्या कृपेमुळे मिळाले, ज्यांच्या मदतीशिवाय हे सगळे करणे अशक्य होते, त्यांचे आभार नको का मानायला ? कृतज्ञ राहणे म्हणजे स्वतःतला ' मी ' विलीन करणे. हे सगळे माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे आहे ही भावना दृढ करणे. द्वैताकडून अद्वैताकडे जाणे. एखाद्या झाडाचे बी किती छोटे असते ! पण जोपर्यत ते स्वतःला जमिनीत गाडून घेत नाही म्हणजेच स्वतःचा अहंकार विलीन करीत नाही तोपर्यंत त्याचे सुंदर वृक्षात रूपांतर होण्याची क्रिया होत नाही. 

आपण व्यवहारात अनेक प्रकारचे निर्देशांक मोजत असतो. मग तो शेअर मार्केटचा असतो, महागाईचा असतो. भुतानसारखा छोटा देश आनंदाच्या निर्देशांकात ( इंडेक्स ऑफ हॅपिनेस ) भारतासारख्या विशाल देशाच्या कितीतरी पुढे आहे. हे जसे वेगवेगळे निर्देशांक आहेत तसेच कृतज्ञतेचा निर्देशांक मोजायला काय हरकत आहे ? एका ठिकाणी म्हटले आहे, ' Someetimes try to calculate the index of your gratitude and then you wil realise how lucky you are ! ' आपण खरंच हा निर्देशांक मोजायची सवय लावली तर आपल्याला कळून येईल की आपण खरेच किती भाग्यवान आहोत. पण आपण नेहमी इतरांशी नको त्या गोष्टींची तुलना करून हा सहज मिळणारा आनंदही गमावून बसतो. 

आपल्याला स्वतःबद्दल किती घमेंड असते पण साधे श्वास घेणे सुद्धा आपल्या हातात नसते. श्वास चालू आहेत ते त्याच्या कृपेने. केव्हा थांबतील याचा भरोसा नाही. जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो आणि दवाखान्यात भरती केले जाते तेव्हा आपल्याला श्वासांची किंमत कळते. एखाद्या अंध व्यक्तीच्या आयुष्याशी आपली तुलना केल्यावर डोळ्यांची किंमत कळते. मग आपल्याला मिळालेले हे अख्खे शरीर त्या विधात्याने दिले हे त्याचे केवढे मोठे उपकार ! त्याचे मोल तरी करता येईल का ? पण त्याबद्दल आपण त्याचे किती वेळा धन्यवाद व्यक्त करतो ? 

आपल्याला मिळालेले मित्र, नातेवाईक आपल्याशी असलेल्या कुठल्यातरी ऋणानुबंधाने आपल्याला मिळालेले असतात. त्यांच्यामुळे आपले जीवन सुकर झालेले असते. मित्र आणि नातेवाईक एवढेच नव्हे तर आपल्याला त्रास देणारे हितशत्रू, आपली कठीण काळी परीक्षा घेणारी संकटे या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवून  जातात म्हणून यांच्याबद्दलही आपल्या मानत कृतज्ञतेची भावना असायला हवी. लहानपणापासून आजपर्यंत आपल्याला कोणी कोणी मदत केली याची जर आपण यादी करायला बसलो तर तर ही यादी खूप मोठी होईल. आता थोडेसे दुसऱ्या यादीकडेही वळू. ती म्हणजे आपण कोणाकोणाला किती उपयोगी पडलो, कोणाच्या आयुष्यात आपल्यामुळे आनंद, सुख आले ? अवघड वाटते ना ? ही यादी फार काही वाढत नाही असे दिसते. ही यादी जेव्हा पहिल्या यादीपेक्षा अधिक मोठी होईल, तेव्हा आयुष्याच्या मार्गावर आपली वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे असे म्हणता येईल. 

रोज रात्री झोपताना आज दिवसभर आपल्याला कोणाकोणाची मदत झाली त्यांची आठवण करून त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. आपले पूर्वज बघा किती दूरदृष्टीचे होते ! सकाळी उठल्यावर भूमीबद्दलची कृतज्ञता म्हणून भूमीला नमस्कार, आईवडील, गुरुजनांना नमस्कार करायला आपली संस्कृती आपल्याला शिकवते. त्यांच्यासाठी एखादा विशिष्ट 'डे ' आपल्याकडे त्यांनी ठेवलेला नाही. धन्यवाद, कृतज्ञता रोजच व्यक्त करायची. आशीर्वाद रोजच घ्यायचे. मला मिळणारी हवा, अन्न, पाणी ज्यांच्यामुळे मी हे जीवन सुखकर जगू शकतो आहे त्या गोष्टीही धन्यवादास पात्र आहेत. तुमच्याकडे असणारी तुमची दोन चाकी, चार चाकी रोज तुम्हाला कुठे ना कुठेतरी घेऊन जात असते. सुरक्षित परत आणत असते. तिच्यामुळे तुमचा रोजचा प्रवास सुखकर होतो. ती सुद्धा आभारासाठी पात्र आहे ! 

मी आता स्वतःला एक सवय लावून घेतली आहे. ती म्हणजे जाणीवपूर्वक सगळ्यांचे आभार व्यक्त करण्याची. मला पत्र आणून देणारा पोस्टमन किंवा कुरिअरवाला, दूधवाला अशी जी जी मंडळी मला सकाळपासून भेटतात, त्या त्या सर्वांचे जाणीवपूर्वक आभार मी मानतो. मी ज्या रिक्षातून प्रवास केला, त्या रिक्षावाल्याचे आभार मानतो. खरे तर मी त्याला पैसे दिलेले असतात. तरीही त्याने मला इच्छित स्थळी सोडल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. कृतज्ञता, आभार व्यक्त केल्याने त्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मला सुखावतो. प्रत्येक व्यक्ती म्हणजे परमेश्वराचे रूप आहे असे जर आपण मानत असू तर माझे आभार, कृतज्ञता त्या त्या व्यक्तीच्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत पोहोचते असे मी समजतो. 

काही दिवसांपूर्वी मी मिरजेला एका लग्नासाठी गेलो होतो. तिथून मला गावात एका मित्राकडे जायचे होते. तो  मित्र स्वतः रिक्षा घेऊन मला घ्यायला आला. आम्ही त्याच्या घरी गेलो. आमच्या गप्पा, चहापाणी होईपर्यंत तो रिक्षावाला तिथे थांबून राहिला. परत मला सोडण्यासाठी मंगल कार्यालयापर्यंत आला. एव्हाना तसा त्याचा आणि माझा परिचय झाला होता. थांबल्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानले. मग तो स्वतःच सांगू लागला. साहेब इथल्या लोकांना माझी किंमत नाही. माझ्याकडे ते एक रिक्षावाला म्हणून पाहतात. रिक्षावाल्याला कोण किंमत देणार ? पण माझा एक मुलगा पुण्यात डॉक्टर आहे आणि दुसरा मुलगा इंजिनिअर आहे. मी त्यांना म्हटले की खूपच छान. हीच तुमची खरी कमाई आहे. आणि रिक्षावाला म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका. माझ्या रिक्षेत बसणारा प्रत्येक प्रवासी हा परमेश्वराचे रूप आहे. मी त्याला त्याच्या इच्छित स्थळी घेऊन जातो आहे. परमेश्वराची सेवा माझ्या हातून घडते आहे ही भावना मनात ठेवा. कोणतेही काम हलके नाही. माझे बोलणे ऐकून तो खूप समाधानी झाला. तो म्हणाला ' तुम्ही माझ्या कामाला एकदम उच्च दर्जावर नेऊन ठेवलेत. आता माझे काम मी आणखी आनंदाने मन लावून करीन. त्या रिक्षावाल्याने आपले नाव कदम असे सांगितले आणि ' साहेब, जेव्हा तुम्ही पुन्हा याल, तेव्हा जरूर मला कळवा. मी तुम्हाला घ्यायला येईन ' असे म्हणून माझा निरोप घेतला. 

तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे हो पण कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी का ? त्यामुळे असं काय होणार आहे की मी ती गोष्ट आवर्जून करावी ?  त्यासाठीच तर अगदी सुरुवातीला आचार्य अत्रे यांचे विधान मी दिले आहे. आता कृतज्ञता का हवी ते सांगतो . कृतज्ञता ही मनाची अशी एक सकारात्मक अवस्था आहे की ज्यात ऊर्जेचा प्रचंड साठा दडलेला असतो. या जगात जो जो चांगुलपणा आपल्याला आढळतो तो कृतज्ञतेच्या भावनेमुळेच असतो. आजोबानी आपल्या पूर्वजांनी लावलेले आंबे खाल्ले असतात म्हणून ते आपल्या नातवासाठी आंब्याचे झाड लावतात. गरिबीत शिक्षण घेऊन मोठी झालेली एखादी व्यक्ती गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मोठे कार्य करते. ही सगळी कृतज्ञतेचीच रूपे आहेत. कृतज्ञता व्यक्त करणारे लोक आशावादी, आनंदी आणि उत्साही असतात. अशा लोकांचं मानसिक आरोग्यही उत्तम राहतं. कृतज्ञतेमुळे सकारात्मकता वाढते आणि संकटाना, परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार होत जाते. 

असं म्हटलं जातं की आपल्याला आयुष्यात जे काही मिळतं ते बऱ्याच वेळा आपल्या योग्यतेपेक्षा जास्त असतं. जो त्याबद्दल कृतज्ञ असतो, त्याला अधिकाधिक मिळत जाते. स्वामी विवेकानंद म्हणतात ' तुम्ही जसा विचार कराल, तसे तुम्ही घडता. तुम्ही स्वतःला शक्तिमान समजाल तर शक्तिवान व्हाल. स्वतःला दुर्बल समजाल तर तसेच व्हाल. ' म्हणून आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता किंवा त्याबद्दल दैवाला दोष देत राहण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ' लॉ ऑफ अट्रॅक्शन ' च्या तत्वानुसार त्या गोष्टी तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. 

कृतज्ञता ही प्रेमाची सख्खी बहीण आहे. त्या दोन्ही हातात हात घालून चालतात. मुकी जनावरं सुद्धा किती कृतज्ञ असतात ! आपल्या मालकावर किती प्रेम करतात, त्याच्यासाठी जीव द्यायला तयार होतात. आपण तर सारासार विचार करू शकणारी माणसं आहोत. ' नटसम्राट ' मधील अप्पासाहेब बेलवलकर. म्हातारपणी आपली सगळी संपत्ती मुलांना वाटून टाकतात. पण मुले कृतघ्न निघतात. त्यांच्यावर नको नको तो आळ,संशय घेतात. शेवटी दोघे घराबाहेर पडतात. अप्पासाहेबाना शेवटी सांभाळतो तो एक साधा बूट पॉलिश करणारा मुलगा. मुलांना जेव्हा आपली चूक कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीचा ' बागबान ' हा चित्रपट अशाच कथानकावर आधारित आहे. जिथे कृतज्ञता, प्रेम संपले तिथे माणुसकी संपली. 

म्हणूनच आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत आपल्याला इथपर्यंत पोहोचवणाऱ्या, आपल्याला हरघडी मदत करणाऱ्या सगळ्यांना. धन्यवाद द्यायचे आहेतते आपल्याला सगळे काही देणाऱ्या विधात्याला. आयुश्यात थोडं थांबून कृतज्ञतेच्या फुलांचा सुगंध अनुभवायलाच हवा. चांगुलपणाचे, कृतज्ञतेचे चक्र सदैव फिरत राहायला हवे. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२७/०७/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









Comments

Popular posts from this blog

थोडं मनातलं लग्नाला जातो मी ...

थोडं मनातलं कल आज और कल

थोडं मनातलं माती भिडली आभाळा..